वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यापार आणि आर्थिक सहकार्य अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने लक्झमबर्ग इथे आयोजित भारत, बेल्जियम आणि लक्झमबर्ग आर्थिक महासंघाच्या (BLEU) संयुक्त आर्थिक आयोगाची (JEC) 19 वी बैठक यशस्वीपणे संपन्न


रसद पुरवठा व्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, वित्त तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि कृषी खोद्यात्पादन प्रक्रिया क्षेत्रांतील सहकार्यावर बैठकीत झाली चर्चा

हवाई आणि अंतराळ क्षेत्र, संशोधन, नवोन्मेष आणि उच्च शिक्षणात परस्पर सहकार्य वाढवण्याच्या शक्यतांची भारत, बेल्जियम आणि लक्झमबर्ग आर्थिक महासंघाच्या (BLEU) संयुक्त आर्थिक आयोगाने (JEC) केली चाचपणी

Posted On: 30 OCT 2026 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026

भारत, बेल्जियम आणि लक्झमबर्ग आर्थिक महासंघाच्या (BLEU - Belgium-Luxembourg Economic Union) संयुक्त आर्थिक आयोगाची (JEC) 19 वी बैठक 29 ऑक्टोबर 2026 रोजी लक्झमबर्ग इथे पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून भारत, बेल्जियम आणि लक्झमबर्ग या तीन्ही देशांना परस्पर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचा आढावा घेण्याची, तसेच मुख्य क्षेत्रांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या संधींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले होते.

भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल, बेल्जियम संघराज्य लोकसेवेच्या परराष्ट्र व्यवहार, परराष्ट्र व्यापार आणि विकास सहकार्य विभागाचे जिओ - इकॉनॉमी (जागतिक अर्थव्यवस्था) आणि आर्थिक मुत्सद्देगिरी विभागाचे महासंचालक फिलिप वँडेन बल्के तसेच लक्झमबर्गच्या परराष्ट्र आणि युरोपियन व्यवहार, संरक्षण, विकास सहकार्य तसेच परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे सरचिटणीस हेन्री शुमाकर यांनी या संयुक्त आर्थिक आयोगाच्या बैठकीचे सह अध्यक्षपद भूषवले.

या 19 व्या बैठकीत भारत, बेल्जियम आणि लक्झमबर्गदरम्यानच्या विद्यमान व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचा आढावा घेण्यात आला. तसेच आर्थिक सहभाग वाढवणे, व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ सुरु राहील यासाठीच्या उपाययोजना करणे, तसेच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

या बैठकीत अनेक प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांबाबतीतही सविस्तर चर्चा झाली. याअंतर्गत प्रामुख्याने विमान सेवा जोडणी आणि बंदरांच्या अनुषंगाने रसद पुरवठा व्यवस्था क्षेत्र, नवीकरणीय ऊर्जा तसेच स्वच्छ तंत्रज्ञान, वित्तीय सेवा आणि वित्त तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन, यासोबतच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (ICT), आरोग्य सेवा आणि जीवशास्त्र, आयुर्वेद आणि पारंपरिक औषध पद्धती, तसेच कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग या क्षेत्रांचा समावेश होता.

हवाई आणि अंतराळ क्षेत्र (ॲरोस्पेस), संशोधन आणि नवोन्मेष, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधीचा शोध घेण्याचा संकल्पही या बैठकीत केला गेला. यासोबतच व्यापाराशी संबंधित समस्या दूर करणे, बाजारपेठांमध्ये सुलभ प्रवेशाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी नव्या शक्यतांची चाचपणी करण्याच्या उद्देशाने बाजारपेठेशी संबंधित मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली.

संयुक्त आर्थिक आयोगाच्या या बैठकीमुळे तिन्ही देशांना आपापल्या आर्थिक प्राधान्यक्रमांच्या अनुषंगाने विचारांची देवाणघेवाण करण्याची, विविध क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेण्याची, तसेच व्यावसायिक सहभाग आणि गुंतवणूक भागीदारी वाढवण्यासाठीच्या पर्यायांचा शोध  घेण्याची संधी मिळाली. या बैठकीतील चर्चेमधून भारत, बेल्जियम आणि लक्झमबर्ग यांच्यातील परस्पर हिताच्या आर्थिक संबंधांना पुढची दिशा देण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद आणि सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मत पुन्हा एकदा मांडले गेले.

संयुक्त आर्थिक आयोगाच्या या बैठकीनंतर वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी लक्झमबर्गमधील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या व्यावसायिक संवादादरम्यान त्यांनी भारताची भक्कम आर्थिक प्रगती आणि गुंतवणुकीच्या क्षमतेबद्दल सांगितले.  यासोबतच वित्तीय सेवा, प्रगत उत्पादन, रसद पुरवठा व्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, तसेच संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील सहकार्याच्या संधी देखील त्यांनी अधोरेखित केल्या. लक्झमबर्गमधील कंपन्यांनी भारतात दीर्घकालीन गुंतवणूक करावी, तंत्रज्ञानाच्या बाबतीत भागीदारी करावी तसेच जागतिक पुरवठा साखळीत योगदान देण्यासाठी भारतीय कंपन्यांसोबत एकत्र काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आशिष सांगळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
  

 


(Release ID: 2330505) अभ्यागत कक्ष : 23