57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

चित्रपट एका रात्रीत हे जग बदलू शकत नाहीत, पण ते मनांची कवाडे उघडून संवादाला प्रोत्साहन देऊ शकतात: फादरलँड चित्रपटाच्या निर्मात्या इवा पुश्चिंस्का यांचे प्रतिपादन


भारत आणि पोलंड यांच्यातील सामायिक इतिहासावर आधारित चित्रपट तयार करण्यासंदर्भातील चर्चा सुरु राहणार

Posted On: 21 NOV 2026 2:03PMby PIB MumbaiRelease ID: 2339542Views: 19

गोवा, 21 नोव्‍हेंबर 2026

 

चित्रपट एका रात्रीत हे जग बदलू शकत नाहीत, पण ते मनांची कवाडे उघडून संवादाला प्रोत्साहन देऊ शकतात आणि लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाबाबत विचार व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात असे पोलिश चित्रपट निर्मात्या आणि 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सादर झालेल्या फादरलँड या पहिल्या चित्रपटाच्या निर्मात्या इवा पुश्चिंस्का यांनी सांगितले.

इफ्फीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी संवादांना प्रोत्साहन देऊन वैविध्यपूर्ण दृष्टीकोनांविषयी समज विकसित करत लोकांना एकमेकांजवळ आणण्यात चित्रपटांच्या भूमिकेवर अधिक भर दिला. “आपल्याला आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधा पाहिजे. आपण लोकांच्या मनाची कवाडे, जीवनाच्या इतर बाजूंच्या दिशेने, जगाच्या इतर बाजूंकडे खुली केली पाहिजेत,”त्या म्हणाल्या.

समकालीन समाजांमधील विभाजानांवर प्रकाश टाकत, पुश्चिंस्का यांनी असे निरीक्षण नोंदवले की कोणतीही एक कथा किंवा उद्देश केवळ एकमेव वैध दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करू शकत नाही. एकमेकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी आपापले दृष्टीकोन घट्ट धरुन बसण्याकडे लोकांचा अधिक कल दिसून येतो हे नमूद करत त्या म्हणाल्या, “असा कोणताही एकच उद्देश, एकच दृष्टीकोन योग्य असतो असे होत नसते. एकमेकांशी बोला, आपण काही सामायिक बाबी शोधून काढूया.”

विविध स्तर असणारी कहाणी असे फादरलँडच्या कथेचे वर्णन करत, पुश्चिंस्का यांनी हा चित्रपट आजच्या जगाशी सुसंगत असलेल्या कल्पनेचा शोध घेतो हे अधोरेखित केले. वर्ष 1949 मधील विभाजित युरोपच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट पूर्व-पश्चिम विभाजन आणि आजही समाजांची घडण करणाऱ्या विभाजनांवर प्रकाश टाकतो. हा चित्रपट, जगात विशेषतः स्थलांतराने चिन्हांकित केलेल्या आजच्या काळात ओळख आणि आपलेपणा यांच्या संदर्भात प्रश्न उभे करतो. हा चित्रपट कशा प्रकारे व्यक्ती आणि त्यांची जन्मभूमी यांच्यातील गुंतागुंतीचे नाते तपासतो हे विषद करत त्यांनी विचारले, “तुमची पितृभूमी कुठे आहे? तुम्ही जिथे राहता तो देश की तुम्ही जी भाषा बोलता ती?त्या भूमीत तुमच्या इतिहासाची मुळे रोवलेली आहेत की तो फक्त तुम्ही स्थायिक आहात तो देश आहे?”

सुप्रसिध्द जर्मन लेखक थॉमस मान आणि त्यांच्या कुटुंबाच्या या कहाणीच्या माध्यमातून फादरलँड हा चित्रपट संस्कृती आणि समाज यांच्यातील नात्याचा शोध घेतो. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती लोकांसाठी आदर्श तसेच प्रेरणास्त्रोत होऊ शकतात असे निरीक्षण पुश्चिंस्का यांनी नोंदवले. हा चित्रपट पालक आणि त्यांची मुळे, भावंडे आणि कलाकार यांच्यातील नात्यासह गुंतागुंतीच्या कौटुंबिक नातेसंबंधांचा आणखी शोध घेतो. हा चित्रपट प्रख्यात कलाकारांच्या मुलांसमोरील आव्हाने आणि पालकांच्या यशस्वी कामगिरीला शोभेलशी कामगिरी करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल असलेली लोकांची अपेक्षा यांचा देखील आढावा घेतो.व्यापक स्तरावर, हा चित्रपट ऐतिहासिक घडामोडी कशा प्रकारे व्यक्तींच्या दैनदिन आयुष्याला आकार देतात याचा मागोवा घेतो.

चित्रपटाच्या दृश्य परिणामाविषयी बोलताना पुश्चिंस्का म्हणाल्या की, फादरलँड हा चित्रपट कृष्णधवल रंगात आणि 4:3 अॅस्पेक्ट गुणोत्तरात चित्रित करण्यात आला असून त्यांनी दिग्दर्शक पावेल पावलीकोवस्की यांच्यासोबत यापूर्वी तयार केलेल्या इडा आणि कोल्ड वॉर या चित्रपटांच्या वेळी देखील हाच दृष्टीकोन स्वीकारण्यात आला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कालखंडाला अस्सलपणा देण्याच्या हेतूने हा पर्याय स्वीकारण्यात आला. “आम्ही या चित्रपटात जो कालखंड दाखवला त्याच्या दृष्टीने चित्रपट अस्सल वाटावा अशी आमची इच्छा होती. फादरलँडला या त्रयीतील तिसरा चित्रपट म्हणायला हरकत नाही,” त्या म्हणाल्या.

निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलताना, त्यांनी सांगितले की फादरलँड ही पोलंड, जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय सह-निर्मिती आहे. या चित्रपटाची कथा जर्मनीमध्ये घडत असली तरी चित्रपटाचे सुमारे 95 टक्के चित्रण पोलंडमध्ये झाले असून या प्रकियेत सहभागी झालेल्या सर्जनशील आणि तांत्रिक पथकांमध्ये बहुतांश पोलिश व्यावसायिकांचा सहभाग आहे. पोलंडमध्ये उध्वस्त आणि दुर्लक्षित रस्ते, इमारतीआणि छोट्या शहरांसह 1949 च्या काळातील जर्मनीचा परिसराचा आभास निर्माण करणारी अनुरूप चित्रीकरण स्थळे उपलब्ध झाली.

पुश्चिंस्का यांनी यावेळी बोलताना भारत आणि पोलंड यांच्यातील सामायिक इतिहासावर आधारित विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात आश्रय घेतलेल्या पोलिश मुलांची कहाणी सांगणारा चित्रपट निर्माण करण्यात स्वारस्य दाखवले. इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की गोवारीकर यांनी या विषावर यापूर्वीच एक पटकथा लिहिलेली आहे. यासंदर्भातील चर्चा पुढे सुरु राहतील आणि संबंधित चित्रपटाचा निर्मिती प्रकल्प आकाराला आणण्याच्या शक्यतांचा शोध घेतला जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या सत्राचे सूत्रसंचालन सईद राबीहाश्मी यांनी केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/संजना चिटणीस/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2339542
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026