आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीतील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक संकुलामध्ये 'युगे युगीन भारत संग्रहालया'च्या विकासाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 11 NOV 2026 3:05PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) नवी दिल्ली येथील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक संकुलात 'युगे युगीन भारत संग्रहालय' (YYBM) विकसित करण्यास आज मंजुरी दिली आहे. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने मूल्यांकन केलेल्या या प्रकल्पाचा एकूण अंदाजपत्रकीय खर्च 3,230 कोटी रुपये इतका आहे.

मुद्देसूद तपशील:

• युगे युगीन भारत संग्रहालय हे भारताच्या अमूर्त आणि मूर्त सांस्कृतिक वारशाचा एकात्मिक पट मांडणारे एक ऐतिहासिक जागतिक दर्जाचे संग्रहालय म्हणून संकल्पित करण्यात आले आहे. यातून भारताच्या संस्कृतीचे सातत्य, विविधता आणि समृद्धी प्रभावीपणे दर्शवली जाईल.

• ऐतिहासिक 'नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक' संकुलाचे वास्तुकलेचे सौंदर्य आणि वारशाचे महत्त्व जपून, त्या वास्तूंचा अनुकूल पुनर्वापर करत त्यांचे एका सार्वजनिक सांस्कृतिक संस्थेत रूपांतर करून हे संग्रहालय विकसित केले जाईल.

• अंदाजे1,78,509 चौरस मीटरच्या प्रस्तावित बांधकामावर उभारले जाणारे हे संग्रहालय अत्याधुनिक संग्रहालय पद्धती, डिजिटल तंत्रज्ञान आणि अभ्यागतांच्या अनुभवाला प्राधान्य देणाऱ्या व्याख्यात्मक प्रणालींनी समृद्ध असेल. जगातील मोठ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालयांच्या तुलनेत, युगे युगीन भारत संग्रहालय हे सर्वाधिक प्रदर्शन क्षेत्र असणारे जगातील सर्वात मोठे संग्रहालय ठरणार आहे.

• हे संग्रहालय विशेष संकल्पनांवर आधारित दालने, प्रदर्शने आणि भारतातील विविध सांस्कृतिक परंपरा, ज्ञानप्रणाली, कलात्मक पद्धती तसेच वारशाच्या विश्लेषणाद्वारे भारताचा आजवरचा सांस्कृतिक प्रवास सादर करेल.

• या प्रकल्पात दालनांचा विकास, वस्तूंचा संग्रह व संवर्धन सुविधा, अभ्यागतांसाठीच्या सोयी-सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल अनुभवांचा समावेश, निसर्गरम्य परिसर, स्मार्ट इमारत यंत्रणा आणि संबंधित पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

• भारताच्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक संदर्भांशी सुसंगत राहून संग्रहालय नियोजन, वारसा संवर्धन, प्रदर्शन रचना आणि शाश्वत सांस्कृतिक व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींनुसार हे संग्रहालय विकसित केले जात आहे.

पार्श्वभूमी:

युगे युगीन भारत संग्रहालयाच्या स्थापनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मे 2023 रोजी केली होती.

सरकारी कार्यालयांचे स्थलांतर झाल्यानंतर, ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकच्या इमारती एका महत्त्वपूर्ण सार्वजनिक व सांस्कृतिक उद्देशासाठी वापरण्याची एक संधी यानिमित्त उपलब्ध झाली आहे. या प्रतिष्ठित इमारतींचे वास्तुकलात्मक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्व जपून त्यांना एक नवीन संस्थात्मक भूमिका देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रस्तावाला 27 जुलै 2026 रोजी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (PIB) मूल्यांकित केले असून, सांस्कृतिक मंत्रालयाने देखील मंडळाच्या शिफारशींना सहमती दर्शवली आहे.

अंमलबजावणीची रणनीती आणि उद्दिष्टे

हा प्रकल्प आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवण्यात येईल. अलंकार या संकल्पनेवरील पहिली दालनिका 2027 च्या उत्तरार्धात नॉर्थ ब्लॉकमध्ये जनतेसाठी खुली होण्याची अपेक्षा आहे. अधिक दालनिकांची भर घालण्यासाठी मॉड्युलर पद्धती विकसित केली जात आहे. युगे युगेन भारत संग्रहालयात प्रदर्शित करण्यासाठी राष्ट्रीय संग्रहालय आणि संस्कृती मंत्रालयाच्या इतर संग्रहालयांमधील, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या (एएसआय) 52 स्थळ संग्रहालयांमधील तसेच विविध राज्य संग्रहालये आणि खासगी संग्रहांमधील सुमारे 18 लाख वस्तूंची ओळख पटवण्यात आली आहे. या वस्तूंच्या आशयाचे आणि संग्रहाचे विश्लेषण केले जात आहे.

वास्तुकला आणि शहरांची दृश्यरचना, गणित आणि खगोलशास्त्र, भाषा आणि लिपी, श्रद्धा आणि आध्यात्मिकता तसेच भारताचे जगाशी संबंध - व्यापार आणि विचार यांसारख्या विषयांवर इतर दालनिकाही विकसित केली जात आहेत.

समन्वित प्रकल्प व्यवस्थापन, रचना आणि तांत्रिक देखरेख, गुणवत्ता सुनिश्चित करणे आणि वेळोवेळी निरीक्षण करणे याद्वारे प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल.

रोजगार निर्मितीच्या संभाव्यतेसह प्रमुख परिणाम

युगे युगेन भारत संग्रहालयामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रांत तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण परिणाम अपेक्षित आहेत.

अपेक्षित खर्च

सविस्तर वास्तुशास्त्रीय आणि प्रदर्शन रचना, अभियांत्रिकी तसेच संग्रहालय नियोजनाच्या आवश्यकतांवर आधारित या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 3,230 कोटी रुपये आहे. यामध्ये संबंधित संस्थांनी केलेल्या तांत्रिक मूल्यांकनाचाही समावेश आहे.

तिकीट विक्री, खाद्यपदार्थ आणि पेय सुविधा, कार्यक्रम आणि जागेचे भाडे, डिजिटल अनुभव, मार्गदर्शित सहली, किरकोळ विक्री केंद्रे आणि अभ्यागतांसाठीच्या इतर सेवांद्वारे संग्रहालयाला नियमित महसूल मिळण्याचीही अपेक्षा आहे. वर्षाला 1 कोटी अभ्यागतांना सामावून घेण्याच्या क्षमतेनुसार संग्रहालयाची उभारणी केली जात आहे.

लाभार्थ्यांची संख्या

राष्ट्रीय सार्वजनिक सांस्कृतिक संस्था म्हणून या संग्रहालयाची संकल्पना असून, ते सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक तसेच इतर अभ्यागतांसाठी खुले असेल.

सार्वजनिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था म्हणून ते भारताच्या सांस्कृतिक वारशाचे अध्ययन, संशोधन, सांस्कृतिक सहभाग आणि आकलनासाठी संधी उपलब्ध करून देईल. या प्रकल्पासाठी लाभार्थ्यांची निश्चित संख्या लागू होत नाही.

समाविष्ट राज्ये आणि जिल्हे

हे संग्रहालय नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक संकुलात उभारण्यात येणार आहे. भौतिक पायाभूत सुविधा राष्ट्रीय राजधानीत केंद्रित असल्या तरी, ही संस्था भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तसेच आंतरराष्ट्रीय अभ्यागतांसाठी सेवा देईल, अशी संकल्पना आहे.

***

Nitin Fulluke / Vaibhav Joshi / Gajendra Devada  / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335140) अभ्यागत कक्ष : 8