माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातच्या एकता नगर इथे 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
युवा पिढीसाठी कलाकार हे आदर्श असल्याने त्यांनी आरोग्यसंपन्न जीवनशैलीला प्रोत्साहन द्यावे आणि हानिकारक पदार्थांची जाहिरात करणे टाळावे: राष्ट्रपतींचे चित्रपटसृष्टीला आवाहन
कोट्यवधी देशवासीयांकडून मिळालेल्या प्रचंड प्रेमाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अनंत नाग यांनी व्यक्त केली कृतज्ञता
महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर सोहळ्याचे आयोजन करत, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या माध्यमातून भारताची सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले जाईल: अश्विनी वैष्णव
वेव्हजचे (WAVES) आगामी पर्व ऑक्टोबर 2027 मध्ये आयोजित केले जाणार असल्याची माहिती आणि प्रसारण अश्विनी वैष्णव यांची घोषणा
Posted On:
22 SEP 2026 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांची प्रतिभा, निष्ठा आणि परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. चित्रपटनिर्मिती हा एक सांघिक प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या सदस्यांच्या योगदानामुळे हे पुरस्कारप्राप्त चित्रपट घडले, त्या प्रत्येकाबद्दल आपल्याला कौतुक वाटत असल्याची आपली भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्यांना केले.

नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त अनंत नाग यांचेही राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.
भारतीय चित्रपटसृष्टी ही देशातील विविध भाषा, परंपरा, आकांक्षा आणि संघर्षांचे प्रतिनिधित्व करते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. देशाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या एकता नगर या ठिकाणाची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे स्थळ म्हणून निवड केल्याबद्दलही त्यांनी कौतुकाची भावना व्यक्त केली.
सर्जनशील अर्थव्यवस्थेत प्रतिष्ठा आणि सामाजिक सुरक्षेला स्थान मिळायला हवी अशी गरजही त्यांनी व्यक्त केली. सर्जनशील क्षेत्रातील कामगार, छोटे कलाकार, सहाय्यक आणि उमेदवारी करत असलेल्या प्रत्येकाला आदर आणि सामाजिक सुरक्षा मिळाली पाहीजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परीक्षणात सर्वसमावेशक मानवी दृष्टिकोन असेल याची सुनिश्चित करण्यासाठी सर्व परीक्षकांमध्ये महिलांचाही सहभाग असायला हवा असे आवाहनही त्यांनी केले.

लोकप्रिय कलाकारांचा विशेषतः लहान मुले आणि युवा वर्गावर मोठा प्रभाव असतो ही बाब त्यांनी अधोरेखित केली. याचे भान राखत यशस्वी कलाकारांनी शिस्तबद्ध जीवनशैलीच्या लाभांना प्रोत्साहन द्यावे तसेच आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थांची जाहिरात करण्यापासून दूर राहावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.
भारतीय चित्रपटसृष्टी जागतिक दर्जाचे मापदंड प्रस्थापित करू शकते यावर आपला विश्वास आहे, आणि देशात तयार होत असलेल्या चित्रपटांच्या दर्जातून आपल्या या विश्वासाला बळ मिळते, अशी भावनाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

कथांचा जीवनपट, चित्रपटांचा वारसा: अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनंत नाग यांना वर्ष 2024 चा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. हा क्षण अनंत नाग यांच्या कथात्मक मांडणी, नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील जीवनभराच्या समर्पणाचा गौरव करणारा ठरला. या पुरस्काराच्या माधमातून अनंत नाग यांनी गेली अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या संस्मरणीय कामगिरीची आणि अविस्मरणीय योगदानाची गौरवपूर्ण दखल घेतली गेली.

अनंत नाग यांनीही अत्यंत नम्रतेने हा पुरस्कार स्वीकारला. आपला हा प्रवास घडवणाऱ्या व्यक्तींबद्दल आणि अनुभवांबद्दल कृतज्ञता वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना अनंत नाग यांनी सांगितले की, त्यांचे बालपण एका आश्रमात गेले. त्यानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले. तिथे त्यांना एका नाटकात अभिनयाची संधी मिळाली. रंगभूमी त्यांच्या कारकिर्दीचा पाया ठरली. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सुमारे 50 नाटकांमध्ये अभिनय केला. पुढे नामवंत चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यासह अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
अनंत नाग म्हणाले की, त्यांनी जाणीवपूर्वक कन्नड चित्रपटसृष्टीची निवड केली आणि चित्रपटसृष्टीतील आपले काम बंगळुरूमधूनच सुरू ठेवले, बंगळुरूला आपली कर्मभूमी बनवले. गेल्या वर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला पद्मभूषणने सन्मानित करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली आणि या वर्षी पुन्हा एकदा राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

गुजरातकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे स्वागत
गुजरातमधील या सोहळ्याने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या प्रवासात एका नव्या अध्यायाची सुरुवात केली.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्लीबाहेर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्याची परंपरा सुरू केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आभार मानले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशाशी आणि एकतेच्या सामर्थ्याशी जोडलेल्या केवडिया येथील एकता नगरमध्ये या प्रतिष्ठित पुरस्कारांचे आयोजन होणे, ही गुजरातसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीने देशाच्या विविध भाषा आणि संस्कृती समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्यांना नैसर्गिक शेती, निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण जागरूकतेला चालना देण्यासाठी तसेच प्रेम, बंधुत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य मजबूत करण्यासाठी चित्रपटाचे माध्यम वापरण्याचे आवाहन केले.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी राष्ट्रपती आणि विशेष अतिथींचे गुजरातमध्ये स्वागत केले. तसेच एकता नगर येथे हा सोहळा आयोजित करणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.


भारताची जागतिक ओळख आणि सुप्त सामर्थ्य (सॉफ्ट पॉवर) बळकट करण्यात चित्रपटसृष्टीची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब, संस्कृतीचे वाहक आणि मानवी भावनांना जोडणारे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले. गुजरातचा समृद्ध वारसा, विविध प्रकारचे नैसर्गिक भूप्रदेश आणि सांस्कृतिक परंपरा यांचा उल्लेख करत त्यांनी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी गुजरातची निवड करण्याचे आवाहन केले. तसेच, हा प्रतिष्ठित सोहळा गुजरातमध्ये आयोजित केल्याबद्दल त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आभार मानले.
एकता नगर, केवडिया येथे आयोजित 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माननीय राष्ट्रपतींचे आभार मानले आणि भारतीय चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी बोलताना वैष्णव म्हणाले की चित्रपट ही सांघिक कामगिरी असते आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या माध्यमातून पुरस्कार विजेत्या तसेच पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अशा दोघांचाही सन्मान केला जातो, त्यांच्या कामाची दाखल घेतली जाते. दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी अनंत नाग यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल वैष्णव यांनी त्यांची प्रशंसा केली.
भारताला लाभलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाला चालना देण्याच्या हेतूने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील लोकप्रिय आणि महत्वाच्या पर्यटनस्थळांवर आयोजित करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आपल्याकडील पर्यटन स्थळांची यजमानपदासाठी शिफारस करण्याचे आवाहन अश्विनी वैष्णव यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले.
'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज' (IICT) हे नवीन प्रतिभावंतांचे केंद्र असल्याचे नमूद करत वैष्णव म्हणाले की उद्योगांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या 13 विविध अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत सुमारे 380 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, माननीय पंतप्रधानांनी देशभरात 15,000 ‘सर्जक प्रयोगशाळा’ अर्थात 'क्रिएटिव्ह लॅब्स'ना मंजुरी दिली आहे, अशी माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. यामुळे तरुणांना नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान शिकण्याची आणि भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती जगासमोर मांडण्याची नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
लहान शहरांतील नवोदित गुणवंत कलाकारांचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सुविधा देऊन, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन वैष्णव यांनी प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यासह संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी आणि चित्रपट निर्मात्यांना केले.
सरकार आणि सर्जनशील क्षेत्रातील मंडळींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताची प्रचंड सर्जनशील क्षमता मुक्त होऊ शकेल आणि भारतीय प्रतिभेला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या 'WAVES 2027' साठी सूचना आणि कल्पना पाठवण्याचेही आवाहन त्यांनी केले.
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी 34 भाषांमधील 400 चित्रपट (फीचर फिल्म- दीर्घ) आणि 24 भाषांमधील 161 लघुचित्रपट/वृत्तपट (नॉन-फीचर फिल्म्स) प्राप्त झाल्याची माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी दिली. त्यापैकी 22 फीचर फिल्म्स आणि 23 नॉन-फीचर फिल्म्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टी ही सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि जागतिक स्तरावर कथा सांगण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून सतत विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांची राष्ट्रीय एकात्मतेबाबतची दूरदृष्टी आणि निष्ठा यांतून प्रेरणा घेऊन, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर, एकता नगर येथे आयोजित करणे, हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सचिवांनी सांगितले, तसेच आगामी काळात हा सोहळा इतर शहरांमध्येही आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्कृष्टतेचा गौरव: भारतीय चित्रपटसृष्टीतील कथा, अभिनय आणि विविध पैलू
अभिनेते मामूट्टी आणि कार्तिक आर्यन यांना अनुक्रमे 'ब्रह्मयुगम’ आणि 'चंदू चॅम्पियन’ या चित्रपटांसाठी संयुक्तपणे 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' (मुख्य भूमिका) हा पुरस्कार देण्यात आला, तर 'आर्टिकल 370' चित्रपटासाठी यामी गौतम यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' (मुख्य भूमिका) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सहाय्यक श्रेणींमध्ये, 'भक्षक' चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' म्हणून सन्मानित करण्यात आले, तर 'महाराजा' चित्रपटासाठी सचना नामिदास आणि 'मिथ्या'चित्रपटासाठी रूपाश्री वरकाडी यांना संयुक्तपणे 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार देण्यात आला.

