युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'विकसित भारतासाठी नशामुक्त युवा' अभियानांतर्गत 'माय भारत'ने 1,469 ठिकाणी ‘युवा संसद'आणि 'युवा मेळावे'केले आयोजित

Posted On: 12 OCT 2026 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026

'विकसित भारतासाठी नशामुक्त युवा'अभियानाचा एक भाग म्हणून, 'माय भारत'ने आपल्या सहयोगी संस्थांच्या सहकार्याने, '100 आठवडे अभियान' अंतर्गत 10 ऑक्टोबर 2026 रोजी 'नेबरहुड  युवा संसद' (एनवायपी) आणि 'युवा मेळावे' आयोजित केले. या देशव्यापी उपक्रमात 34 राज्यांमधील 1,469 ठिकाणांचा समावेश होता. या कार्यक्रमात 3.65 लाखांहून अधिक तरुण आणि नागरिकांनी भाग घेतला. यामुळे नशामुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक वचनबद्धतेला बळकटी मिळाली.

तळागाळातील तरुणांचा सहभाग वाढवणे, अंमली पदार्थांच्या सेवनाच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना अमंली पदार्थांच्या गैरवापराला प्रतिबंध करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्यास प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. गट स्तरावर आयोजित केलेल्या ' युवा संसदे'मध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित आव्हाने, जनजागृतीला कृतीत उतरवण्याच्या रणनीती आणि बदलाच्या प्रेरणादायी कथा यांवर चर्चा झाली. या चर्चेमुळे तरुणांना निरोगी आणि अंमली पदार्थमुक्त समाजाचे समर्थक बनण्याची प्रेरणा मिळाली.

या कार्यक्रमांमध्ये युवकांच्या नेतृत्वाखाली 'नशा मुक्त युवा प्रतिज्ञा', घोषवाक्य-लेखन स्पर्धा, स्वाक्षरी मोहीम, वादविवाद स्पर्धा, पथनाट्ये आणि संवादात्मक चर्चा असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांनी सहभागींना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास तसेच अमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध करण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवण्यास प्रोत्साहित केले.

या उपक्रमात लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला. एक खासदार आणि पाच आमदार अशा एकूण सहा लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमांना हजेरी लावली.

'100 आठवडे मोहिमे'अंतर्गत देशव्यापी स्तरावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून अमली पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येला तोंड देण्यासाठी सामूहिक कृती, सामुदायिक सहभाग आणि युवा नेतृत्वाची भूमिका अधोरेखित झाली. युवा संसद आणि युवा मेळाव्यांच्या माध्यमातून,'माय भारत'तरुणांना सामाजिक बदलाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि 'विकसित भारतासाठी नशामुक्त युवा' हे स्वप्न साकार करण्यासाठी योगदान देण्यास सातत्याने प्रोत्साहित करत आहे.


सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2322192) अभ्यागत कक्ष : 11