विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
चेन्नई इथे आयोजित ब्रिक्स विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्रिस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले संबोधित
सर्वांसाठी उपलब्ध, किफायतशील, विश्वासार्ह आणि शाश्वत नवोन्मेषासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली व्यक्त
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2026 2:19PM by PIB Mumbai
चेन्नई इथे 14 व्या ब्रिक्स विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्रिस्तरीय बैठकीचा प्रारंभ झाला. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह या बैठकीच्या उद्घाटन सत्राला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील भारताचा जगभरात वाढत असलेला प्रभाव त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केला.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी या बैठकीत सहभागी झालेल्या ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रतिनिधी मंडळांचे स्वागतही केले. भारताने आपल्या ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षतेसाठी लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती (Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability) ही संकल्पना निश्चित केली असल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून लवचिकतेत वृद्धी घडवून आणणे, सर्वसमावेशक विकासाला गती देणे, शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे आणि देशा देशांमध्ये परस्पर समान भागीदाऱ्यांचा विस्तार करून मानवतेची सेवा करणे ही परस्पर सामायिक भावना या संकल्पनेतून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे जगात वेगाने बदल होत असल्याची बाब डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केली. आज उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रगतीच्या अभूतपूर्व संधी निर्माण करत आहे, मात्र त्याचवेळी या तंत्रज्ञानाने नवोन्मेषाच्या संधी सर्वांसाठी उपलब्ध असतील, ते किफायतशीर असेल, विश्वासार्ह आणि शाश्वत असेल याची सुनिश्चिती करण्यासाठी अधिक भक्कम आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरजही आपल्यासमोर मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिक्स देशांमधले सहकार्य हे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्याने उदयाला येत असलेल्या आघाड्यांवर तसेच समजाच्या विकासाच्या आकांक्षांना अनुसरून असायला हवे यासाठी, भारताच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्स देशांसाठीच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विषयक प्राधान्यक्रमांचा सर्वंकष आढावा घेतला जात असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.
ब्रिक्स मधील भागीदार देशांनी अत्याधुनिक संशोधन, नवोन्मेषासाठीचे अर्थसहाय्य, प्रतिभावंतांचे आदानप्रदान, संशोधन विषयक पायाभूत सुविधांची देवाणघेवाण, स्टार्टअपमधील भागीदाऱ्या आणि क्षमता निर्माण या क्षेत्रांमध्ये अधिक दृढ सहकार्यासाठी महत्त्वाकांक्षी मात्र त्याचवेळी व्यवहार्य असलेले मार्ग शोधावेत असे आवाहनही त्यांनी केले. अशा प्रकारच्या सहकार्यामुळे जागतिक आव्हानांना प्रतिसाद देऊ शकणारी तसेच, ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांच्या आकांक्षांना पाठबळ देणारी, ब्रिक्स देशांची भविष्यवेधी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विषयक संरचना उभी करण्यात उपयुक्त ठरू शकणार असल्याचेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले.
चेन्नईत होत असलेल्या या बैकीतील चर्चेमुळे ब्रिक्स अंतर्गतची भागीदारीची भावना अधिक दृढ होईल तसेच अधिक नवोन्मेषी, लवचिक आणि शाश्वत जगाच्या जडणघडणीसाठी उपयुक्त योगदानही होईल असा विश्वास विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.



***
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301990)
आगंतुक पटल : 14