गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एफसीआरए नोंदणीसाठी लाच मागितल्याप्रकरणी दोन अधिकारी ताब्यात

Posted On: 29 SEP 2026 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2026

 

एफसीआरए अर्थात परकीय योगदान नियमन कायद्याअंतर्गत नोंदणी करून देण्यासाठी कथितपणे लाच मागितल्याप्रकरणी दोन सरकारी अधिकाऱ्यांना नवी दिल्लीतून अटक करण्यात आली. गृह मंत्रालयाला मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने केंद्रीय संस्थांशी समन्वय साधून 28 सप्टेंबर 2026 रोजी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एक वरिष्ठ लेखापाल आणि एक लेखापाल यांचा समावेश आहे. या दोघांनी एका संस्थेची प्रलंबित एफसीआरए नोंदणी मंजूर करून देण्याच्या बदल्यात कथितपणे बेकायदेशीर लाच मागितली होती.

यापैकी एक अधिकारी गृह मंत्रालयाच्या परदेशी नागरिक विभागामध्ये कार्यरत आहे, तर दुसरा अधिकारी सध्या वेतन आणि लेखा कार्यालयात कार्यरत असून, यापूर्वी त्यांनी परदेशी नागरिक विभागात सेवा बजावली आहे. हे दोघे एका विशिष्ट संस्थेच्या संपर्कात होते आणि त्या संस्थेच्या प्रलंबित नोंदणी आणि नूतनीकरणासाठी त्यांनी कथित लाच मागितल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. यासंदर्भात पुढील तपास सुरु आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाचे भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण असून, संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर आणि विभागीय कारवाई केली जाणार आहे. एफसीआरएशी संबंधित सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने अधिकृत एफसीआरए पोर्टलवर उपलब्ध आहेत. या प्रक्रियेसाठी कोणताही मध्यस्थ, एजंट किंवा व्यक्ती यांची अधिकृत नियुक्ती केलेली नाही.

 

* * *

नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316457) अभ्यागत कक्ष : 19