आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19वर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून डॉ. आरएमएल आणि सफदरजंग रुग्णालयांची पाहणी, रुग्णांशी साधला संवाद
आरएमएलमधील ट्रॉमा सेंटरचा वापर पूर्णपणे कोविड-19 रुग्णांचा विलगीकरण वॉर्ड म्हणून करणार
सफदरजंग रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे कोविड-19 व्यवस्थापन केंद्रामध्ये रुपांतर
Posted On:
03 APR 2020 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020
कोविड-19 वर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज डॉ. आरएमएल आणि सफदरजंग रुग्णालयांना भेट दिली.
डॉ. आरएमएल रुग्णालयामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी फ्लू कॉर्नर, ईमर्जन्सी केअर सेंटर, ट्रॉमा सेंटर ब्लॉक आणि कोरोना स्क्रिनिंग सेंटरची पाहणी केली. या केंद्रातील कामकाजाची पाहणी केल्यावर तिथल्या स्क्रिनिंग प्रक्रियेच्या गतीबद्दल आरोग्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. दररोज खूप मोठ्या प्रमाणावर विविध नमुन्यांची हाताळणी करणाऱ्या मायक्रोबायॉलॉजी विभागाला देखील त्यांनी भेट दिली आणि अतिशय बारकाईने तिथल्या नमूने संकलन आणि तपासणीच्या संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली
विलगीकरण कक्षांची वाढती मागणी लक्षात घेऊन डॉ. आरएमएल रुग्णालयातील ट्रॉमा सेंटर यापुढे कोविड-19 रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष म्हणून काम करेल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले
त्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्र्यानी सफदरजंग रुग्णालयाला भेट दिली आणि तिथल्या अत्याधुनिक कोविड-19 विलगीकरण व्यवस्थापन केंद्रात रुपांतर करण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील सर्व सुविधांची तपशीलवार पाहणी केली. या केंद्रात विलगीकरणाच्या 400 आणि आयसीयुच्या 100 खाटा आहेत.या दोन्ही रुग्णालयांच्या पाहणी दरम्यान डॉ. हर्षवर्धन यांनी तिथले केवळ कोविड-19 रुग्णांची हाताळणी करणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय आणि निर्जंतुकीकरण कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी हे लोक अथक प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोविड-19मुळे देशावर होणारे परिणाम रोखण्यासाठी आरोग्य क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांबाबतही चर्चा केली. त्यांचे काम म्हणजे मानवतेची सेवा असल्याचे सांगत आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातल्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या समर्पित वृत्तीला आणि त्यांच्या प्रचंड मेहनतीला सलाम केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने या आपत्ती प्रतिबंधाच्या उपाययोजनांवर केलेल्या देखरेखीमुळे आणि आरोग्य क्षेत्रातल्या लढवय्यांनी केलेल्या तातडीच्या उपाययोजना आणि दिलेल्या पाठबळामुळे या आपत्तीला प्रभावी पद्धतीने तोंड देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले. कोविड-19 विरोधात केवळ नियमित आणि योग्य पद्धतीने हात धुणे, चेहरा, डोळे यांना स्पर्श करणे टाळणे आणि सामाजिक अंतर राखणे यांसारख्या अगदी साध्या उपायांच्या मदतीने संघर्ष यशस्वी करता येईल. पंतप्रधानांनी आजच्या भाषणात याच सर्व उपायांचा पुनरुच्चार केला आहे आणि लॉकडाऊन हा या आपत्तीला थोपवण्याचा योग्य उपाय असून, त्यासाठी प्रत्येकाने घरातच राहून दिलेल्या सूचनांचे पालन करून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1610767)
Visitor Counter : 150