दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंवाद फसवणुकीविरुद्ध नागरिक बनले सायबर योद्धा, संचार साथी पोर्टलला भेट देणाऱ्यांच्या संख्येने ओलांडला 30 कोटींचा टप्पा
14 लाखांपेक्षा जास्त हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल हँडसेट शोधून काढले
आपल्या नावावर किती मोबाईल जोडण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी नागरिकांकडून आलेल्या 4 कोटींपेक्षा जास्त विनंत्यांचे निराकरण
संचार साथी पोर्टलवर नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे आर्थिक फसवणूक धोका निर्देशक यंत्रणेलाही झाली मोठी मदत, 5,000 कोटींपेक्षा जास्तीची संभाव्य सायबर फसवणूक रोखण्यात मिळाले यश
Posted On:
05 OCT 2026 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,5 ऑक्टोबर 2026
संचार साथी पोर्टलचा (www.sancharsaathi.gov.in) मे 2023 मध्ये प्रारंभ झाला होता. तेव्हापासून देशभरातील नागरिकांनी या पोर्टलला 30 कोटींपेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे. यातून दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी या पोर्टलवर दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते. हे पोर्टल दूरसंवाद विभागाने विकसित केले असून, यामुळे प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याच्या हाती सुलभ आणि सहजतेने वापरता येणारे साधन उपलब्ध झाले आहे. या पोर्टलचा वापर करून नागरिकांना संशयास्पद कॉल किंवा संदेशाची तक्रार करणे, आपल्या नावावर किती मोबाईल जोडण्या सुरू आहेत हे जाणून घेणे, हरवलेला किंवा चोरीला गेलेला हँडसेट ब्लॉक करणे आणि नवीन हँडसेट खरेदी करण्यापूर्वी तो अस्सल आहे की नाही हे तपासण्यासाठीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या पोर्टलवर नोंदवलेल्या प्रत्येक संशयास्पद माहितीमुळेही इतर अनेक लोकांचे रक्षण होते. नागरिकांनी संचार साथीवर सामायिक केलेल्या माहितीचे रुपांतर कृतीयोग्य माहितीमध्ये केले जाते, यामुळे दूरसंवाद विभागासह, बँका आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना, फसवणूक करणाऱ्यांकडून पुढील नव्या व्यक्तिला लक्ष्य करण्याआधीच त्यांना रोखण्यास मदत होते. एका अर्थाने संचार साथीचा वापर करणारा प्रत्येक नागरिक एक सायबर योद्धा आणि सायबर फसवणुकीविरुद्धची ढाल म्हणून काम करत आहे.
प्रत्येक नागरिकाच्या हाताच्या बोटांवर उपलब्ध असलेली सेवा
संचार साथीच्या माध्यमातून खाली नमूद नागरिक केंद्रित सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध झाल्या आहेत :
- चक्षू – संशयास्पद फसवणूक संदेश आणि स्पॅमची तक्रार करा: संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश – जसे की बनावट केवायसी किंवा बिल भरण्याचे अलर्ट, सरकार, पोलिस किंवा बँक अधिकारी असल्याचा बनाव करणे, तसेच गुंतवणूक - नोकरी किंवा कर्जाच्या फसव्या ऑफर्स याबाबतीत सुलभपद्धतीने तक्रार करता येते.
- आपल्या नावावरील मोबाईल जोडण्या जाणून घ्या: आपल्या नावाचा वापर करून जारी केलेल्या सर्व मोबाईल जोडण्या तपासा आणि आपण न घेतलेल्या किंवा ज्यांची आता गरज नाही अशा जोडण्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी त्याबद्दल माहिती द्या.
- आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल हँडसेट ब्लॉक करा: आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल हँडसेट संपूर्ण देशात कुठेही वापरला जाऊ नये यासाठी, अशा हँडसेटला सर्व दूरसंवाद सेवा देणाऱ्या कंपन्यांवर ब्लॉक करा. यावेळी अशा हँडसेटचा शोध घेणे शक्य होते तसेच फोन सापडल्यानंतर तो अनब्लॉकही करता येतो.
- आपल्या मोबाईल हँडसेटची अस्सलता जाणून घ्या: नवीन किंवा वापरलेला फोन खरेदी करण्यापूर्वी त्याचा आयएमईआय क्रमांक तपासून तो अस्सल आहे का याची पडताळणी करा.