'आर्टिकल 370' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून गौरविण्यात आले, तर रणदीप हुडा यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. 'कल्की 2898 एडी'ला 'संपूर्ण मनोरंजन देणारा सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट' हा पुरस्कार मिळाला, तर 'कॅप्टन मिलर'ला 'राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारी सर्वोत्तम फीचर फिल्म' हा पुरस्कार प्राप्त झाला. 'आमरण' साठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

अनेक भाषा, एकच राष्ट्रीय व्यासपीठ
या पुरस्कारांनी भारतीय सिनेमामधील भाषिक वैविध्यही अधोरेखित केले. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या भाषांच्या पलीकडे जाऊन, गढवाली आणि तुळू भाषेतील चित्रपटांनाही राष्ट्रीय मान्यता मिळाली.
एससी फार्माकेम प्रा. लि. निर्मित आणि दिनेश पी. भोसले दिग्दर्शित 'ढोली' (Dholi) या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट' हा पुरस्कार मिळाला, तर पिच्चर स्टुडिओ निर्मित आणि शिवध्वज शेट्टी दिग्दर्शित ‘आयएमबीयू’ (IMBU) या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट तुळू चित्रपट' म्हणून सन्मानित करण्यात आले.

रवी राज मुर्मू दिग्दर्शित 'अंगेन' या संथाली चित्रपटाला 'दिग्दर्शकाचा सर्वोत्तम पदार्पणातील चित्रपट' हा पुरस्कार मिळाला.
गढवाली आणि तुळू ते संथाली, अशा विविध भाषांमधील चित्रपट-अभिव्यक्तींनी या संध्याकाळी एका राष्ट्रीय मंचावर एकत्र येऊन, पुन्हा एकदा अधोरेखित केले की ही प्रत्येक भाषा भारताचा सिने अवकाश आपल्या आगळ्या अविष्काराने समृद्ध करते.
भारतीय सिनेमाचा उत्सव
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी दिग्गज कलाकार, उदयोन्मुख प्रतिभा, लोकप्रिय चित्रपट आणि प्रादेशिक कथाविश्व यांना एकाच राष्ट्रीय मंचावर एकत्र आणले. एकता नगरमधली ही संध्याकाळ भारताच्या चित्रपटसृष्टीचा उत्सव ठरली. चित्रपटाच्या वैश्विक भाषेतून अनेक भाषा, असंख्य कथा आणि विविध सर्जनशील परंपरा एकत्र आल्या.

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी आणि पुरस्कारांविषयी सविस्तर माहितीसाठी, कृपया येथे क्लिक करा: पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
सुषमा काणे/माधुरी पांगे/तुषार पवार/आशुतोष सावे/सविता म्हसकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313680)
अभ्यागत कक्ष : 12