गोवा, 26 नोव्हेंबर 2026
इफ्फी अर्थात, 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतता, सहिष्णुता, सहानुभूती, सामाजिक न्याय आणि आंतर-सांस्कृतिक संवाद या विषयांचा वेध घेणारे दहा कथात्मक फिचर चित्रपट प्रतिष्ठित 'आयसीएफटी-युनेस्को गांधी पदका'साठी स्पर्धेत आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने पीआयबी म्हणजेच पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत 'आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक' परीक्षक मंडळाचे सदस्य मनोज कदम आणि ‘इफ्फी’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर पंकज सक्सेना यांनी माध्यमांशी संवाद साधला.
निवडक चित्रपटांमध्ये अर्थपूर्ण विचार मांडण्यासाठी आणि शांततेच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी सिनेमाचा एक माध्यम म्हणून वापर करण्याची सामायिक वचनबद्धता दिसून येते, असे या संवादादरम्यान मनोज कदम यांनी अधोरेखित केले.

चित्रपटांचे परीक्षण करण्याच्या परीक्षक मंडळाच्या दृष्टिकोनाबद्दल स्पष्टीकरण देताना कदम म्हणाले की, कथेचे मानवी स्वरूप आणि गांधीवादी आदर्शांशी, विशेषतः अहिंसा आणि सिनेमाच्या माध्यमातून शांततेचा प्रसार या तत्त्वांशी कथेची असलेली सुसंगती, हा परीक्षणाचा मुख्य निकष होता. यासोबतच, चित्रपटाचे सौंदर्यदृष्टीविषयक आणि तांत्रिक गुण, तसेच चित्रपट निर्मात्याने अपेक्षित संदेश ज्या प्रामाणिकपणाने आणि ठाम विश्वासाने पोहोचवला आहे, हे देखील महत्त्वाचे पैलू असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या इफ्फीच्या 'सीमाविरहित कथा' या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, निवडक चित्रपटांनी प्रेक्षकांना जगाच्या विविध भागांची सफर घडवून अपरिचित संस्कृती आणि दृष्टिकोनांची ओळख करून दिली आहे. ते म्हणाले, "प्रत्येक चित्रपटाची स्वतःची एक क्षमता आणि सौंदर्यदृष्टीविषयक मूल्ये असतात. तो त्या देशातील सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचे प्रतिबिंब दाखवतो. जगभर प्रवास करणारे हे चित्रपट परीक्षकांनाही त्यांच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी सोबत प्रवास करायला लावतात. हीच सिनेमाची खरी ताकद आहे, जी तुम्हाला जगाची ओळख करून देते."
स्पर्धेतील काही चित्रपटांचा उल्लेख करताना कदम यांनी महिलांवरील अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे चित्रण करणाऱ्या आणि स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या 'स्ट्रॉबेरीज' या चित्रपटाचा दाखला दिला. त्यांनी औषधांचे पेटंट आणि आरोग्यसेवेची उपलब्धता यांविषयी चिंता व्यक्त करणाऱ्या, 'द फॉल ऑफ द क्वीन' या चित्रपटाकडेही लक्ष वेधले, तसेच तरुण पिढीसाठी एक महत्त्वाचा संदेश देणाऱ्या 'स्क्रोल' या चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला. अनेक चित्रपट केवळ सामाजिक समस्यांचे चित्रण करण्यापलीकडे जाऊन प्रेक्षकांना व्यावहारिक उपायांवर विचार करण्यास प्रवृत्त करतात, असे त्यांनी नमूद केले. केवळ प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरूनच एखाद्या चित्रपटाची गुणवत्ता ठरवता येत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत बोलताना इफ्फीचे आर्टिस्टिक डायरेक्टर पंकज सक्सेना म्हणाले की, सहिष्णुता, शांतता, परस्पर सामंजस्य आणि आंतर-सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देणारे चित्रपट निवडण्यासाठी आयसीएफटी-युनेस्कोच्या कार्यकक्षेने एक स्पष्ट आराखडा उपलब्ध करून दिला आहे. समाज घडवण्यात सिनेमाची असलेली जबाबदारी अधोरेखित करताना त्यांनी असा इशाराही दिला की, या माध्यमाचा वापर कसा केला जातो यावर चित्रपट फायदेशीर ठरतील की हानिकारक, हे अवलंबून असते.
'ग्लोबल साऊथ'मधील समाज, विशेषतः ज्या समाजांमध्ये जलद सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे होत आहेत, तेथे चित्रपट निर्मितीच्या सर्जनशीलतेसाठी अतिशय पोषक वातावरण उपलब्ध होते, असे सक्सेना यांनी नमूद केले. केनिया, हैती आणि तुर्कीये यांसारख्या देशांतील चित्रपट प्रेक्षकांना बदलत्या सामाजिक वास्तवांची आणि सांस्कृतिक गतिशीलतेची मोलाची माहिती देतात, असे त्यांनी पुढे सांगितले.

चित्रपट निर्मात्यांनी नेहमीच सामाजिक समस्यांवर ठोस उपाय दिले पाहिजेत असे नाही, कारण समर्पक प्रश्न उपस्थित करणे आणि जनमानसात विचारमंथन घडवून आणणे हीदेखील कलेची तितकीच महत्त्वाची कार्ये आहेत, असे देखील त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, "कलाकाराचे काम उपाय सुचवणे हे असू शकते, पण अनुत्तरित प्रश्न सोडून देणे हेदेखील असू शकते. हे पूर्णपणे योग्य आहे, आणि आम्हाला या दोन्ही प्रकारच्या कलाकारांची तितकीच काळजी आहे."
कथांना भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडण्यास काय सक्षम बनवते, या प्रश्नाला उत्तर देताना सक्सेना यांनी सौंदर्यशास्त्र आणि समर्पकता, किंवा स्वरूप आणि आशय हे घटक अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
महेश कुमार यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले.
आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाविषयी
युनेस्कोच्या अधिपत्याखाली पॅरिस येथील 'इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अँड ऑडिओव्हिज्युअल कम्युनिकेशन' (ICFT) यांच्या सहकार्याने 46 व्या इफ्फीमध्ये सुरू करण्यात आलेला 'आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक सन्मान ' महात्मा गांधींच्या अहिंसा, सहिष्णुता, आंतर-सांस्कृतिक सामंजस्य आणि शांततेच्या संस्कृतीचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटांचा गौरव करतो. यंदाच्या स्पर्धेसाठी निवडलेले दहा चित्रपट (सात आंतरराष्ट्रीय आणि तीन भारतीय) विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीतील कथा एकत्र आणतात, ज्या मानवी नातेसंबंध, सामाजिक आव्हाने आणि सामायिक मूल्यांना अधोरेखित करतात.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे