प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ आणि सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्थेने केली कोविड-19 साठीच्या चाचणीची सोय
Posted On:
04 APR 2020 12:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल, 2020
देशात वेगाने पसरत असलेल्या कोविड-19 च्या साथीने आरोग्यक्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. या संसर्गाची चाचणी करण्यासाठीचे संच मर्यादित प्रमाणात उपलब्ध असणे हे सध्याचे सर्वात प्रमुख आव्हान आहे. सध्या भारतात, परदेश प्रवास करून आलेल्यांचीच प्राधान्याने चाचणी केली जात आहे. मात्र भविष्यात लाखोंच्या संख्येतील नागरिकांची चाचणी करण्याच्या दृष्टीने चाचण्यांचा वेग वाढणे अपेक्षित आहे.
म्हणून, देशात कोविड-19 संसर्ग निश्चित करण्यासाठीच्या चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी सीएसआयआर-इमटेक अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ आणि सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्थेने संबधित व्यक्तींचे नमुने तपासण्याची सुविधा सुरु केली आहे. भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांनी निश्चित केलेली दिशादर्शक तत्वे आणि भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या सल्ल्यांना अनुसरूनच शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन मंडळाच्या अखत्यारीतील प्रयोगशाळा तसेच केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग आणि अणुउर्जा विभाग यांच्याशी संलग्न प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी प्रक्रिया राबविली जात आहे.
भारत सरकारची मान्यता असलेल्या प्रयोगशाळांना कोविड-19 साठीच्या चाचणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाने उचललेले पाऊल या क्षेत्रातील अत्यंत क्रांतिकारक पाऊल असून या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या चाचण्यांचा वेग यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सुरुवातीच्या काळात प्रतिदिन 50 ते 100 चाचण्यांचे नियोजन असले तरी भविष्यकाळात आवश्यकतेनुसार त्यात वाढ केली जाईल अशी ग्वाही चंदिगढ येथील सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ.संजीव खोसला यांनी दिली.
या चाचण्यांची प्रक्रिया जलदगतीने कार्यान्वित करण्यासाठी अनिवार्य असलेल्या सर्व आवश्यक परवानग्या सरकारकडून घेण्यात आल्या आहेत. कोविड-19 विषाणू संसर्ग निश्चितीसाठीच्या चाचण्यांसोबतच सीएसआयआर-इमटेकने आरोग्य सेवा व्यावसायिकांना वैयक्तिक सुरक्षेच्या उपकरणांचा पुरवठा सुरु केला आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना संसर्गापासून संरक्षण मिळावे या हेतूने संथेने हे पाऊल उचलले आहे. मालवाहतूक आणि पायाभूत सुविधांचा पुरवठा करून सीएसआयआर-इमटेक संस्था स्थानिक प्रशासन आणि रेड क्रॉस सोसायटीच्या चंदिगढ येथील यंत्रणेला देखील मदत करीत आहे.
KGS/(DST-(India Science Wire))
U.Ujgare/S.Chitnis/D.Rane
(Release ID: 1611070)
Visitor Counter : 190
Read this release in:
Assamese
,
English
,
Gujarati
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada