वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-जपान गुंतवणूक भागीदारीला गती; वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे जपानच्या संस्थात्मक भांडवलात वाढ करण्याचे आवाहन
Posted On:
25 AUG 2026 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज टोकियो येथे जपानच्या प्रमुख वित्तीय आणि गुंतवणूक संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. दीर्घकालीन भांडवली प्रवाह मजबूत करणे, गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करणे आणि भारताच्या विकास प्रवासात जपानचा सहभाग वाढवणे या मुद्द्यांवर चर्चेत विशेष भर देण्यात आला.
या बैठकीत एमयूएफजी, डेव्हलपमेंट बँक ऑफ जपान (डीबीजे), मिझुहो, मॉर्गन स्टॅनले, नोमुरा आणि निप्पॉन लाईफ या संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते. भारताचा आर्थिक दृष्टिकोन, गुंतवणुकीच्या उदयोन्मुख संधी आणि भारतातील जपानच्या संस्थात्मक गुंतवणुकीला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजना यावर चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले.
गोयल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि लवचिकता अधोरेखित केली. जागतिक अनिश्चितता असूनही भारताने गेल्या वर्षी 7.7 टक्के आर्थिक वाढ नोंदवली असून, 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताचे मजबूत बँकिंग क्षेत्र, भक्कम भांडवली पर्याप्तता, अनुत्पादक मालमत्तेचे अल्प प्रमाण, विस्तारणारा मध्यमवर्ग आणि वाढते खर्च करण्यायोग्य उत्पन्न हे शाश्वत आर्थिक वाढीचे प्रमुख चालक घटक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, प्रगत उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये जपानी गुंतवणूकदारांसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण संधींवर गोयल यांनी प्रकाश टाकला. भारताची विस्तारणारी नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि राष्ट्रीय वीज ग्रीड हे ऊर्जा-केंद्रित डिजिटल उद्योगांच्या वाढीसाठी एक मजबूत पाया प्रदान करत आहेत, तर इंडिया सेमीकंडक्टर मिशनमुळे उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.
भारत-जपान संबंधांचे धोरणात्मक आणि सर्वसमावेशक स्वरूप अधोरेखित करताना गोयल म्हणाले की, जागतिक उत्पादन, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक केंद्र बनण्याच्या प्रवासात भारत जपानला एक विश्वासू भागीदार मानतो. बौद्धिक संपदा संरक्षण, उच्च-गुणवत्तेच्या प्रतिभावंतांची उपलब्धता, धोरणात्मक सुधारणा आणि अधिकाधिक अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याप्रती भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
जपानी वित्तीय संस्थांनी भारतासोबतचा आपला वाढता सहभाग दर्शवला आणि भारताच्या दीर्घकालीन विकासाच्या शक्यतांबद्दल दृढ विश्वास व्यक्त केला. एमयूएफजीने श्रीराम फायनान्समध्ये केलेल्या सुमारे 4 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीवर तसेच नवीकरणीय ऊर्जा आणि हायड्रोजन यांसारख्या क्षेत्रांमधील आपल्या वाढत्या स्वारस्यावर प्रकाश टाकला. डीबीजेने आपली समर्पित भारत रणनीती तसेच मालमत्ता विकास, व्हेंचर कॅपिटल आणि इतर दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधींमधील वाढत्या स्वारस्याची रूपरेषा सादर केली.
मिझुहोने भारतात कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांच्या सुधारत्या नफ्यावर आणि पुण्यातील आपल्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरसह भारतातील आपल्या कामकाजाच्या विस्तारावर प्रकाश टाकला. मॉर्गन स्टॅनलेने भारताला आपल्या सर्वात महत्त्वाच्या जागतिक ठिकाणांपैकी एक म्हणून संबोधले. भारतात या कंपनीचे आपल्या 19,000 हून अधिक कर्मचारी असून उच्च-मूल्याच्या भांडवली बाजारपेठा आणि वित्तीय सेवा उपक्रमांकडे आपल्या भारतातील कामकाजाच्या उत्क्रांतीवर संस्थेने प्रकाश टाकला.
नोमुरा’ने भारतातील आपल्या दीर्घकालीन उपस्थितीवर प्रकाश टाकला, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांतील तांत्रिक क्षमतांच्या माध्यमातून जपानी कंपन्या आणि जागतिक उद्योगांना भारतातील संधींशी जोडण्यात निभावत असलेल्या आपल्या भूमिकेवर प्रकाश टाकला. निप्पॉन लाईफने दीर्घकालीन 'पेशंट कॅपिटल'च्या (संयमी भांडवलाच्या) महत्त्वावर भर दिला आणि भारतातील आपल्या कामकाजातून मिळणारा भक्कम परतावा नमूद केला..
या चर्चेत जपानच्या संस्थात्मक भांडवलाचा भारतातील ओघ अधिक सुलभ करण्याच्या उपायांवरही चर्चा झाली.
जपानी संस्थांनी पुनरुच्चार केला की भारताबाबतचा आपला दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे, मात्र चलनातील चढ-उतार तसेच काही नियामक आणि धोरणात्मक बाबी अल्पकालीन गुंतवणुकीच्या निर्णयांवर परिणाम करू शकतात, हेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीत, आंतरराष्ट्रीय भांडवलासाठी भारतात प्रवेशद्वार म्हणून तसेच जपान आणि भारत यांच्यात सीमापार गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून 'गिफ्ट सिटी'च्या संभाव्यतेवरही चर्चा झाली.
भारताला केवळ भांडवलाची नव्हे, तर तंत्रज्ञान, नवोन्मेष, उत्पादन क्षमता, रोजगार आणि जागतिक मूल्य साखळ्यांशी एकीकरण साधणाऱ्या दीर्घकालीन भागीदारीची आवश्यकता असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
पुढील दशकात भारतात 10 ट्रिलियन येनची जपानी खाजगी गुंतवणूक उभारण्याच्या भारत-जपानच्या उद्दिष्टाच्या संदर्भात या चर्चांना विशेष महत्त्व आहे. या संवादामुळे भारताच्या दीर्घकालीन विकासाच्या शक्यतांबाबत प्रमुख जपानी वित्तीय संस्थांचा दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला तसेच द्विपक्षीय गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक संबंधांच्या विस्ताराची प्रचंड क्षमताही दिसून आली.
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303051)
अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam