आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने एचपीव्ही लसीच्या 80 लाख मात्रा दिल्या ; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधातील एक महत्त्वपूर्ण टप्पा
Posted On:
11 SEP 2026 2:12PM by PIB Mumbai
फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण मोहिमे अंतर्गत ह्युमन पॅपिलोमाव्हायरस, एचपीव्ही लसीच्या 80 लाखांहून अधिक मात्रा देऊन भारताने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या टप्प्याद्वारे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेद्वारे एचपीव्ही लसीकरणाचा विस्तार दिसून येत असून त्याद्वारे किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बळकट करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला पुष्टीही मिळत आहे.
राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत, सरकारी आरोग्य केंद्रांवर पालकांच्या संमतीने 14 वर्षे वयाच्या मुलींना ऐच्छिक आणि मोफत एचपीव्ही लस एकल मात्रा दिली जाते.
एचपीव्ही लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लक्षणीय प्रगती केली आहे; अनेक राज्यांनी त्यांच्या निश्चित केलेल्या लक्ष्य गटांचे पूर्ण लसीकरण साध्य केले आहे.
गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि मिझोराम यांनी त्यांच्या संबंधित लक्ष्य लोकसंख्येचे 100 टक्के लसीकरण साध्य केले आहे. बिहार, आंध्र प्रदेश आणि आसाम यांनी 90 टक्क्यांहून अधिक व्याप्ती गाठली आहे, तर कर्नाटकने 85 टक्क्यांहून अधिक व्याप्ती साध्य केली आहे. छत्तीसगड, सिक्कीम, केरळ, तेलंगणा आणि ओडिशा यांनी 60 टक्क्यांहून अधिक व्याप्ती गाठली आहे.
राज्यांमध्ये, उत्तर प्रदेशने सर्वाधिक लसीकरण आकडा नोंदवला आहे; या मोहिमेअंतर्गत 22 लाखांहून अधिक किशोरवयीन मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे.

ही मोहीम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना, उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यावर आणि कोणतीही पात्र मुलगी यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यावर मुख्य भर दिला जात आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, जागरूकता वाढवणे, लसीकरणाची उपलब्धता सुलभ करणे आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, आरोग्य सेवा व्यावसायिक, पहिल्या फळीचे आरोग्य कर्मचारी आणि समुदाय यांच्याशी समन्वयाने काम करत आहे.
एचपीव्ही लसीच्या 80 लाख मात्रा देण्याचे हे यश, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बळकट करण्याच्या आणि भावी पिढ्यांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध दीर्घकालीन संरक्षण सुनिश्चित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
***
निलिमा चितळे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2309252)
अभ्यागत कक्ष : 8