आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती

Posted On: 03 APR 2020 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

 

देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव थांबवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत.

त्यावर अतिशय उच्च स्तरावरून देखरेख केली जात आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज कोविड-19 प्रतिबंधासाठी असलेल्या सज्जतेची सद्यस्थिती, नागरी समाजाची/ स्वयंसेवी संस्था/ खाजगी क्षेत्र यांची भूमिका आणि या महामारीची सर्वाधिक झळ बसू शकणाऱ्या वर्गावर भर देत या आजाराला थोपवण्यामध्ये रेड क्रॉसची भूमिका याबाबत राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

या आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या काळात जनतेने दाखवलेली अभूतपूर्व शिस्त आणि संघभावना याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून केलेल्या भाषणात प्रशंसा केली. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या आवश्यकतेचा पुनरुच्चार केला आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या कामात अडथळे न आणण्याचे आवाहन केले. देशभरात अग्रभागी राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी होणाऱ्या गैरवर्तनाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. हे आरोग्य कर्मचारी आपले कोरोना योद्धे आहेत आणि कोविड-19 सारख्या महामारीला आळा घालण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने काम करून देशसेवा करत आहेत आणि आतापर्यंत 156 रुग्ण बरे झाले असल्याने पंतप्रधानांनी देखील या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची प्रशंसा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड-19 च्या प्रशिक्षण सामग्री संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना 2 एप्रिल 2020 रोजी एक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. ही नियमावली https://www.mohfw.gov.in/pdf/AdvisoryforHRmanagement.pdf या ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये क्षमतावृद्धी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कार्यस्थळी देखरेखीच्या उपाययोजनांना बळकटी, विलगीकरण सुविधांचे वैद्यकीय व्यवस्थापन, अलगीकरण, मानसशास्त्रीय – सामाजिक काळजी, मालवाहतूकशास्त्र आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

आयसीयूमधील काळजी आणि व्हेंटिलेशन स्ट्रॅटेजीबाबत डॉक्टरांना आणि कोविड-19 रुग्णांची काळजी घेण्याचे परिचारिकांना ऑनलाईन प्रशिक्षण देखील एम्सकडून दिले जात आहे. या सर्व वेबिनारचे वेळापत्रक आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://www.mohfw.gov.in/ उपलब्ध आहे.

आतापर्यंत देशात 2301 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 56 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.156 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या.

https://www.mohfw.gov.in/.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवता येतील.

कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री). राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

 

 

 

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar


(Release ID: 1610874) Visitor Counter : 155