आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतासह जगभरात 11वा आयुर्वेद दिन साजरा; नागपूर येथे भव्य राष्ट्रीय सोहळा संपन्न


परंपरेपासून पुरावा आणि नवोपक्रमाकडे झालेला आयुर्वेदाचा प्रवास भावी पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित करेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रतिबंधात्मक आरोग्य निगा आणि निरोगी जीवनशैलीला देशव्यापी जनचळवळीचे स्वरुप देण्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन

ज्ञान, पुरावे आणि नवोपक्रम आयुर्वेदाचे भविष्य घडवतील : आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा

Posted On: 23 SEP 2026 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

भारतासह जगभरात आज 11 वा आयुर्वेद दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य भव्य राष्ट्रीय सोहळा महाराष्ट्रात नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. निरोगी भविष्यासाठी  आयुर्वेद ही यावर्षीच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे. या कार्यक्रमात आयुष सेवा क्षेत्रावरील अहवाल आणि “आयुष व्हिजन 2030” यासह महत्त्वाच्या अहवालांचे आणि दस्तऐवजांचे प्रकाशन  करण्यात आले, तसेच सीसीआरएएस-अग्नी वेब पोर्टलचेही उद्घाटन करण्यात आले. याशिवाय या कार्यक्रमात आरोग्यसेवा आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात  आयुर्वेदाची शास्त्रीय भूमिका तसेच 2047 पर्यंतच्या पथदर्शी आराखड्यावर वैज्ञानिक सत्रे देखील आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. आयुर्वेदाचा  परंपरांपासून ते ज्ञानापर्यंतचा तसेच पुरावे आणि नवोन्मेषाधारित प्रवास नेहमीच  पुढील पिढीच्या आरोग्याचे रक्षण आणि कल्याण सुरक्षित करण्यात योगदान देत राहील, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात सांगितले. आयुर्वेदाची ओळख भारताच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार गेली असून आयुष व्हिसा सुविधेमुळे परदेशी नागरिक आयुष सुविधेअंतर्गत उपचार घेण्यासाठी भारतात येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शक्तीची साधना या निर्धाराचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की भारत विकसित भारताच्या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करत आहे. आयुर्वेदाशी संबंधित संस्था, तज्ञ आणि युवक या समृद्ध परंपरेला एका नवीन उंचीवर घेऊन जातील आणि निरोगी, सक्षम आणि मजबूत राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समारंभाचे उद्घाटन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दूरदृश्य  प्रणालीद्वारे   करण्यात आले. यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, केंद्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. (वैद्य) रबिनारायण आचार्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याला संबोधित करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुर्वेद हा भारताच्या आरोग्यासंबंधी दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. "आरोग्याचे पहिले केंद्र रुग्णालय नसून आपले घर आहे,”असेही ते म्हणाले.निरोगीपणाचा पहिला आधार औषध नसून आपली जीवनशैली आहे. "स्वस्थ्य आरोग्य संरक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्" या तत्त्वाचा दाखला देत ते म्हणाले की आयुर्वेदात उपचारांसोबतच आरोग्य जपण्यास प्राधान्य दिले आहे, जीवनशैलीशी संबंधित आरोग्यविषयक समस्या वाढत असताना हा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा आहे असेही ते म्हणाले.

प्रतापराव जाधव यांनी जामनगरमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राला (आयटीआरए) राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून मान्यता तसेच डब्ल्यूएचओ आयसीडी-11 वर्गीकरणामध्ये आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी पद्धतींचा समावेश हे पारंपारिक औषधांच्या आंतरराष्ट्रीयीकरणातील महत्त्वाचे टप्पे असल्याचे सांगितले. परंपरेचा संबंध, ज्ञान, वैज्ञानिक पुरावे आणि नवोन्मेषाशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, आयुर्वेद दिन केवळ एक वार्षिक कार्यक्रम न राहता निरोगी जीवनशैलीबद्दल व्यापक जनसहभाग वाढवणारा  कार्यक्रम  म्हणून  त्याचे स्वरूप राहिले  पाहिजे, असेही ते म्हणाले.

आयुर्वेदाचे भविष्य हे त्याच्या ज्ञान परंपरेचा संबंध वैज्ञानिक पुरावे, नवोन्मेष आणि सार्वजनिक आरोग्य परिणामांशी जोडण्यात आहे, यावर आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी भर दिला. आयुर्वेद आणि इतर आरोग्यसेवा प्रणालींमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देताना संशोधन, गुणवत्ता, सुरक्षितता आणि मानकीकरण मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या कार्यक्रमात गोक्षुरा (ट्रिब्युलस टेरेस्ट्रिस) आणि चंद्रासुरा (लेपिडियम सॅटिव्हम) यांच्यावरील सुरक्षा दस्तऐवजांचे (सेफ्टी डॉसियर्स), त्वचारोगांवरील प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे (एसटीजी) तसेच, विकसनशील देशांसाठी संशोधन आणि माहिती प्रणाली (आरआयएस) द्वारे तयार करण्यात आलेल्या आयुष सेवा क्षेत्राचे मूल्यांकन करणाऱ्या 'आयुष सेवा क्षेत्रावरील' पहिल्या-वहिल्या अहवालाचे प्रकाशन झाले.

या कार्यक्रमात “पारंपरिक ज्ञानापासून जागतिक नेतृत्वापर्यंत: आयुष दृष्टिकोन 2030”, भारतातील आयुष-संबंधित शोधांवरील सद्यस्थिती अहवाल आणि सीसीआरएएस-अग्नी मूल्यांकन स्केल वेब पोर्टल यांचेही अनावरण करण्यात आले. हे उपक्रम संशोधन, दस्तऐवजीकरण, नवोन्मेष, नैदानिक मार्गदर्शन आणि सुव्यवस्थित  भाषांतर यांना बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करतात.

या सोहळ्यात आरोग्यसेवा आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आयुर्वेदाच्या बदलत्या भूमिकेवर दोन वैज्ञानिक सत्रे आयोजित करण्यात आली होती.

या ठिकाणी एका राष्ट्रीय औषधी वनस्पती प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या प्रदर्शनात आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय संस्थांचे स्टॉल्स होते. या प्रदर्शनानाला अभ्यागत आणि सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नागपूर येथे झालेल्या या राष्ट्रीय सोहळ्यात देशभरातील आयुर्वेद चिकित्सक, संशोधक, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, संस्था आणि इतर संबंधित घटक सहभागी झाले होते. आयुर्वेदाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक पुरावे संशोधन नवोन्मेश, गुणवत्ता आणि सर्व समावेशक  आरोग्यसेवा यावर वाढता भर दिला जात असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.  

निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2314007) अभ्यागत कक्ष : 73