गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते स्वनिधी सन्मान पुरस्कार 2026 प्रदान


महाराष्‍ट्राला विविध श्रेणींमध्‍ये पुरस्‍कार

Posted On: 20 NOV 2026 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026

सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या नगरविकास विभागाने 20 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘स्वनिधी सन्मान पुरस्कार 2026’ सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांची उपजीविका अधिक सक्षम करणे, आर्थिक समावेशनाला चालना देणे, डिजिटल व्यवहारांचा वापर वाढवणे आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचवणे या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था आणि भागीदार संस्थांचाही सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू उपस्थित होते.

52 पुरस्कार आणि 5 विशेष सन्मानांचा समावेश असलेल्या या सोहळ्यात राज्ये, शहरे, बँका आणि इतर भागधारकांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला.

पथविक्रेत्यांना सुलभ आणि औपचारिक बँकिंग व्यवस्थेद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्यात उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानाबद्दल स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक यांना सन्मानित करण्यात आले.

जून 2020 मध्ये सुरू झाल्यापासून, पीएम स्वनिधी (प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी) योजनेमुळे सुमारे 81 लाख पथविक्रेत्यांना अंदाजे ₹20,000 कोटी किमतीची 1.21 कोटींहून अधिक कर्जे मिळवणे शक्य झाले आहे.

'स्वनिधी से समृद्धी' (स्वनिधीतून समृद्धी) अंतर्गत 52 लाखांहून अधिक लाभार्थी कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून, यातून केंद्र सरकारच्या आठ कल्याणकारी योजनांतर्गत 1.62 कोटींहून अधिक मंजुरी देण्यात आल्या आहेत.

या पुरस्कारांमध्ये 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेश, 4,900 हून अधिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था  आणि 120 हून अधिक कर्ज देणाऱ्या संस्थांमधील योजनेच्या अंमलबजावणी परिसंस्थेचा समावेश होता.

भाषणांतील प्रमुख ठळक मुद्दे

पीएम स्वनिधी (प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी) योजनेचे फायदे प्रत्येक पात्र पथविक्रेत्यापर्यंत पोहोचवून, विकसित भारत @2047 कडे नेणारे अंत्योदयाचे ध्येय साकार करता येऊ शकते, यावर  मनोहर लाल यांनी भर दिला. या योजनेमुळे पथविक्रेत्यांना सुरुवातीला लहान कर्जे घेऊन पुढे मोठ्या बँक कर्जापर्यंत मजल मारता येते आणि त्यांना आपला व्यवसाय वाढवता येतो. त्यामुळे रोजगाराच्या आणि उपजीविकेच्या संधी वाढतात. तसेच आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षेलाही चालना मिळते, असे त्यांनी अधोरेखित केले.

केंद्र आणि राज्य सरकारे, बँका आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच पीएम स्वनिधी योजनेला यश मिळाले असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

पथविक्रेत्यांना ‘स्ट्रीट वंडर्स’ (रस्त्यावरील कर्तृत्ववान उद्योजक) असे संबोधत, मनोहर लाल यांनी त्यांच्या उद्योजकीय वृत्तीचे आणि चिकाटीचे कौतुक केले. छोट्या व्यवसायांचे यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची त्यांची क्षमता प्रशंसनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यमंत्री तोखन साहू यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

उपस्थितांना संबोधित करताना राज्यमंत्री तोखन साहू यांनी सांगितले की, गरिबांच्या जीवनात घडणारा बदल हा केवळ एका योजनेचा परिणाम म्हणून पाहता कामा नये. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा एकत्रित परिणाम म्हणून या बदलाकडे पाहिले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

पथविक्रेत्यांच्या सक्षमीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या 'स्वनिधी सन्मान पुरस्कार 2026' मध्ये महाराष्ट्राने राज्य आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (यूएलबी - अर्बन लोकल बॉडीज) अशा दोन्ही श्रेणींमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. राज्य श्रेणीमध्ये, महाराष्ट्राने 'इतर राज्ये' गटात 'डिजिटल अवलंब' श्रेणीमध्ये 'सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याचा' पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय, 'योजनेच्या पुनर्रचनेनंतर एकूण कर्ज वितरण' या श्रेणीत राज्याला 'विशेष पुरस्काराने' गौरवण्यात आले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनीही तिन्ही नागरी गटांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट कर्ज कामगिरी’ या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘मेगा आणि दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे’ या गटात छत्रपती संभाजीनगरने, ‘प्रमुख शहरे’ या गटात परभणीने, तर ‘लहान शहरे आणि नगरे’ या गटात परळीने सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुरस्कार पटकावला आहे.

निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2339373) अभ्यागत कक्ष : 4