- भारतीय क्रमांकांसह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल्सची तक्रार करा: देशांतर्गत (+91) क्रमांकांच्या स्वरुपात मात्र परदेशातून येणाऱ्या कॉल्सची तक्रार करा. यामुळे बेकायदेशीर चालवल्या जाणाऱ्या दूरसंवाद यंत्रणांवर कारवाई करण्यास सरकारला मदत होते.
संपर्क विषयक विश्वासार्ह तपशील: कोणतीही माहिती सामायिक करण्यापूर्वी बँका आणि वित्तीय संस्थांचे अस्सल ग्राहक सेवा क्रमांक, ईमेल आयडी आणि संकेतस्थळांच्या पत्त्यांची पडताळणी करा.
स्वतः जागरूक राहा: कर्जविषयक बनावट ॲप्स, गुंतवणुकीतील फसवणूक, नोकरीसाठीचे फसवे कॉल्स आणि बनावट ट्रॅफिक चलान यांसारख्या वारंवार वापरात असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांबद्दल जनजागृतीपर माहिती मिळवा.
संचार साथीच्या माध्यमातून नागरिकांना काय साध्य झाले
'संचार साथी' डॅशबोर्ड नागरिक आणि दूरसंचार विभागाने एकत्रितपणे साध्य केलेल्या कामगिरीची व्याप्ती दर्शवतो:
संचार साथी पोर्टलला 30 कोटींहून अधिक भेटी.
60.96 लाख हरवलेले अथवा चोरीला गेलेले मोबाईल हॅंडसेट्स ब्लॉक करण्यात आले. 37.85 लाख मोबाईलचा शोध घेण्यात आला आणि 14 लाखांहून अधिक पुन्हा मिळवण्यात आले.
नागरिकांकडून त्यांच्या नावावरील मोबाईल कनेक्शन्सची पडताळणी आणि त्याबाबत तक्रार करण्यासाठी केलेल्या 4 कोटींहून अधिक विनंत्यांचे निवारण करण्यात आले.
फसवणुकीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या संशयास्पद संवादांबाबत 12.80 लाख तक्रारी 'चक्षू' माध्यमातून प्राप्त झाल्या. त्या आधारे 59.82 लाख प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. यामध्ये 50 लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शन्स बंद करण्याचा समावेश आहे.
आर्थिक फसवणूक धोका निर्देशक यंत्रणेच्या मदतीने 5,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची संभाव्य सायबर-फसवणूक रोखण्यात आली.
जन भागीदारी : प्रत्येक नागरिक सायबर योद्धा
जेव्हा एखादा नागरिक 'चक्षू' मंचावर संशयास्पद कॉल किंवा संदेशाची तक्रार करतो, किंवा स्वतःच्या नावावर कधीही न घेतलेल्या मोबाइल कनेक्शनबाबत माहिती देतो, तेव्हा त्याचा फायदा केवळ त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही. लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाइल क्रमांकाची, उपकरणाची किंवा पद्धतीची माहिती, अशा प्रत्येक तक्रारीतून दूरसंचार विभागाला मिळते. यामुळे आणखी नागरिकांना लक्ष्य केले जाण्यापूर्वीच पुनर्पडताळणी आणि कनेक्शन बंद करण्यासारखी कारवाई वेळेवर करणे शक्य होते. नागरिकांकडून मिळालेल्या अशा माहितीच्या आधारे 50 लाखांहून अधिक मोबाइल कनेक्शन्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे, 'संचार साथी' वापरणारे नागरिक केवळ या मंचाचे लाभार्थीच नाहीत, तरआपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करणारे, ते सायबर योद्धे आहेत.
