माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताने केवळ जागतिक आशयाची बाजारपेठ न राहता जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम माध्यम आणि मनोरंजन कंपन्यांचा निर्माता बनण्याकडे वाटचाल केली पाहिजे: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांचे सीआयआय बिग पिक्चर समिट 2026 मध्ये प्रतिपादन
भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला 100 अब्ज डॉलर पर्यंत नेण्यासाठी सीआयआयचा कृती आराखडा प्रसिद्ध
Posted On:
15 OCT 2026 8:16PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑक्टोबर 2026
भारताने केवळ जागतिक आशयाची बाजारपेठ न राहता जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम माध्यम आणि मनोरंजन कंपन्या निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी केले आहे. “माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे नवीन अर्थशास्त्र: भारताच्या भविष्यातील जागतिक माध्यम कंपन्यांची उभारणी” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय सीआयआय बिग पिक्चर समिट 2026 च्या उद्घाटन सत्राला चंचल कुमार यांनी संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. मूळ बौद्धिक संपदा, शाश्वत व्यवसाय प्रारूप आणि जागतिक बाजारपेठेच्या विस्तारावरही या उद्योगांनी लक्ष केंद्रित करावे, असे ते म्हणाले. भारताला आपली समृद्ध कथाकथन परंपरा, सांस्कृतिक विविधता आणि सर्जनशील प्रतिभेचे चिरस्थायी आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यांमध्ये रूपांतर करण्याची संधी आहे, असे ते म्हणाले.

भारताला सर्जनशील आशय निर्मिती, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मीडिया कंपन्यांचा एक प्रमुख स्रोत म्हणून स्थापित करणे हा या शिखर परिषदेचा उद्देश आहे..
चंचल कुमार यांनी या परिषदेची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “भारतात निर्मिती करा, जगासाठी निर्मिती करा” या वेव्हज 2025 च्या दूरदृष्टीशी जोडत नावीन्य आणि विश्वास या दोन्हींवर भर दिला. भारताची सर्जनशील परिसंस्था मजबूत करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना चंचल कुमार यांनी वेव्हज, वेव्हज बाजार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) आणि इंडिया सिने हब यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. सर्जनशीलता आणि बौद्धिक संपदेचे संरक्षण करण्यासाठी एका मजबूत बनावट-विरोधी चौकटीच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. “भारतात निर्मिती करा. भारतात मालकी हक्क मिळवा. भारतातून विस्तार करा. जगापर्यंत पोहोचवा” हा दृष्टिकोन त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला.
या शिखर परिषदेत भारतीय उद्योग महासंघाचा ‘माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे नवे अर्थशास्त्र’ हा श्वेतपत्रिकेच्या स्वरूपातील अहवालही प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला 2030 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी एक आराखडा मांडण्यात आला आहे. या क्षेत्राच्या वाढीला गती देण्यासाठी जलद सुधारणा, अधिक मजबूत प्रादेशिक बाजारपेठा आणि मोजता येण्याजोगी अंमलबजावणी करण्याचे आवाहन या श्वेतपत्रिकेत करण्यात आले आहे.

शिखर परिषदेचे अध्यक्ष आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी यांनी व्यवसाय प्रारूपांचा मूलभूत स्तरावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. "मोठा प्रेक्षकवर्ग ही केवळ एक सुरुवात आहे. ते स्वतः एक व्यवसाय प्रारूप नाही."असे ते म्हणाले. प्रेक्षक मूल्य, जाहिरातदारांना मिळणारे मोजता येण्याजोगे परिणाम आणि गुंतवणूकदारांना मिळणारा शाश्वत परतावा यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिखर परिषदेच्या सह-अध्यक्ष आणि यूट्यूब इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक गुंजन सोनी यांनी सर्जनशीलता आणि संस्कृती यांना भारताच्या 'विकसित भारत' या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देणारी आर्थिक शक्ती म्हणून संबोधले. डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तरुण निर्मात्यांच्या आपल्या कल्पना आणि स्थानिक वैशिष्ट्यांचे रूपांतर जागतिक दर्जाच्या उद्योगांमध्ये करता येईल असे त्या म्हणाल्या.
जागतिक बदलांशी जुळवून घेण्यासाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी सहज उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे मत शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष आणि जेटसिंथेसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नवानी यांनी व्यक्त केले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी कल्पनाशक्ती आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या क्षमतेमधील दरी वेगाने कमी करता येईल, असेही ते म्हणाले.
चंचल कुमार यांनी 150 हून अधिक गुंतवणूकदार आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणाऱ्या 'वेव्ह्स ग्लोबल इन्व्हेस्टर अँड इन्व्हेस्टी मीट'चे उद्घाटनही केले. या उपक्रमाने वेव्हएक्स (WaveX) आणि वेव्ह्स बाजार (WAVES Bazaar) मधील सुमारे 20 सहभागींना जोडले. यामुळे गुंतवणूकदार आणि उदयोन्मुख सर्जनशील उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.

पीआयबी मुंबई |राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324110)
अभ्यागत कक्ष : 12