गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात सक्षम नागरी संरक्षण यंत्रणा उभारण्याच्या कामाला सुरुवात


पहिल्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नागरी संरक्षण प्रशिक्षकांसाठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाणार

पहिल्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येकी 50 याप्रमाणे एकूण 600 नागरी संरक्षण मुख्य प्रशिक्षकांना नोव्हेंबर 2026 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रशिक्षण देण्याचे नियोजन

भारतीय लष्कराचा कार्यानुभव आणि नागरी संरक्षण स्वयंसेवकांचे जाळे यांची सांगड घालणारा हा उपक्रम, लष्कर आणि नागरी यंत्रणांमधील समन्वय वाढवण्याच्या, तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संस्थात्मक तयारी बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

Posted On: 23 OCT 2026 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2026 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, भारतीय लष्कराच्या सहकार्याने देशात सक्षम नागरी संरक्षण यंत्रणा उभारण्यासाठी प्रथमच संयुक्त प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नागरी संरक्षणाच्या मुख्य प्रशिक्षकांसाठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सक्षम नागरी संरक्षण यंत्रणा उभारण्याची संकल्पना मांडली होती. भविष्यातील सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी या यंत्रणेत आधुनिक साधने, तंत्रज्ञान आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांच्या या संकल्पनेनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दल महासंचालनालयातर्फे भारतीय लष्कराच्या समन्वयाने एक विशेष प्रायोगिक उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय लष्कराकडून नागरी संरक्षणाच्या मुख्य प्रशिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे नागरी संरक्षण यंत्रणेची सज्जता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात, सहभागी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 50 याप्रमाणे एकूण 600 नागरी संरक्षण मुख्य प्रशिक्षकांना नोव्हेंबर 2026 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. भारतीय लष्कराच्या निश्चित केलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये तीन दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुढीलप्रमाणे आहेत, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली, मेघालय, सिक्कीम, आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू. 

समकालीन सुरक्षेसंदर्भातल्या धोक्यांना, शत्रुत्वपूर्ण परिस्थितींना आणि आपत्कालीन प्रसंगांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांची सज्जता वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रशिक्षणात तीन व्यापक क्षेत्रांचा समावेश असेल.

  • धोक्यांविषयी जागरूकता: आधुनिक आणि संकरित युद्धपद्धती, ड्रोनविषयी जागरूकता आणि हवाई हल्ल्यांचे धोके.
  • संरक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद: महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण, अग्निसुरक्षा, रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि अणुसंबंधित धोक्यांविषयी जागरूकता, आपत्तीग्रस्तांचे व्यवस्थापन, शोध आणि बचावकार्य.
  • संवाद आणि समन्वय: आपत्कालीन परिस्थितीतली संवादव्यवस्था, सायबर स्वच्छता, डिजिटल सज्जता, नागरी आणि लष्करी यंत्रणांमधला समन्वय आणि घटनांचे नियंत्रण व व्यवस्थापन.

या उपक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य प्रशिक्षकांच्या नियोजित प्रारूपातून त्याचा व्यापक विस्तार साधण्याची क्षमता. विशेष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मुख्य प्रशिक्षक आपल्या संबंधित राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 100 नागरी संरक्षण स्वयंसेवकांना पुढील प्रशिक्षण देईल. या टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीमुळे सहभागी 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 60,000 नागरी संरक्षण स्वयंसेवकांपर्यंत विशेष प्रशिक्षणाद्वारे विकसित केलेली सज्जता कौशल्ये पोहोचवता येतील. त्यामुळे या उपक्रमाची व्याप्ती आणि परिणामकारकता लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.

 

* * *

राधिका अघोर/राज दळेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327421) अभ्यागत कक्ष : 6