57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

सर्जनशील संकल्पने पासून ते जागतिक संधी पर्यंत : गोव्यात वेव्हज चित्रपट बाजार 2026 ची सुरुवात


चित्रपटनिर्मात्यांना परस्परांशी जोडण्याची, कथांची जोपासना करण्याची आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीला चालना देण्याची दोन दशके

Posted On: 20 NOV 2026 2:03PMby PIB MumbaiRelease ID: 2339044Views: 10

गोवा, 20 नोव्‍हेंबर 2026

 

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगांमधील संबंध वृद्धींगत करणारा दोन दशकांचा टप्पा ओलांडत गोव्यातील ताज सिदा दे गोवा येथे आज वेव्हज चित्रपट बाजाराच्या 20 व्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे (एनएफडीसी) आयोजित करण्यात आलेल्या या पाच दिवसीय बाजारामध्ये चित्रपट निर्माते, निर्माते, लेखक, गुंतवणूकदार, वितरक आणि चित्रपट उद्योगातील इतर व्यावसायिक यांना सहयोगाच्या संधींची चाचपणी करण्यासाठी आणि सर्जनशील चित्रपटांना जागतिक बाजारांमध्ये ओळख निर्माण करण्यात मदत करण्यासाठी एकत्र येत आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी या सोहळ्यात बीजभाषण केले. फिल्म बाजारच्या लक्षणीय प्रगतीची मांडणी त्यांनी आपल्या बीजभाषणातून केली. 2007 मध्ये 18 देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 204 प्रतिनिधींपासून फिल्म बाजारचा प्रवास सुरु झाला होता, आणि आता या प्रवासाने अलीकडच्या पर्वांमध्ये 2,500 पेक्षा जास्त प्रतिनिधींचा टप्पा गाठला आहे असे त्यांनी नमूद केले. वेव्हज फिल्म बाजार (WAVES Film Bazaar) म्हणजे सर्जनशील दृष्टिकोन आणि व्यावसायिक संधींना परस्परांशी जोडणारे व्यासपीठ असल्याचे ते म्हणाले.

वेव्हज 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात निर्मिती करा, जगासाठी निर्मिती करा हा दृष्टिकोन मांडला होता. या दृष्टीकोनाचा संदर्भही त्यांनी आपल्या बीजभाषणात दिला. भारतातील सर्जनशील प्रतिभेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याचे आणि जागतिक सहकार्याच्या संधी विस्तारण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. फिल्म बाजार हे सहकार्य आणि शोधांचे व्यासपीठ आहे असे ते म्हणाले. कथानकांचे भागीदारीत रूपांतर केले जाऊ शकते आणि सर्जनशीलतेला दीर्घकाळ टिकणारे आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यात परावर्तित करता येऊ शकते, अशा या बाजारपेठेचा जगभरातील चित्रपटकर्मींनी  पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

चंचल कुमार, सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले इफ्फी 57 चे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी भारतीय चित्रपट निर्माते आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक यांना एकत्र आणण्यात चित्रपट बाजाराच्या ठळक भूमिकेला अधोरेखित केले. एखादा चित्रपट पूर्ण होण्याची वाट न बघता हा बाजार त्या चित्रपट निर्मात्यांच्या सर्जनशील प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होत असतो यावर त्यांनी अधिक भर दिला. चित्रपट तयार करणार्याकडे अपूर्ण पाठ्कथा असो अथवा प्रेक्षकांची वाट बघणारा पूर्ण झालेला चित्रपट, वेव्हज चित्रपट बाजार प्रत्येकाचा प्रकल्प पुढे नेण्यासाठी मदत करू शकणाऱ्या लोकांशी गाठ घालून देतो. एकत्र कॉफी पिण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी सुरु झालेला साधा संवाद देखील अर्थपूर्ण सहकार्यांचे मार्ग कसे खुले करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. 

आशुतोष गोवारीकर, महोत्सव संचालक

चित्रपटांच्या परिवर्तनकारी सामर्थ्यावर अधिक भर देत गोवारीकर म्हणाले की लोकांना जगाकडे वेगळ्या पद्धतीने बघण्यासाठी सक्षम करणे ही एक देणगी आहे. नवनव्या लोकांशी संवाद साधून, त्यांच्या संकल्पना सामायिक करून आणि खास करुन, अपूर्ण राहिलेले चित्रपट प्रकल्प पटलावर आणून या चार दिवसांच्या बाजाराचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी महोत्सवासाठी जमलेल्या प्रतिनिधींना केले. सहभागींनी सक्रियपणे संधींचा मागोवा घ्यावा आणि सर्व शक्यतांसाठी स्वतःला खुले ठेवावे असे आवाहन करत त्यांनी येथील प्रत्येक संवादामध्ये एक ‘होकार’ शोधण्याच्या आशेने पाहण्यासाठी प्रोत्साहित केले.

उपस्थितांचे स्वागत करून, एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह यांनी गेली दोन दशकांपासून या चित्रपट बाजाराचा महोत्सवाशी असलेला दीर्घकालीन संबंध लक्षात घेऊन, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) अविभाज्य भाग अशा शब्दांत या चित्रपट बाजाराचे वर्णन केले. चित्रपट बाजार आता आणखी मोठ्या आणि अधिक विस्तृत व्यासपीठामध्ये विकसित झाला असून चित्रपट उद्योगासाठी वाढीव संधी आणि कार्यक्रमांची विस्तृत श्रेणी देऊ करत आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

उजवीकडून - श्री प्रभात, अतिरिक्त सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय; जी. कृष्णकुमार, अध्यक्ष, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC); चंचल कुमार, सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय; आशुतोष गोवारीकर, महोत्सव संचालक; धीरज सिंह, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांनी आभार प्रदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार हे देखील उपस्थित होते.

वेव्हज फिल्म बाजार दोन दशकांचा टप्पा पूर्ण करत आहे. अशावेळी या उपक्रमाची भूमिका केवळ चित्रपट उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर त्याही पलिकडे सहकार्य आणि जागतिक विस्ताराच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंत ही भूमिका विस्तारली आहे. या बाजारपेठेमुळे जगभरातील चित्रपटकर्मी, निर्माते, लेखक, गुंतवणूकदार आणि वितरक परस्परांशी जोडले जातात. या माध्यमातून आश्वासक प्रकल्पांना योग्य भागिदार सहकारी मिळवून देण्याचा प्रयत्न या बाजारपेठेच्या माध्यमातून केला जात आहे. यासोबतच वैविध्यपूर्ण भारतीय कथानके आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवीत यासाठीचे विविध मार्ग खुले करण्याचा प्रयत्नही या बाजारपेठेच्या माध्यमातून केला जात आहे. सर्जनशील कल्पनांचे अर्थपूर्ण भागीदारीत रूपांतर व्हावे आणि अशा कल्पनांना पडद्यावरील अभिव्यक्तीची संधी मिळवून देण्यासाठी हे व्यासपीठ सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/संजना चिटणीस/तुषार पवार/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2339044
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026