रेल्वे मंत्रालय

कोविड -19 विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी भारतीय रेल्वेची सर्व यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कार्यरत


केंद्रीय रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल रेल्वे राज्यमंत्री आणि रेल्वे महामंडळाच्या अध्यक्षांसह 5 मार्च 2020 पासून तयारीचा आढावा तसेच आवश्यक ते सर्व निर्णय

Posted On: 03 APR 2020 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

 

कोविड 19 विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी भारतीय रेल्वेची  सर्व यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाली आहे. केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी व रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांच्याबरोबर 5 मार्च 2020 पासून नियमित आढावा बैठका घेतल्या आहेत. रेल्वेच्या महाव्यवस्थापक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या दररोज चर्चा होत आहेत. यामुळे सामूहिक प्रयत्नांचा समन्वय घडविणेदिशा निर्देश देणे कामातील प्रगतीचा आढावा घेणे, दिलेल्या सूचनांचा पाठपुरावा करणे तसेच सर्व घटकांमध्ये सूचनांचे वहन प्रभावीपणे करणे शक्य होत आहे. आतापर्यंत खालील कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

  1. अत्यावश्यक वस्तूंचा देशभरात पुरवठा करण्यासाठी मालवाहू रेल्वेगाड्यांच्या सतत फेऱ्या चालू असून 24  मार्च 2020 पासून 2 एप्रिल 2020 पर्यंत चार लाखाहून अधिक वॅगन्स द्वारा पुरवठा सुरू आहे. यामुळे देशभरातल्या पुरवठा साखळ्या अविरत कार्यरत आहेत. यापैकी दोन लाख 23 हजार वॅगन्स मधून अन्नधान्य मीठ, साखर, दूध, खाद्यतेले, कांदे, फळे व भाज्या, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा, खते इत्यादी वस्तू वाहून नेल्या जात आहेत. भारतीय रेल्वेचे कर्मचारी सर्व माल गोदामांमध्ये, स्थानकांमध्ये तसेच नियंत्रण कक्षात अखंडपणे कार्यरत असून देशभरात अत्यावश्यक पदार्थांचा पुरवठा सतत चालू राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रेल्वे इंजिन चालक तसेच गार्ड देखील रेल्वे वाहतूक  कार्यक्षम पद्धतीने चालवत आहेत. रेल्वेमार्गाची देखभाल करणारे, सिग्नल यंत्रणा तसेच ओव्हरहेड उपकरणे चालवणारे कर्मचारी शिवाय रेल्वे इंजिने, रेल्वे बोगी आणि वॅगन कार्यरत ठेवणारे कर्मचारी सर्व यंत्रणा सक्षम ठेवून मालगाड्यांची वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी काम करत आहेत.

            केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी संलग्न असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांमार्फत झोनल रेल्वे मालगाड्याना त्यांच्या दळणवळणासंदर्भात अथवा  माल चढवण्यात किंवा उतरवण्यात येणाऱ्या समस्यांचे निराकरण केले जात आहे.

  1. औषधे, वैद्यकीय उपकरणे, खाद्यपदार्थ इत्यादी अत्यावश्यक वस्तूंची पार्सले वाहून नेणाऱ्या रेल्वेगाड्यांचे काम या covid-19 लॉक डाऊन च्या काळात खूपच महत्त्वाचे आहे. इ- वाणिज्य कंपन्यांकडे सामान्य ग्राहकांनी मागणी केलेल्या वस्तूंची त्वरित वाहतूक करण्यासाठी रेल्वेने पार्सल व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. या इ-वाणिज्य कंपन्यांमार्फत अनेकदा राज्य सरकारी संस्थांनी देखील वस्तूंची मागणी केलेली आढळून येत आहे.
  2. व्हारफेज व डिमरेज (Wharfage and Demurrage) नियमांचे शिथिलीकरण करून विषाणू प्रादुर्भावही नैसर्गिक आपत्ती अथवा मानवी नियंत्रणा पलीकडची बाब म्हणून रेल्वे यार्डात वा गोदामांमध्ये मुदती पेक्षा जास्त काळ माल पडून राहिल्यावर देखील अतिरिक्त दंड न आकारण्याचा निर्णय घेत रेल्वेने यासंदर्भातले नियम शिथिल केले आहेत.
  3.  रिकामे कंटेनर हलवण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या दरातून सूट :

24 मार्च ते 30 एप्रिल 2020 या काळात मालवाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून रिकामे कंटेनर हलवण्यासाठी कोणताही दर आकारला जाणार नाही.

  1. केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन :

सामान्य नागरिकांकडून रेल्वे प्रशासनाकडे येणाऱ्या सूचना तसेच माहितीची दखल त्वरित घेण्यासाठी 27 मार्च 2020 पासून केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे कामकाज संचालक पातळीवरचे अधिकारी पहात आहेत. रेल्वेच्या 139 आणि 138 या हेल्पलाईन फोन क्रमांकावर आलेले कॉल तसेच railmadad@rb.railnet.gov.in  या पत्त्यावर आलेल्या इमेल्स तसेच समाज माध्यमांवर येणाऱ्या माहितीची दखल घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे काम या कक्षातर्फे  केले जात आहे. यामुळे रेल्वेच्या ग्राहकांना येणाऱ्या सर्व अडचणींचे वेळीच निराकरण होऊ शकेल.

