शिक्षण मंत्रालय
भारताच्या नवोन्मेष क्षेत्रातील वाढीमुळे ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार होण्यास चालना मिळेल : प्रल्हाद जोशी
नवोन्मेषाची सुरुवात जेव्हा मानवी गरजेतून होते आणि त्यातून व्यावहारिक उपाय निर्माण होतो, तेव्हा ते ‘सेवेचे’ कार्य ठरते : प्रल्हाद जोशी
Posted On:
25 SEP 2026 4:01PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज युवकांना ‘सेवे’ची भावना आणि नवोन्मेष यांची सांगड घालण्याचे आवाहन केले. वास्तविक जीवनातील आव्हाने ओळखून त्यावर व्यावहारिक आणि व्यापक स्तरावर अंमलात आणता येतील असे उपाय विकसित करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यामुळे ‘विकसित भारत @ 2047’चे ध्येय साकार करण्याच्या प्रयत्नांमध्ये युवकांचा सहभाग आणि योगदान सुनिश्चित होईल, असेही त्यांनी नमूद केले.

बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ (एसएफआयसी )च्या दक्षिण विभागासाठी आयोजित उद्घाटन समारंभात मंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एसएफआयसी चे संकेतस्थळ आणि नोंदणी पोर्टलचेही उद्घाटन केले.
सेवेची अभिव्यक्ती कृतीतून झाली पाहिजे, असे प्रतिपादन जोशी यांनी केले. एखादी समस्या समजून घेणे आणि तिचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधून तो व्यापक स्तरावर अंमलात आणणे, ही सेवेची महत्त्वपूर्ण अभिव्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभाचे महत्त्व मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधोरेखित केले. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. भारताकडे जिज्ञासू, आत्मविश्वासपूर्ण आणि तंत्रज्ञानाशी सहजतेने जुळवून घेणारी पिढी आहे, असे त्यांनी नमूद केले. या युवकांच्या जिज्ञासेला उपयुक्त कृतीचे स्वरूप देण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली असल्याचे ते म्हणाले.

‘सेवे’च्या भावनेने प्रेरित नवोन्मेष, ‘विकसित भारत @ 2047’च्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, असे मत जोशी यांनी व्यक्त केले. त्यांनी स्टार्ट-अप्स आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांना या आव्हानातून उदयास येणाऱ्या युवा नवोन्मेषकांसोबत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, भविष्यातील मार्गदर्शन, नाविन्यपूर्ण उपायांचा स्वीकार आणि त्यांची व्यापक स्तरावर अंमलबजावणी यांना पाठबळ देण्यासाठी एसएफआयसीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कोष तयार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
एसएफआयसी अंतर्गत पाच राष्ट्रीय विषयांवर देशभरातील शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी व युवा नवोन्मेषकांना एकत्र आणले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://sevafirst.mic.gov.in/
***
निलिमा चितळे/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2315164)
अभ्यागत कक्ष : 9