विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी आयआयटी कानपूर चे संशोधक सर्जिकल मास्क वर लावण्याच्या किफायतशीर विषाणू रोधक थराची निर्मिती करणार

Posted On: 04 APR 2020 5:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020


विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या अंतर्गत येणारे विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन महामंडळ (SERB) सध्या आयआयटी कानपूर इथल्या संशोधकांना विषाणू रोधक थराचे उत्पादन करण्यासाठी मदत करत आहे. या विषाणूरोधक  थराचा उपयोग कोविड-19 शी मुकाबला करताना वापरण्याच्या सर्जिकल मास्क तसेच संरक्षक पोशाखासाठी देखील होणार आहे. संशोधकांचा हा चमू विषाणूरोधक थर बनवण्यासाठी सूक्ष्मजिवाणू रोधक वैशिष्ट्य असलेले सामान्य पॉलिमर आणि पुनर्वापर करण्यासारखे विषाणू रोधक रेणू असलेल्या पदार्थाचा उपयोग करणार असून त्यामुळे हा थर कमी खर्चात तयार होईल.
कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करताना संसर्गाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या थराचा लेप दिलेल्या वस्तूंचा सर्वात जास्त फायदा होईल. या पदार्थाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी त्याच्या किफायतशीर दरामुळे मदत मिळेल.
या विषाणूरोधक पदार्थांच्या उत्पादनात वापरण्यात येणारे पॉलीमर्स जिवाणू तसेच विषाणूंना चिकटू देणार नाहीत. याशिवाय करोना तसेच एन्फ्लुएन्झाच्या विषाणूंना निष्प्रभ करणाऱ्या आणखी एका रेणूची जोड देखील या विषाणूरोधक पदार्थाला देण्यात येणार आहे. या सोबत वापरल्या जाणाऱ्या कार्यशील औषधांमुळे एकत्रितपणे विषाणूरोधी परिणाम साधला जाईल.

सध्या वापरात असलेल्या सर्व प्रकारच्या मास्क मधून विषाणूयुक्त रेणूंना गाळण क्रियेद्वारे अडकवून ठेवले जाते. या विषाणूरोधी थरामुळे मास्कचे आयुष्य वाढेल, पुनर्वापराची  शक्यता वाढेल आणि त्याची विल्हेवाट लावणे सोपी होईल, असे विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव प्रोफेसर आशुतोष शर्मा यांनी म्हटले आहे.

आयआयटी कानपूरच्या रसायन शास्त्र विभागाच्या या संशोधकांमध्ये प्रोफेसर एम एल एन राव, असोसिएट प्रोफेसर डॉक्टर आशिष के पात्रा आणि असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर नगमा परवीन यांचा समावेश आहे. येत्या तीन महिन्यात या विषाणूरोधक पदार्थाचा नमुना तयार होईल, आणि त्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी स्टार्ट अप अथवा इतर उद्योजकांची मदत घेतली जाईल.

या प्रस्तावित विषाणूरोधी पदार्थाचा आणि औषधाचा वापर सर्जिकल मास्क व संरक्षक पोषाख बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कापडावर थर देण्यासाठी केला जाईल. यामुळे करोना विषाणू तसेच अन्य एन्फ्लुएन्झासारख्या विषाणूंचा संसर्ग डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना होण्यापासून रोखण्यासाठी मदत होईल. या विषाणूरोधी पदार्थाचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे रुग्णालये तसेच इतर सामान्य वापरासाठी देखील मोठ्या प्रमाणावर याचे उत्पादन करणे किफायतशीर ठरेल.

 

अधिक माहिती साठी संपर्क:
डॉ नगमा परवीन (PI),
nagma@iitk.ac.in
मोबाईल क्रमांक- 9474024181

 

 

U.Ujgare/U.Raikar/D.Rane

  


(Release ID: 1611183) Visitor Counter : 196