अर्थ मंत्रालय
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन, सिंगापूरच्या दौऱ्यावर, या भेटीत सिंगापूर मधील नेत्यांशी उच्चस्तरीय बैठकांचे सत्र तसेच तेथील उद्योगांच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांशी साधणार संवाद
केंद्रीय वित्तमंत्री हेज फंड आणि पोर्टफोलिओ फंड व्यवस्थापकांसमवेत व्यवसायकेंद्रित गोलमेज परिषदेत होणार सहभागी
Posted On:
09 OCT 2026 7:46AM by PIB Mumbai
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन 9 ते 11 ऑक्टोबर 2026 दरम्यान, सिंगापूरच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात त्या सिंगापूर मधील नेत्यांसमवेत उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार असून उद्योग आणि गुंतवणूक समूह तसेच जागतिक गुंतवणूकदार संस्थांच्या प्रमुखांशी आणि वरिष्ठांशी संवाद साधणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान, सीतारामन सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग, सिंगापूरचे उपपंतप्रधान गॅन किम योंग आणि सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री डॉ. विवियन बालकृष्णन यांची भेट घेतील.
या संवादसत्रांमध्ये भारत-सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा केली जाईल आणि भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेच्या निष्कर्षांच्या अंमलबजावणीला पुढे नेले जाईल. यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल आर्थिक संपर्क, भांडवली बाजार, कररचना, सेमीकंडक्टर्स, प्रगत उत्पादकता, कौशल्य आणि हवाई वाहतूक इत्यादी मुद्द्यांवर विचारविनिमय होईल.
सिंगापूर हा भारताचा थेट परकीय गुंतवणुकीमधील सर्वात मोठा स्रोत असून एप्रिल 2000 ते मार्च 2026 या कालावधीत येथून झालेली एकूण थेट परकीय गुंतवणूक सुमारे 194.6 8अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सिंगापूरच्या जी आय सी आणि टेमासेक यांच्यासह संस्थात्मक गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक आहे.
सिंगापूरमधील गुंतवणूक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्रीय वित्तमंत्री 'सरकार-ते-व्यावसायिक' बैठकांच्या मालिकेच्या माध्यमातून सिंगापूर मधील आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आणि व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधतील. तसेच हेज फंड आणि पोर्टफोलिओ फंड व्यवस्थापकांसोबतच्या गोलमेज परिषदेतही सहभागी होतील. या संवादामुळे भारतातील विकासाची वाटचाल, गुंतवणुकीच्या संधी आणि बदलते जागतिक आर्थिक आणि वित्तीय परिदृश्य या संदर्भात आघाडीच्या जागतिक गुंतवणूकदारांशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वरिष्ठ उद्योग क्षेत्रातील नेते तसेच आघाडीच्या जागतिक वित्तीय संस्था, गुंतवणूक कंपन्या आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकांची मालिकाही घेणार आहेत. या बैठकांमध्ये पुढील संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असेल:
गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (GIC), टेमासेक होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड (Temasek), डीबीएस बँक लिमिटेड (DBS), स्टँडर्ड चार्टर्ड बँक, ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट (BII), IHH हेल्थकेअर बेरहाड (IHH),मित्सुबिशी UFJ फायनान्शियल ग्रुप (MUFG) — आशिया-पॅसिफिक विभाग,बी कॅपिटल (B Capital), एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स (HPS)
याशिवाय, स्कॅन्डिनेव्हिस्का एन्स्किल्डा बँकेच्या (SEB) अध्यक्षांसोबत, मित्सुई अँड कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या संचालकांसोबत तसेच टीपीजीचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक भागीदार यांच्यासोबतही बैठका होणार आहेत.
राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत विकास निधी आणि गिफ्ट सिटी यांसारखे व्यासपीठ सिंगापूरच्या भांडवलासाठी अनेक संधी उपलब्ध असून यामध्ये गुंतवणूक साधने आणि निधींचाही समावेश आहे.
केंद्रीय वित्तमंत्रालय आणि इतर संबंधित मंत्रालये आणि औद्योगिक आस्थापना यांच्या सहयोगाने सिंगापूरचे गुंतवणूकदार आणि भारतीय कंपन्या, वित्तीय संस्था आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधणे शक्य होईल आणि निश्चित केलेल्या गुंतवणुकीच्या संधी पुढे नेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहाय्य करतील.
या दौऱ्यातून सिंगापूरसोबतची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला आहे. विशेषतः, दोन्ही देशांमधील मजबूत राजकीय संबंधांचा उपयोग अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, व्यावसायिक भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक क्षेत्रात ठोस आणि सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
***
Neha Kulkarni / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2321315)
अभ्यागत कक्ष : 10