  1. रेल्वेने आतापर्यंत 17 विशेष रुग्णालयांमध्ये covid-19 च्या उपचारांसाठी 5000 खाटांची तयारी केली असून 11000 खाटांचे विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. 33 रुग्णालयांच्या ब्लॉकची योजना  केली असून त्याची क्षमता पूर्णत्वाला नेण्याची तयारी सुरू आहे.

            5000 रेल्वे डब्यांचे विलगीकरण कक्षात रूपांतर:

            देशभरात एकूण पाच हजार रेल्वे डब्यांचे रूपांतर 80000 खाटांच्या विलगीकरण कक्षात करण्याची प्रक्रिया सुरू असून covid-19 रुग्णांसाठी याचा उपयोग केला जाईल. या रूपांतराचा आराखडा मंजूर झाला असून नमूना कक्षाची उभारणी होऊन ती मंजूर झाली आहे. रेल्वेकडून आता या डब्यांचे रूपांतर सुरू झाले आहे. गरज पडल्यास आणखी वीस हजार रेल्वे डब्यांचे रूपांतर 320000 खाटांच्या विलगीकरण कक्षात करण्यासाठी योजना तयार आहे.

  1. वैद्यकीय उपकरणे, सुरक्षा पोशाख (PPE) तसेच वेंटीलेटर ची उपलब्धता:

 Covid-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणे, सुरक्षा पोशाख(PPE) तसेच व्हेंटिलेटरची गरज पडते. या सर्व गोष्टींच्या खरेदीसाठी रेल्वे झोन आणि रेल्वेच्या सर्व कारखान्यांनी कार्यवाही सुरू केली आहे.

            करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कामाच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय मालगाड्यांचे काम अविरत सुरू असल्याने मालगाड्यांवर काम करणारे कर्मचारी देखील सतत कामावर येत आहेत.कामाच्या ठिकाणी त्यांचे संसर्गापासून रक्षण करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी खालील गोष्टींची खातरजमा केली जात आहे.

  • मास्क तसेच सॅनिटायझर सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. कंत्राटी कामगारांना देखील या वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. रेल्वेच्या वर्कशॉप्स तसेच कारखान्यांमधून देखील मास्क व सॅनिटायझरचे उत्पादन केले जात आहे.
  • हात धुण्यासाठी साबण व पाण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी केली आहे. काही कामाच्या ठिकाणी हाताचा स्पर्श केल्या विना काम करणाऱ्या यंत्रांचा वापर हात धुण्यासाठी केला जात आहे.
  • ट्रॅकमन, रेल्वे इंजिन चालक तसेच इतर कर्मचाऱ्यांना सामाजिक अंतर ठेवून काम करण्यासाठी सूचित व प्रेरित करण्यात येत आहे.
  1. सर्व केंद्रशासन कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या आरोग्य सुविधा:

            देशभरातल्या सर्व केंद्रशासन कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवून रेल्वेची आरोग्य केंद्रे तसेच रुग्णालयांचा लाभ घेता येईल.

  1. रेल्वे कर्मचाऱ्यांची पीएम केअर्स फंडासाठी 151 कोटी रुपयांची देणगी:

            सर्व रेल्वे कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार पी एम केअर्स निधीला देणगी म्हणून देणार आहेत. याची एकूण रक्कम 151 कोटी रुपये इतकी होईल.

  1. निमवैद्यकीय (पॅरामेडिकल) कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक:

            रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनेच आणखी निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नेमण्यासाठी रेल्वेचे जनरल मॅनेजर/ सीएओ/ डीआरएम यांना सक्षम करण्यात आले आहे.

  1. गरजूंना आय आर सी टी सी च्या स्वयंपाक घरातून मोफत जेवण पुरवठा :

            रेल्वेला भोजन सेवा देणाऱ्या आयआरसीटीसीच्या स्वयंपाक घरांमधून 28 मार्च दोन हजार वीस पासून गरजू व्यक्तींना जेवण पुरवले जात आहे. यासाठी रेल्वे पोलिसांची मदत घेतली जात असून आतापर्यंत देशभरात 25 ठिकाणी सव्वादोन लाख जणांना जेवण पुरवण्यात आले आहे.

  1. कंत्राटदारांना तसेच पुरवठादारांना डिजिटल माध्यमातून मोबदला :

रेल्वेकडे आधीपासूनच उपलब्ध असलेल्या कार्यक्षम डिजिटल पेमेंट प्रमाण प्रणाली मार्फत रेल्वेच्या कंत्राटदारांना तसेच पुरवठादारांना त्यांचा मोबदला पोचवला जात आहे. कंत्राटी कामगारांचे सर्व पगार देखील त्वरित डिजिटल माध्यमातून वितरित केले जात आहेत, ज्यायोगे त्यांना कोणतीही समस्या येणार नाही.

13. कंत्राटी कामगारांना मोबदला तसेच राहण्याची सोय: या लॉकडाऊनच्या दरम्यान हाउसकीपिंग तसेच देखभाल सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांना नियमितपणे पगार दिला जात आहे. लॉक डाऊन मुळे कामाच्या ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या रहाण्याची तसेच जेवणाची सोयही केली गेली आहे.

 

G.Chippalkatti/U.Raikar/P.Malandkar

 

 

 

 

 

 


(Release ID: 1610863) Visitor Counter : 233