गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल (एएनटीएफ) प्रमुखांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Posted On: 22 SEP 2026 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या (एएनटीएफ) प्रमुखांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी जाहिरातींची (टीव्हीसी) सुरुवात केली आणि लखनौ व देहरादून येथील अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) च्या नवीन विभागीय संकुलांची पायाभरणी केली. या कार्यक्रमादरम्यान,विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एएनटीएफ'चा देखील सन्मान करण्यात आला. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी एनसीबी'च्या नव्याने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. एनसीबी'ने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एएनटीएफ'चे प्रमुख, तसेच संबंधित सरकारी विभागांचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित भागधारक सहभागी झाले आहेत.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 'अंमली पदार्थमुक्त भारताचे' कठीण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार गेली पाच वर्षे  सातत्याने पावले उचलत आहे.ते म्हणाले की देश आणि जगासाठी सर्वात धोकादायक  बनलेल्या अंमली पदार्थांच्या समस्येवर निर्णायक प्रहार करण्याची आणि सामूहिक प्रयत्नांमधून विजय मिळवण्याची वेळ आता आली आहे. शाह यांनी सांगितले की 31 डिसेंबर 2029 पर्यंत भारतातून अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराचे समूळ उच्चाटन करण्यात आपण एकत्रितपणे यशस्वी होऊ.

अंमली पदार्थांविरोधातील लढा हा सर्वात कठीण लढा आहे, पण आपल्याला तो सोडून देता येणार नाही, असे ते म्हणाले. 2047 सालापर्यंत 'विकसित भारत' घडवण्यासाठी, भावी पिढ्यांना वाचवण्यासाठी आणि तरुणांना भारताच्या विकासाशी जोडण्यासाठी, भारताला अंमली पदार्थमुक्त करणे, हाच आपल्यासमोर एकमेव पर्याय आहे. आपल्याला एकजुटीने आणि जिद्दीने या समस्येचा सामना करावा लागेल आणि यात विजय मिळवावाच लागेल, असे अमित शाह म्हणाले.

आपल्या भावी पिढ्यांची मुळे पोखरून काढून ती कमकुवत करणाऱ्या अंमली पदार्थांच्या या संकटाचा नायनाट करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, असे आवाहन अमित शहा यांनी केले. जगातल्या कोणत्याही भागातून आपल्या देशात एक ग्रॅमभर देखील अंमली पदार्थांचा शिरकाव होऊ देणार नाही, तसेच आपल्या देशातूनही एक ग्रॅमसुद्धा अंमली पदार्थ जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचणार नाहीत असा आपण दृढनिश्चय केला पाहिजे. जगभरातील युवकांचे हीत आणि कल्याणाच्या संकल्पातूनच आम्ही हा कृती आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

अंमली पदार्थांविरुद्धचा लढा आपल्याला स्पष्टतेने, कठोरपणे लढावा लागेल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की कृत्रिम अंमली पदार्थ, प्रीकर्सर रसायने अर्थात औषधांत वापरण्यात येणाऱ्या मूळ रसायनांचा  गैरवापर, नवीन दळणवळण तंत्रज्ञान, डार्क-नेट, अमली पदार्थांची बाजारपेठ, क्रिप्टो, 'डेड-ड्रॉप' डिलिव्हरी यंत्रणा आणि अमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय जाळे यांसारख्या नवनवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रत्येक राज्यात चाकोरीबाहेरचा विचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन केले जावे आणि त्यातून मिळालेले यश आणि अनुभव संपूर्ण देशात सामायिक करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.

अमित शाह म्हणाले की 'व्हिजन डॉक्युमेंट 2026-2029' हे चार मुख्य तत्वांवर  आधारित आहे: अंमलबजावणी, गुप्तचर माहिती आणि  कारवाया; प्रिकर्सर (मूळ औषधे) आणि  कृत्रिम अंमली पदार्थांवर नियंत्रण; मागणी आणि  दुष्परिणाम कमी करणे; तसेच क्षमता उभारणी आणि समन्वय. या चार तत्वांच्या अर्थात स्तंभांच्या अंतर्गत 100  पेक्षा जास्त लक्ष्यांचे  वर्गीकरण करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की देशात PITNDPS चा अर्थात - ‘अंमली पदार्थ आणि मनोविकृतीवर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारास प्रतिबंध करण्याच्या कायद्याचा’  वापर वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी वकिलांच्या समन्वयाने, तपास प्रक्रियेपासून ते दोषारोप  सिद्ध होण्यापर्यंतचा एक संपूर्ण कृती आराखडा तयार केला गेला पाहिजे.

या राष्ट्रीय परिषदेतील सहभागामुळे राज्ये, विभाग आणि संस्थांना 'संपूर्ण सरकारी दृष्टीकोना' अंतर्गत पुढील तीन वर्षांत नवीन संकल्पासह, देशभरात अंमली पदार्थांच्या तस्करीचा प्रभावीपणे सामना करण्याचे बळ मिळेल आणि मदत होईल.

या परिषदेत होणाऱ्या चर्चांमुळे अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी बळकट होण्यास मदत होईल आणि देशातील तरुणांचे अंमली पदार्थांपासून संरक्षण करण्यासाठी अवलंबलेली धोरणे अधिक प्रभावी ठरतील. हा राष्ट्रीय कार्यक्रम अंमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी आणि नशा मुक्त भारताची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ नियंत्रण संस्था आणि अंमली पदार्थ विरोधी कृती दल यांच्यातील भविष्यासाठी सज्ज भागीदारी वाढवण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

 

माधुरी पांगे/राजश्री आगाशे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2313642) अभ्यागत कक्ष : 8