उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जी आणि थिरू के. कामराज यांना वाहिली आदरांजली
Posted On:
02 OCT 2026 12:24PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज महात्मा गांधी जी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री थिरू के. कामराज यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
राजघाट येथे उपराष्ट्रपतींनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या शाश्वत वारशाचे स्मरण करताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, महात्मा गांधी यांचा सत्य आणि अहिंसेवरील अढळ विश्वास, न्यायाप्रती असलेली दृढ वचनबद्धता आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेवरील सखोल विश्वास मानवतेला सतत प्रेरणा देत आहे.
ते म्हणाले की, महात्मा गांधी यांचे जीवन आणि संदेश हा शांतता, करुणा, निस्वार्थीपणा आणि सेवेचा एक शाश्वत दीपस्तंभ आहे. त्यांनी सर्वांना महात्मा गांधी यांनी जोपासलेल्या मूल्यांप्रती आपली वचनबद्धता पुन्हा दृढ करण्याचे आणि एक न्याय्य, सुसंवादी आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन केले.
विजय घाट येथे उपराष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
शास्त्री यांचे वर्णन शांत सामर्थ्य आणि विलक्षण जिद्दीचे नेते म्हणून करताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, त्यांनी नम्रता, सचोटी आणि देशाप्रती असलेल्या अढळ वचनबद्धतेचे उदाहरण घालून दिले. त्यांनी आठवण करून दिली की, भारताच्या प्रवासातील एका महत्त्वपूर्ण क्षणी शास्त्री यांच्या नेतृत्वाने आत्मविश्वास आणि एकता निर्माण केली, तर त्यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेने देशाच्या सैनिकांच्या बलिदानाला आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला कायमस्वरूपी ओळख मिळवून दिली.
उपराष्ट्रपती म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन ही एक शक्तिशाली आठवण आहे की खरे नेतृत्व हे साधेपणा, धैर्य आणि राष्ट्रसेवेमध्ये सामावलेले असते.
उपराष्ट्रपती भवनात, उपराष्ट्रपतींनी थिरू के. कामराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आणि सार्वजनिक जीवन तसेच राष्ट्र उभारणीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाचा सस्मरणीय उल्लेख केला.
कामराज यांचे वर्णन एक उत्तुंग राजकारणी आणि खऱ्या अर्थाने लोकनेते असे करताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, त्यांनी आपले जीवन राष्ट्रसेवा आणि सामान्य लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले.
ते म्हणाले की, कामराज संपूर्ण आयुष्य गांधीवादी विचारांनी प्रेरित होऊन जगले आणि त्यांनी रस्ते तसेच शैक्षणिक संस्थांचा विस्तार करून, माध्यान्ह भोजन योजना सुरू करून आणि गरिबांच्या जीवनात नवीन आशा निर्माण करून तामिळनाडूच्या विकासात शाश्वत योगदान दिले.
जलसिंचन आणि औद्योगिक विकासासाठी धरणांची निर्मिती तसेच औद्योगिक वसाहतींची स्थापना करून कामराज जी यांनी दिलेले योगदानही उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले, ज्याने तामिळनाडूतील कृषी आणि उद्योगाच्या वाढीचा पाया रचला.
***
शिल्पा पोफळे/नितीन गायकवाड/परशुराम कोर