आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

धनतेरसचा सण आरोग्याचे आणि आरोग्य विषयक प्रतिबंध्यात्मक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करणारा : प्रतापराव जाधव


केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे नागरिकांना निरोगी जीवनशैलीला कौटुंबिक प्राधान्य देण्याचे आणि प्रतिबंधात्मक उपचार पद्धती अंगिकारण्याचे आवाहन

Posted On: 04 NOV 2026 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 नोव्‍हेंबर 2026

 

केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्व नागरिकांना धनत्रयोदशीला, आरोग्य तसेच, प्रतिबंधात्मक आरोग्यदायी जीवनशैली, आपल्या उत्सवाचा एक अविभाज्य घटक बनवण्याचे आवाहन केले आहे. खरी समृद्धी, आपल्या निरोगी आणि सुदृढ शरीरात असल्याचे, जाधव यांनी म्हटले आहे. या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत, जाधव यांनी, सर्व कुटुंबांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे, आजार प्रतिबंधाला प्राधान्य देण्याचे आणि दीर्घकालीन आरोग्यात जाणीवपूर्वक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. 

समुद्रमंथनातून, भगवान धन्वंतरी अमृतकलश हातात घेऊन प्रकट झाले, अशी आख्यायिका असून, त्या निमित्ताने, धनतेरसच्या दिवशीच, धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. भगवान धन्वंतरी, देवांचे वैद्य मानले जात असून, ते आयुर्वेद, म्हणजेच भारताच्या प्राचीन जीवन आणि आरोग्यविज्ञानाशी निगडीत आहेत. त्यांच्या जयंतीचा हा उत्सव, व्यक्ती आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची संधी देतो. 

धनत्रयोदशी सण पारंपरिक रित्या, समृद्धीचे प्रतीक म्हणून  सोने, चांदी किंवा घरातील वस्तू खरेदीशी जोडलेला असला, तरीही, हा उत्सव, हा ही संदेश देतो, की जेव्हा भौतिक सुखांना निरोगी शरीराची जोड मिळते, त्यावेळी त्याचे मूल्य अधिकच वाढते. कुटुंबांनी आपल्या भविष्याच्या समृद्धीची काळजी घेतांनाच, आपले आरोग्यही उत्तम राहील, याला महत्त्व द्यावे, यावर जाधव यांनी भर दिला. 

त्यापुढे, आजार होऊन नये, यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या महत्त्वाकडे लक्ष वेधताना प्रतापराव जाधव यांनी नमूद केले की, आरोग्यसेवेविषयीची चर्चा अनेकदा आजार झाल्यानंतरच सुरू होते. मात्र, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून आजारांना प्रतिबंध करण्यावरही तितकाच भर देणे आवश्यक आहे. निरोगी व्यक्तीचे आरोग्य जतन करण्यावर भर देणाऱ्या ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्’ या आयुर्वेदिक मंत्राचा संदर्भ देत त्यांनी असंसर्गजन्य आजार, बैठी जीवनशैली आणि तणाव यांसारख्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.

आपल्या दैनंदिन सवयी, ज्यात, समतोल पोषक आहार, नियमित व्यायाम आणि चलनवलन, पुरेशी झोप आणि तणाव व्यवस्थापन अशा सर्व गोष्टी आपले आरोग्य उत्तम ठेवण्यात मदत करतात, असे जाधव यांनी सांगितले. आरोग्य चांगले राखण्यासाठी घरी तयार केलेल्या पौष्टिक आहाराला प्राधान्य द्यावे, जंक फूडचे अतिसेवन टाळावे, नियमित शारीरिक हालचाली कराव्यात तसेच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची योग्य काळजी घ्यावी आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या दृष्टीने नियमित योगाभ्यास आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

प्रतिबंधात्मक आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यात आणि आयुष उपचार पद्धतींचे योगदान सांगतांना जाधव म्हणाले की आयुष्मान आरोग्य मंदिरांसारख्या उपक्रमांमुळे समुदाय स्तरावर आयुष आधारित आरोग्यसेवांची उपलब्धता वाढण्यास मदत होत आहे. भारताच्या पारंपरिक औषधोपचार पद्धती देशाच्या आरोग्यसेवा व्यवस्थेत अधिकाधिक जबाबदारीने योगदान देऊ शकतील, यासाठी सुरू असलेले वैज्ञानिक संशोधन, गुणवत्तेचे निकष आणि पुराव्यांवर आधारित उपचार पद्धती यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’च्या संकल्पनेचा संदर्भ देत, जाधव यांनी, जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत छोटे, परंतु अर्थपूर्ण बदल करण्यासाठी  पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचे स्मरण केले.  तंदुरुस्ती ही केवळ वैयक्तिक प्रयत्नांपुरती मर्यादित नसून निरोगी आणि समृद्ध समाजाचा एक महत्त्वाचा पाया आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 2047  पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करताना, अधिक निरोगी आणि आरोग्याप्रती जागरूक नागरिकांची भूमिका देशाच्या विकासाच्या प्रवासात, अत्यंत महत्वाची ठरेल, असे जाधव यावेळी म्हणाले. 

म्हणूनच, या धनतेरसला, आजार प्रतिबंधात्मक निरोगी जीवन शैलीला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्यात एक बांधिलकी म्हणून स्थान द्यावे, असे आवाहन करत, जाधव यांनी सर्वांना आपल्या दैनंदिन जीवनात किमान एक तरी निरोगी सवय लावून घ्यावी आणि कुटुंबातल्या इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. त्याशिवाय,  घरातील ज्येष्ठ व्यक्ती,महिला आणि बालकांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्वांनी योग्य वेळी वैद्यकीय सल्ले घेऊन, निरोगी आयुष्य, ही सामाईक जबाबदारी म्हणून पार पाडावी असेही जधव यांनी म्हटले आहे. 

यंदाच्या धनत्रयोदशीला नागरिकांनी समृद्धीच्या पारंपरिक प्रतीकांपलीकडे जाऊन आरोग्यदायी सवयींचा अवलंब करावा, आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्राधान्य द्यावे, असे जाधव यांनी अधोरेखित केले. ‘आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे’, या शाश्वत तत्त्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332704) अभ्यागत कक्ष : 11