गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारकात वाहिली आदरांजली आणि समारंभाला केले संबोधित

केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘अंमली पदार्थांविरुद्ध लढा’ हा संदेश देणाऱ्या देशव्यापी मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकात श्रद्धांजली अर्पण केली आणि या समारंभाला संबोधित केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘अंमली पदार्थांविरुद्ध लढा’ हा संदेश देणाऱ्या देशव्यापी मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

Posted On: 21 OCT 2026 1:41PM by PIB Mumbai

स्वातंत्र्यापासून ते आजतागायत राष्ट्राच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी आपण राष्ट्रीय पोलीस स्मारकात एकत्र आलेलो आहोत, असे अमित शाह म्हणाले. स्वातंत्र्यानंतर सुमारे आठ दशकांनंतर भारत आज संपूर्ण जगात सन्मान आणि आदराच्या स्थानी उभा  आहे. या कामगिरीचा पाया आपल्या शूर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाने रचला आहे, असे शाह यांनी सांगितले. या शूरवीरांनी आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमेवर रक्षण करताना दिलेल्या  सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत त्याविना आज आपण कुठे असतो, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही असे ते म्हणाले.

भारतीय पोलिसांसाठी 2026 हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे, असे अमित शाह म्हणाले.  भारताला कित्येक दशकांपासून पोखरणाऱ्या नक्षलवादापासून देश  31 मार्च 2026 रोजी मुक्त झाला. 1981 पासून मार्च 2026 पर्यंत देशाने नक्षलवादामुळे अनेक संकटांना तोंड दिले. या काळात अनेक शूर पोलिस आणि निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. सुमारे 3,600 सुरक्षा कर्मचारी यात शहिद झाले तर 13,700 निष्पाप नागरिक प्राणाला मुकले. प्राण गमावलेल्यांच्या जिवलगांचे  नुकसान कधीही भरुन काढता येण्यासारखे नाही असे सांगून 1.4 अब्ज नागरिकांसह संपूर्ण राष्ट्र त्यांचा त्याग आणि समर्पणाबद्दल कृतज्ञ आहे , असे त्यांनी सांगितले.

सर्व सरकारी सेवांपैकी पोलीस सेवा ही सर्वात आव्हानात्मक सेवांपैकी एक आहे. देशातील प्रत्येक नागरिक रक्षाबंधन, होळी, दिवाळी आणि ईदसारखे सण उत्साहात साजरा करतो, परंतु पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र अनेकदा हे सण साजरे करण्यासाठी सुट्टी मिळत नाही, असे अमित शाह म्हणाले. 

लोक सण-उत्सव आपल्या कुटुंबीयांसोबत साजरे करत असताना पोलीस कर्मचारी मात्र कर्तव्यावर राहून अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करतात, वाहतूक व्यवस्थापन करतात आणि सार्वजनिक सुरक्षितता कायम राखतात, असे त्यांनी सांगितले. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कुटुंबापासून दूर राहून देशसेवेसाठी समर्पित करणे, ही देशासाठी मोठी सेवा आहे, असेही ते म्हणाले.

देशभरात पोलीस कर्मचाऱ्यांनी असामान्य संयम, आत्मनियंत्रण, शिस्त, धैर्य आणि समर्पण दाखवून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे अमित शाह म्हणाले.अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षणाची पहिली आणि शेवटची फळीही पोलीस कर्मचारीच आहेत, असे त्यांनी सांगितले. सीमांवर तैनात असलेल्या आणि देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) सर्व जवानांविषयी त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. कुटुंबापासून दूर राहून हे जवान निवडणुका, सण-उत्सव, आंदोलने किंवा सीमासुरक्षेची कर्तव्ये अशा प्रत्येक प्रसंगी सतर्क राहतात आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी देतात. देशाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी ते सातत्याने कर्तव्य बजावत असतात. लोकशाहीचे रक्षण असो किंवा लोकशाही प्रक्रियांचे सुरळीत संचालन, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांशिवाय ही कामे पूर्ण होऊ शकतील, अशी कल्पनाही करता येत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असून, त्यांपैकी तीन आव्हाने अनेक दशकांपासून कायम होती. आता काश्मीर, ईशान्य भारत आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी कारवायांनी प्रभावित भाग या तीन प्रमुख संवेदनशील क्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. या प्रदेशांमध्ये विकासाला अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, विकासाच्या बाबतीत देशाच्या इतर भागांशी स्पर्धा करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

 देश अद्याप सर्व समस्यांपासून पूर्णपणे मुक्त झालेला नाही आणि अनेक आव्हाने अजूनही कायम आहेत असेही शाह यांनी नमूद केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने 31 डिसेंबर 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी 2026 च्या उर्वरित काळात आणि त्यानंतरच्या 2027, 2028 आणि 2029 या तीन वर्षांत अंमली पदार्थांविरोधात एकत्रितपणे लढा दिला जाणार आहे. हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अंमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी यांमुळे पुढील पिढ्यांचे भविष्य धोक्यात येते, अर्थव्यवस्थेवर अनावश्यक भार पडतो आणि अनेकदा राष्ट्रविरोधी हेतू असलेल्या संघटनांना आर्थिक बळ मिळते, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या ‘नशामुक्त भारत’ या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी देशभरातील पोलीस दलांनी पूर्ण समर्पणाने सहभागी व्हावे आणि भावी पिढ्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले.

***

Nilima Chitale / Bhakti Sontakke / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326128) अभ्यागत कक्ष : 15