माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत 57 व्या इफ्फीच्या आयोजनाच्या तयारीचा आढावा 


तरुण आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच वाढण्याच्यादृष्टीने त्यांच्यासाठी अधिक संधी निर्माण करण्याचे डॉ. मुरुगन यांचे आवाहन

इफ्फीमध्ये भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृती प्रदर्शित करण्यासोबतच सर्जनशील देवाणघेवाण आणि भारताची वाढती सर्जनशील अर्थव्यवस्थाही बळकट केली जाणार

 

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली 21 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीतील 'कर्तव्य भवन-2' मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत यावर्षीच्या 57 व्या 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (इफ्फी) च्या  आयोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच जागतिक दर्जाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून त्याचे स्थान अधिक बळकट करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन केले जाणार आहे.

बैठकीला संबोधित करताना डॉ. एल. मुरुगन यांनी 'इफ्फी'च्या 57 व्या आवृत्तीबाबतची आपली कल्पना विशद केली. यामध्ये त्यांनी तरुण विद्यार्थी, उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पडद्यामागे राहून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्धीच्या झोतात न येणाऱ्या व्यक्तींना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर भर दिला. जगभरातील उत्कृष्ट चित्रपट आणि आघाडीच्या सर्जनशील कलाकारांना भारतात आणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपर्क अधिक दृढ करण्यासोबतच, तरुण प्रतिभेला आपली सर्जनशीलता सादर करण्यासाठी, प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांकडून धडे घेता यावेत तसेच ते जागतिक चित्रपट समुदायाशी जोडले जावेत यासाठी 'इफ्फी'ने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

भारताची 'ऑरेंज इकॉनॉमी' (सर्जनशील अर्थव्यवस्था) बळकट करण्यासाठी तसेच देशातील सर्जनशील उद्योगांना चालना देण्यासाठी अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाच्या वतीने नवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत, त्यामुळे प्रतिभा, नवोन्मेष आणि जागतिक सहकार्यासाठी संधी निर्माण होत असल्याचे डॉ. मुरुगन यांनी नमूद केले.

डॉ. मुरुगन यांनी तरुण आणि उदयोन्मुख प्रतिभावंताना आणखी वाव देण्यासाठी 'मास्टरक्लासेस', प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांबरोबर रचनात्मक संवाद आणि मार्गदर्शनाच्या फलदायी संधींमध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे विशेषत्वाने स्पष्ट केले. तसेच, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि व्यावसायिक देवाणघेवाणीचे मार्ग बळकट करण्यासोबतच, भारतीय चित्रपटसृष्टीतील विविधता आणि सामर्थ्य जगासमोर मांडण्याचे महत्त्वाही त्यांनी अधोरेखित केले.

इफ्फीचे महत्त्व वाढण्यात आणि तो सातत्याने यशस्वी ठरण्यात गोवा सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा उल्लेख करत, मंत्र्यांनी गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले; आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने गोवा हे जागतिक स्तरावर मान्यता पावलेले केंद्र बनवण्यात त्यांचे व्हिजन अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. तसेच, इफ्फी हा खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा सांस्कृतिक सोहळा बनवण्यासाठी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून सातत्याने मिळत असलेला पाठिंबा आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली.

या बैठकीत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी भारताच्या वाढत्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सर्जनशील समुदायांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीचे 'इफ्फी'चा प्रमुख व्यासपीठ म्हणून उपयोग करून घेण्याची गरज स्पष्ट केली. तसेच, महोत्सवात सहभागी होणारे चित्रपट निर्माते, चित्रपटरसिक, प्रतिनिधी आणि अतिथींना उच्च दर्जाचा आणि सुगम अनुभव मिळेल हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे असल्यावरही त्यांनी भर दिला.

एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी 57 व्या इफ्फी च्या आयोजनासाठी सध्या सुरू असलेली तयारी आणि विविध उपक्रमांबाबत सादरीकरण केले. इफ्फी चे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी सुकाणू समितीच्या शिफारशींचे स्वागत केले; तसेच मास्टरक्लासेसवर प्रकर्षाने भर देण्याबरोबरच नवोदित चित्रपट निर्मात्यांना संधीची उपलब्धता, भारतातील आणि परदेशातील उत्कृष्ट चित्रपटांची निवड तसेच भारत आणि जगभरातील आघाडीचे चित्रपट निर्माते व सर्जनशील व्यक्तिमत्त्वांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे महत्त्व विशद केले.

गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी (आयपीआर) विभागाच्या सचिवांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या तयारीची समितीला माहिती दिली तसेच 57 व्या 'इफ्फी'साठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी वेळेत पूर्ण होतील आणि सर्व व्यवस्था सुरळीत पार पडेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांची निवड करण्यावर आणि विविध देशांतील आघाडीचे चित्रपट निर्माते, कलाकार व सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिकांना आमंत्रित करण्यास मुख्य प्राधान्य देऊन 'इफ्फी'चा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक विस्तार करण्याची गरज सुकाणू समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली. केवळ चित्रपटसृष्टीचा उत्सव साजरा करणे एवढेच नाही, तर सर्जनशील देवाणघेवाण, परस्पर सहकार्य आणि भारताच्या वाढत्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ अशी या महोत्सवाच्या आयोजनामागील संकल्पना आहे.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी , गोवा सरकार आणि सर्व संबंधित भागधारक यांच्यात निकटचा आणि सातत्यपूर्ण समन्वय असणे महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार सुकाणू समितीने केला. 57 वा 'इफ्फी' (IFFI) हे चित्रपट, सर्जनशीलता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि जागतिक सहकार्यासाठीचे अग्रगण्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून आपले स्थान अधिक दृढ करेल, तसेच भारतीय चित्रपट निर्माते आणि सर्जनशील व्यावसायिकांना जगाशी फलदायी संवाद साधण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देईल, असा सामूहिक विश्वासही समितीने व्यक्त केला.

या बैठकीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार; प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि इफ्फीचे महोत्सव संचालक, आशुतोष गोवारीकर, प्रकाश मगदूम, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी); सचिव, आयपीआर, गोवा सरकार आणि सुकाणू समितीचे भावना खेर, राम संपत, अपर्णा पुरोहित, प्रेरणा सिंग, नमिता, सुहासिनी मणिरत्नम, अभिषेक जैन संतोष सिवन, गौरव बॅनर्जी, आदित्य भट, प्रशांत चोठानी आणि धरम गुलाटी हे मान्यवर सदस्य उपस्थित होते.

***

आशिष सांगळे /मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302252) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , Malayalam , Assamese , English , Urdu , Bengali , Tamil , Kannada