गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राजभाषा विभागाने अनेक प्रकारचे यश प्राप्त केले -केंद्रीय गृहमंत्री
‘हिंदी शब्द-सिंधू’मध्ये 50 हजारांहून अधिक स्थानिक भाषांमधील शब्दांचा समावेश केल्याने राजभाषा हिंदी बनली अधिक सक्षम
‘हिंदी शब्द-सिंधू’ मध्ये आता 8 लाख शब्दांचा समावेश झाला असून 2029 पर्यंत तो जगातील सर्व भाषांमधील सर्वात मोठा शब्दकोश बनेल
मुले आपल्या मातृभाषेतूनच भारताला योग्य प्रकारे समजून घेऊ शकतात - भाषिक वाद निर्माण करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचा संदेश
मोदी सरकार भारतीय भाषांना शासन, विज्ञान आणि साहित्यात एकमेकांशी जोडून त्यांना अधिक समृद्ध करत आहे
राजभाषा हिंदीचा संबंध देशभरातील सर्व भाषांशी आहे. गुजराती भाषिक असूनही राष्ट्रीय स्तरावर काम करताना हिंदी मुळे मला कधीही अडचण आली नाही – अमित शाह
आईची माया आणि भावा बहिणीचे प्रेम मातृभाषेशिवाय अन्य कोणत्याही भाषेतून समजू शकणार नाही
मोदी सरकारने मातृभाषेबरोबरच आणखी एक भारतीय भाषा शिकण्याला प्रोत्साहन दिले आहे, कारण दुसरी भारतीय भाषा शिकणे म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत’शी जोडले जाणे होय
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मातृभाषेत विचार करते, विश्लेषण करते आणि सृजनात्मक कार्य करते , तेव्हा त्याचे परिणाम नेहमीच अधिक चांगले असतात
राजभाषा विभागाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी निर्माण केलेल्या अनेक शब्दांचा ‘हिंदी शब्द-सिंधू’ मध्ये समावेश केला आहे
भाषा अनेक असण्यास कोणतीही हरकत नाही; भावना भारतीय असली पाहिजे. बोलीभाषा अनेक असल्या तरी भारताचा आवाज एकच असला पाहिजे
मोदी सरकारच्या कार्यकाळात 2019 पासून आतापर्यंत राजभाषा समितीचे चार खंड राष्ट्रपतींना सादर करण्यात आले असून पाचवा खंड तयार आहे
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘कंठस्थ 2.0’ हे पाच कोटींहून अधिक वाक्यांसह परदेशी नागरिकांसाठीही खुले करण्यात आले
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते राजभाषा कीर्ती आणि राजभाषा गौरव पुरस्कार प्रदान
गृहमंत्र्यांच्या हस्ते ‘शिव अनादी है, अनंत है’, ‘भारतीय ज्ञानतंत्र : स्रोत और स्वरूप’, ‘अँधेरों से उजालों तक’, ‘वंदे मातरम्’वर केंद्रित ‘राजभाषा भारती’च्या विशेष स्मरणिकेचे, तसेच ‘वंदे मातरम् चे 150 अध्याय’ या साहित्याचे प्रकाशन
Posted On:
14 SEP 2026 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि बंडी संजय कुमार, तसेच राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिवस आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना सांगितले की, आज हिंदी दिवस आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी येणे हा मणिकांचन योग आहे. विघ्नहर्ता भगवान श्री गणेश भारतीय भाषांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करतील आणि या मार्गातील अडथळे दूर करतील, अशी कामना त्यांनी केली.
शाह यांनी यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मरण केले. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली होती, असे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी या देशाची नाडी अचूक ओळखली होती. देशाची संस्कृती आणि इतिहास यांच्या माध्यमातूनच जनजागृती आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण केला जाऊ शकतो, हे त्यांनी सखोलपणे समजून घेतले होते. त्यामुळे त्यांनी गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात केली. पाहता पाहता हे दोन्ही उत्सव संपूर्ण देशात साजरे होऊ लागले. या दोन्ही उत्सवांमुळे इंग्रजांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. टिळकांनी या उत्सवांच्या माध्यमातून देशभक्तीची मोठी लाट निर्माण केली, असे शाह यांनी सांगितले. महाराष्ट्राची भूमी ही परंपरा आणि विशाल विचारांची भूमी आहे. भक्ती चळवळीच्या काळात महाराष्ट्रातील अनेक संतांनी अशा रचना केल्या, ज्यामुळे देशभरातील भक्ती चळवळीला बळ मिळाले, हे त्यांनी अधोरेखित केले. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांनी स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यांना स्वराज्याचे मूलभूत अंग बनवले. शासनकारभारात मराठी भाषेला महत्त्व देऊन त्यांनी आपल्या भाषेचा कोष निर्माण केला. याच माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या काळापर्यंत येथील शासनकारभार चालत राहिला, याचा उल्लेख त्यांनी केला.
आजच्या कार्यक्रमात हिंदी शब्दसंसाधन, हिंदी टंकलेखन आणि लघुलेखन प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. गृहमंत्र्यांच्या हस्ते राजभाषा कीर्ती आणि राजभाषा गौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आले. राजभाषा कीर्ती सन्मान आणि राजभाषा गौरव पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

आज ‘शिव अनादी है, अनंत है’, ‘भारतीय ज्ञानतंत्र : स्रोत और स्वरूप, ‘अँधेरों से उजालों तक’, राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’वर केंद्रित राजभाषा विभागाच्या ‘राजभाषा भारती’ या नियतकालिकाच्या विशेष स्मरणिकेचे, तसेच ‘वंदे मातरम् चे 150 अध्याय’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, ‘वन्दे मातरम्’ हे कोणतेही साधारण गीत नाही. गुलामीच्या कालखंडात भारतीय चेतना जागृत करण्याचा बंकिमचंद्र चट्टोपाध्यायजी यांचा हा महान प्रयत्न होता. त्यांनी आपल्या कवितेतून भारताच्या निद्रिस्त चेतनेला जागृत करण्याचे काम केले. ‘आनंदमठ’मध्ये लिहिलेले त्यांचे ‘वन्दे मातरम्’ हे गीत, पाहता पाहता संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची उद्घोषणा बनले. ‘वन्दे मातरम्’च्या या उद्घोषणेद्वारे बंकिमचंद्रजी यांनी केवळ स्वातंत्र्यप्राप्तीची उत्कंठा आणि तीव्र भावनाच जागृत केली नाही, तर भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची पायाभरणीही केली. शाह यांनी सांगितले की, दुर्दैवाने नंतर ‘वन्दे मातरम्’चे तुकडे करण्यात आले. स्वातंत्र्यानंतरही ते त्याच्या पूर्ण स्वरूपात स्वीकारण्यासाठी देशाच्या संसदेला जवळपास 80 वर्षे लागली. त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदीजी हे असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी ‘वन्दे मातरम्’ पुन्हा त्याच्या पूर्ण स्वरूपात आणि पूर्ण गौरवासह सरकारी समारंभांमध्ये गायले जाण्याचा पुढाकार घेतला.

अमित शाह यांनी सांगितले की, आज ‘वन्दे मातरम्’च्या 150 व्या वर्षात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर आयोजित करण्यात आलेला हिंदी दिवस कार्यक्रम आगामी काळात राजभाषा आणि भारतीय भाषांच्या प्रवासाला पुढे घेऊन जाईल. महाराष्ट्राच्या बहुभाषिक संस्कृतीला नमन करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, येथे मराठीचा सन्मान आहे आणि तो असायलाही हवा. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनीच सर्वप्रथम मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. महाराष्ट्राच्या भूमीवर कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली यांसह अनेक भाषांचा विकास झाला असून, त्यांना सन्मान आणि मान्यताही मिळाली आहे. त्यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात महाराष्ट्र हेच सर्वात मोठे बहुभाषिक राज्य आहे. महाराष्ट्र शासनात सर्वांना स्वीकारणारी व्यवस्था निर्माण केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदनही केले.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्र्यांनी आचार्य विनोबा भावे यांचा संदर्भ देत सांगितले की, “जर मी हिंदीचा आधार घेतला नसता, तर काश्मीर, आसाम आणि केरळच्या गावागावात जाऊन भूदान-ग्रामदानचा क्रांतिकारी संदेश माझ्या जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नसतो. जर मी अन्य कोणत्याही भाषेचा आधार घेतला असता, तर गावांमध्ये कामच करू शकलो नसतो. राजभाषेनेच मला प्रत्येक गावासोबत संवाद साधायला शिकवले.” गृहमंत्र्यांनी सांगितले की, राजभाषेचा हा संबंध देशभरातील सर्व भाषांशी आहे, कारण या सर्व भाषा शतकानुशतके देशाच्या दैनंदिन व्यवहारात वापरल्या जात आहेत आणि शेकडो वर्षांपासून परस्पर व्यवहारात आहेत. ते म्हणाले की, ते स्वतः गुजरातचे असले आणि गुजरातमध्ये हिंदी नव्हे, तर गुजराती भाषा बोलली जाते. मात्र, जेव्हा त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा देशभरात काम करताना त्यांना कोणतीही अडचण आली नाही, कारण ते हिंदी समजतात आणि बोलतात. त्यांनी सांगितले की, राजभाषेने त्यांना देशभरात कार्य करण्याची मोठी संधी दिली.
अमित शाह यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही वीर सावरकरांची भूमी आहे. सावरकरजी हे त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतीय भाषांमध्ये उपलब्धच नसलेल्या अनेक शब्दांची निर्मिती केली. या सर्व शब्दांना मराठी, राजभाषा आणि देशातील इतर भाषांमध्ये सहज स्वीकार मिळाला. त्यांनी टिळक जी यांचे पत्र आत्मसात करून मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्याचे कार्यही केले. शाह यांनी सांगितले की, वीर सावरकरजी यांनी जेवढे शब्द सुधारले आणि निर्माण केले, ते सर्व राजभाषा विभागाने ऑनलाइन शब्दकोश ‘हिंदी शब्द-सिन्धु’मध्ये स्वीकारून सावरकरजी यांचा सन्मान केला आहे.
ते म्हणाले की, आपल्या संविधान निर्मात्यांनी विचारपूर्वकच 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीचा राजभाषा म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सांगितले की, मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून राजभाषा विभागाने अनेक उपलब्धी मिळवल्या आहेत. त्यांनी सर्वात मोठे कार्य नवीन शैक्षणिक धोरणात केले आहे. मोदीजी यांनी प्राथमिक शिक्षणात मातृभाषा शिकणे अनिवार्य केले आहे. कोणतेही मूल आपली मातृभाषा शिकल्याशिवाय मोठे व्यक्तिमत्त्व बनू शकत नाही, कारण आईच्या मायेचा आणि भाऊ-बहिणीमधील प्रेमाचा अर्थ ते मातृभाषेशिवाय समजू शकत नाही. आपली भूमी, आपली भाषा, आपला धर्म, आपल्या परंपरा, आपली संस्कृती आणि संस्कार यांच्याशी त्याचे नाते मातृभाषेच्या माध्यमातूनच शक्य होते. त्यामुळे मोदीजी यांनी प्राथमिक शिक्षणात मातृभाषा अनिवार्य केली.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, मातृभाषा शिकल्यानंतरच मूल पुढे जाऊ शकते. त्याच्या विचारप्रक्रियेची सुरुवात मातृभाषेत होते. जेव्हा एखादी व्यक्ती विचार करते, विश्लेषण करते आणि निर्णय घेते, तेव्हा हे सर्व मातृभाषेत केल्यास विचार अधिक चांगला होतो, विश्लेषण अधिक चांगले होते आणि निर्णयही अधिक चांगला होतो. शाह यांनी सांगितले की, यासोबतच मोदीजी यांनी आणखी एक भारतीय भाषा शिकणेही अनिवार्य केले आहे. भारतीय भाषा शिकण्याला विरोध करणारे लोक किती मोठे पाप करत आहेत, याची त्यांना कल्पना नाही. मुलांनी भारतीय भाषा शिकल्या पाहिजेत. दुसरी भारतीय भाषा शिकण्याचा अर्थ असा आहे की, ते मूल आपोआप ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या उद्दिष्टाशी जोडले जाईल. आपली मातृभाषा शिकण्यासोबतच ते आणखी एक भारतीय भाषाही शिकेल, तेव्हा ते आपोआप भारतीयतेशी जोडले जाईल आणि सर्व संकुचित विचारांपासून मुक्त होऊन भारताचा खरा सैनिक बनेल. त्यांनी सांगितले की, आम्हाला भारतातील प्रत्येक भाषेला समृद्ध करायचे आहे. केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की, आम्ही 2019 मध्ये ठरवले होते की अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही, तर देशातील प्रत्येक राज्यात आलटून पालटून त्याचे आयोजन केले जाईल. तेव्हापासून आजचे हे 6वे संमेलन आहे. ते म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2019 पासून आतापर्यंत राजभाषा समितीचे 4 खंड राष्ट्रपतीजींना सादर करण्यात आले असून 5वा खंड आता तयार झाला आहे. आतापर्यंत एकूण 13 खंड तयार झाले आहेत, त्यापैकी 4 खंड मोदीजींच्या कार्यकाळात तयार झाले आहेत.
ते म्हणाले की, मोदीजी जेव्हा जेव्हा जगातील कोणत्याही मोठ्या विचारमंचावर किंवा कोणत्याही देशात गेले आणि त्यांनी भाषण केले, तेव्हा त्यांनी ते राजभाषेत तसेच भारतीय भाषांमध्येच केले. मोठमोठ्या जागतिक विचारमंचांवर देशाचे पंतप्रधान परकीय भाषेऐवजी आपल्या भाषेत बोलताना पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावते. मोदीजींनी अनेक देशांतील विद्यापीठांमध्येही राजभाषा शिकवण्याची व्यवस्था केली आहे. भारत सरकारच्या 5 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘कंठस्थ 2.0’ हा विचारमंच 5 कोटींहून अधिक वाक्यांसह परदेशी नागरिकांसाठीही खुले केले आहे.
गृह मंत्री अमित शाह म्हणाले की, ‘लीला राजभाषा’ आणि ‘लीला प्रवाह’ (एलआयएलए - लर्न इंडीयन लॅंग्वेज थ्रू आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) यांचे अतिशय चांगले परिणाम मिळाले आहेत. 51,000 शब्दांपासून सुरू झालेला ‘हिंदी शब्द सिंधु’ हा शब्दसंग्रह आता 8,00,000 शब्दांपर्यंत पोहोचला आहे. ते म्हणाले की, ‘हिंदी शब्द सिंधु’मध्ये 50 हजारांहून अधिक स्थानिक भाषांतील शब्दांचा समावेश करून हिंदी अधिक लवचिक करण्यात आली आहे.
त्यांनी विश्वास व्यक्त केला की, 2029 पर्यंत हा शब्दकोश जगातील सर्व भाषांमधील सर्वात मोठा शब्दकोश बनेल. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी हिंदी भाषेत उणीव होती आणि एखाद्या संकल्पनेसाठी किंवा वस्तूसाठी शब्द उपलब्ध नव्हता, तेथे आम्ही स्थानिक भाषांमधील 50,000 हून अधिक शब्द स्वीकारून राजभाषेला अधिक लवचिक बनवले आहे. यामध्ये तमिळ, तेलुगू, मराठी, गुजराती, बंगाली, ओडिया यांसह इतर भाषांचाही समावेश आहे. प्रत्येक भाषेतील 50,000 हून अधिक शब्दांना ‘हिंदी शब्द सिंधु’मध्ये स्थान देण्यात आले आहे.
ते म्हणाले की, राजभाषा विभागाने ‘भारती - बहुभाषी अनुवाद सारथी’ची निर्मिती केली आहे. तसेच, भारतीय भाषा अनुभागाची सुरुवात करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भारतीय भाषांना आपल्याला शासन आणि विज्ञानाची भाषा बनवायचे आहे, साहित्य समृद्ध करायचे आहे आणि भारतीय भाषांना एकमेकांशी जोडून त्यांचा मोठा संच तयार करायचा आहे. ते म्हणाले की, जेईई, नीट किंवा पदवी प्रवेश परीक्षा असो, या परीक्षा 13 भाषांमध्ये घेण्याचे कार्यही आपण केले आहे.
अमित शाह म्हणाले की, भाषांमध्ये वाद निर्माण करणाऱ्यांना ते सांगू इच्छितात की, मूल आपल्या मातृभाषेतूनच भारताला योग्य प्रकारे समजू शकते. जर त्याने परकीय भाषेतून भारत समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर भारताला समजून घेण्यात त्याच्याकडून चूक होऊ शकते. त्यामुळे आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यावर भर द्यावा.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन देशवासीयांसाठी मांडलेल्या ‘पंचप्रणां’पैकी एक प्रण म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होणे हा आहे.
गृह मंत्री म्हणाले की, भाषांच्या विषयावर कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांच्यापेक्षा मोठे व्यक्तिमत्त्व दुसरे कोणी असू शकत नाही. त्यांनी म्हटले होते की “भारतीय संस्कृती आणि भारतीय साहित्य हे विकसित झालेल्या शतदल (शंभर पाकळ्यांच्या) कमळाप्रमाणे आहे, ज्याची प्रत्येक पाकळी म्हणजे आपल्या प्रादेशिक भाषा आहेत. कोणत्याही एका पाकळीचा नाश झाल्यास कमळाचे सौंदर्य नष्ट होईल. प्रादेशिक भाषा राणी बनून आपापल्या प्रांतात विराजमान राहाव्यात आणि या सर्व भाषांच्या मध्यभागी हिंदी मध्यमणी बनून या शतदल कमळाचे सौंदर्य वाढवत राहावी.”
गृह मंत्री अमित शाह म्हणाले की, कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी अत्यंत विचारपूर्वक हे विधान केले होते. ते म्हणाले की, भारताच्या भाषा वेगवेगळे स्वर अवश्य आहेत, परंतु गीत एकच आहे, राष्ट्रभक्तीचे गीत एकच आहे, आपल्या संस्कृतीचे गीत एकच आहे. भाषा अनेक असाव्यात, याबाबत कोणतीही हरकत नाही. भावना भारतीय असली पाहिजे. बोली अनेक असाव्यात, मात्र भारताचा आवाज एकच असला पाहिजे.
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/हेमांगी काणेकर/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310249)
अभ्यागत कक्ष : 15