कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
Posted On:
05 NOV 2026 3:13PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह 6 नोव्हेंबर 2026 रोजी नॅशनल मीडिया सेंटर, रायसीना रोड, नवी दिल्ली येथे देशभरात 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' (डीएलसी) मोहीम 5 चा औपचारिक शुभारंभ करतील.
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाच्या 'पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभाग' (DoPPW) द्वारे आयोजित सुमारे महिनाभर चालणारी मोहीम 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुरू राहील आणि यामध्ये देशातील 2000 हून अधिक शहरे आणि गावांचा समावेश केला जाईल. डिजिटल तंत्रज्ञानाचा, विशेषतः 'जीवन प्रमाण' ऍपच्या माध्यमातून 'फेस ऑथेंटिकेशन' म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, सोयीस्कर आणि त्रासमुक्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB), यूआयडीएआय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), पेन्शनधारक कल्याण संस्था आणि संरक्षण, रेल्वे व टपाल मंत्रालयासह इतर प्रमुख मंत्रालये व विभाग, तसेच दूरसंचार विभाग, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे.
80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अती-ज्येष्ठ पेन्शनधारकांना, महिला पेन्शनधारकांना आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त असलेल्या पेन्शनधारकांना मदत करण्यावर विशेष भर दिला जात आहे. वाढते वय किंवा आजारपणामुळे मोहिमेच्या ठिकाणी जाण्यास असमर्थ असलेल्या पेन्शनधारकांसाठी घरापर्यंत आणि गृह-आधारित सेवा देखील उपलब्ध करून दिल्या जातील.
या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह 'राष्ट्रव्यापी डीएलसी मोहीम 4.0' दरम्यान मिळवलेले यश आणि उपक्रमांचे दस्तऐवजीकरण करणारी 'संग्रह पुस्तिका' आणि 'कॉफी टेबल ई-बुक' चे देखील प्रकाशन करतील.
या कार्यक्रमाला सहभागी मंत्रालये, विभाग, बँका आणि इतर भागधारक संस्थांचे वरिष्ठ अधिकारी तसेच पेन्शनधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
***
Nitin Fulluke / Shailesh Patil / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai