अंतराळ विभाग
डॉ. जितेंद्र सिंह आणि फ्रान्सचे मंत्री फिलिप बॅप्टिस्ट यांची आभासी बैठक; आगामी ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषद’ आणि ‘बंगळुरू स्पेस एक्स्पो’मध्ये फ्रान्सच्या सहभागाबाबत चर्चा
मानव अंतराळ मोहिम, प्रगत तंत्रज्ञान आणि उद्योग सहकार्यावर भर देत भारत-फ्रान्स अंतराळ भागीदारीला आणखी गती मिळणार
Posted On:
04 SEP 2026 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान आणि भू-विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी फ्रान्सचे उच्च शिक्षण, संशोधन आणि अंतराळ मंत्री प्रा. फिलिप बॅप्टिस्ट यांच्यासोबत आभासी माध्यमातून द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांनी मानवी अंतराळ मोहीम, प्रगत अंतराळ तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांच्या अंतराळ संस्था व उद्योगांमधील सहकार्य वाढवण्यासह अंतराळ क्षेत्रातील भारत-फ्रान्स सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला.
पॅरिस येथे 9-10 सप्टेंबर 2026 दरम्यान होणारी 'आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद' आणि 7-9 सप्टेंबर 2026 दरम्यान होणारे 'बंगळुरू स्पेस एक्सपो' या पार्श्वभूमीवर ही चर्चा पार पडली. पॅरिस परिषदेत भारताचा सहभाग आणि बंगळुरू स्पेस एक्सपोमध्ये फ्रान्सचा सहभाग यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. तसेच प्रा. बॅप्टिस्ट यांच्या या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या भारत दौऱ्याबाबतही यात विचारविनिमय झाला.

भारत या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि फ्रान्ससोबतची आपली दीर्घकालीन अंतराळ भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्याचे उपयोग, अंतराळ अर्थव्यवस्था आणि सुरक्षित अंतराळ यांवर लक्ष केंद्रित करणारी ही परिषद अंतराळ क्षेत्राच्या भविष्यावरील आंतरराष्ट्रीय संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या चर्चेचा मुख्य भर पॅरिस परिषदेतील भारताच्या योगदानावर होता. यामध्ये 'इस्रो'चे अध्यक्ष तथा अंतराळ विभागाचे सचिव यांना, ‘पृथ्वीच्या निम्न कक्षेत भारताची भविष्यातील मानव अंतराळ मोहिम’, या विषयावर उद्घाटनाचे मुख्य भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
प्रा. फिलिप बॅप्टिस्ट यांनी अंतराळ क्षेत्रातील भारत आणि फ्रान्समधील सध्याचे सहकार्य अधिक मजबूत व जलद करण्याची फ्रान्सची इच्छा व्यक्त केली. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित व्हिडिओ संदेशाबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले, तसेच या कार्यक्रमात स्वीकारल्या जाणाऱ्या जाहीरनाम्यांवर भारतीय पक्षासोबत सुरू असलेल्या सल्लामसलतीचे स्वागत केले.
दोन्ही बाजूंनी 'बंगळुरू स्पेस एक्सपो'मधील फ्रान्सचा सहभाग आणि दोन्ही देशांच्या अंतराळ संस्था, उद्योग व नव्याने आकारास येणाऱ्या अंतराळ परिसंस्थेमधील परस्पर संवाद वाढवण्याच्या संधींवरही चर्चा केली.

प्रा. बॅप्टिस्ट 28 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान भारताला भेट देणार असून, त्यांनी बेंगळुरू येथील 'इस्रो'च्या केंद्रांना भेट देण्याची आणि डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सहकार्याची संभाव्य क्षेत्रे आणि पॅरिस परिषदेसाठी प्रस्तावित अतिरिक्त सादरीकरणांवर दोन्ही देशांची पथके आपापसात चर्चा सुरू ठेवतील, यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले.
भारत आणि फ्रान्स यांच्यात गेल्या जवळजवळ सहा दशकांपासून घनिष्ठ अंतराळ भागीदारी राहिली आहे.
नाविन्यता, संशोधन, मानवी अंतराळ मोहीम, तंत्रज्ञान विकास आणि खाजगी अंतराळ क्षेत्राचा वाढता सहभाग यांच्या माध्यमातून भारत-फ्रान्स अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्याच्या परस्पर कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत या बैठकीचा समारोप झाला.
* * *
माधुरी पांगे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306797)
अभ्यागत कक्ष : 14