नागरिकांनी दिलेली माहिती आर्थिक फसवणूक धोका निर्देशक यंत्रणा आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मसाठी साहाय्यभूत
दूरसंचार विभागाच्या व्यापक फसवणूक प्रतिबंधक प्रणालीसाठी नागरिकांनी दिलेली माहिती, महत्त्वाच्या स्रोतांपैकी एक आहे. आर्थिक फसवणूक धोका निर्देशक, आर्थिक फसवणुकीशी संभाव्य संबंधित मोबाईल क्रमांकांची जोखीम आधारित माहिती पुरवणारा, एक प्रमुख स्रोत आहे. ही गुप्त माहिती डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म अर्थात डिजिटल गुप्तवार्ता मंचाद्वारे बँका, पेमेंट सेवा प्रदाते, दूरसंचार सेवा प्रदाते आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत सुरक्षितपणे सामायिक केली जाते. यामुळे त्यांना त्यांच्या फसवणूक शोध आणि व्यवहार देखरेख प्रणालीमध्ये टेलिकॉम रिस्क सिग्नल समाविष्ट करता येतात आणि नागरिकांच्या खात्यातून पैसे जाण्यापूर्वीच संशयास्पद व्यवहाराबद्दल अलर्ट देता येतो किंवा संशयास्पद व्यवहार होण्याआधीच थांबवता येतो. आर्थिक फसवणूक धोका निर्देशकाने संभाव्य सायबर फसवणुकीतून होऊ शकणारे 5,000 कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान टाळण्यास मदत केली आहे. संचार साथी प्रणाली डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या 1600 हून अधिक हितधारकांना गुप्त माहिती पुरवते. यामुळे समन्वित कारवाईसाठी समन्वित सरकार दृष्टिकोन शक्य होतो. अशाप्रकारे सतर्क नागरिकाने दिलेली माहिती दूरसंचार, वित्तीय आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रणालींमध्ये प्रसारित होते आणि इतर अनेकांचे संरक्षण करते.
14 लाखांहून अधिक हरवलेले आणि चोरीला गेलेले हँडसेट परत मिळवण्यात आले
दूरसंचार विभाग (DoT), दूरसंचार सेवा प्रदाते आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलीस प्राधिकरणे यांच्यात सतत होणाऱ्या तांत्रिक सुधारणा, स्वयंचलित कार्यप्रवाह आणि घनिष्ठ समन्वयामुळे, आतापर्यंत 60.96 लाख हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत, 37.85 लाखांचा शोध घेण्यात आला आहे आणि 14 लाखांहून अधिक हँडसेट परत मिळवण्यात आले आहेत.
सोपे, बहुभाषिक आणि सुलभ
संचार साथी पोर्टल सोप्या आणि वापरकर्त्यासाठी सुलभ सेवासुविधांसह तयार करण्यात आले आहे, ज्याला सार्वजनिक डॅशबोर्ड आणि दूरसंचार सुरक्षा, फसवणूक प्रतिबंध आणि जबाबदार डिजिटल पद्धतींवरील व्यापक जनजागृती सामग्रीचा आधार आहे. संचार साथी मोबाईल ॲप, इंग्रजी, हिंदी आणि 21 प्रादेशिक भाषांमधून उपलब्ध असून, नागरिकांना त्यांच्या स्वतःला समजणाऱ्या भाषेत सर्व सेवा त्यांच्या मोबाईलवरून वापरण्याच्या सोयीसह उपलब्ध करून देते.
दूरसंचार विभागाचे नागरिकांना आवाहन
दूरसंचार विभाग प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला आवाहन करत आहे की, त्यांनी आपल्या नावावर जारी केलेले मोबाईल कनेक्शन तपासण्यासाठी संचार साथी (www.sancharsaathi.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संचार साथी ॲपचा वापर करावा आणि प्रत्येक संशयास्पद कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशाची तक्रार करावी. पोर्टलवर किंवा संचार साथी ॲप वापरताना घालवलेले काही क्षण एका नागरिकाला आणि इतर अनेकांना फसवणुकीपासून वाचवू शकतात. ज्या नागरिकांनी आधीच पैसे गमावले आहेत किंवा जे सायबर-गुन्ह्याचे बळी ठरले आहेत, त्यांनी तात्काळ सायबर-गुन्हेगारी हेल्पलाइन 1930 वर किंवा https://www.cybercrime.gov.in येथे या प्रकरणाची तक्रार करावी.
संचार साथी मोबाईल ॲप येथून डाउनलोड करता येईल:
अँड्रॉइडसाठी: https://play.google.com/store/apps/details?id=com.dot.app.sancharsaathi
आयओएससाठी: https://apps.apple.com/in/app/sanchar-saathi/id6739700695

Follow DoT Handles for more: -
X - https://x.com/DoT_India
Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa
निलिमा चितळे/तुषार पवार/सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
(Release ID: 2319362)
अभ्यागत कक्ष : 9