युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशाखापट्टणम येथे येत्या 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी ब्रिक्स युवा आणि ब्रिक्स क्रीडा मंत्रिस्तरीय बैठकांचे आयोजन


केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया ब्रिक्समधील 11 सदस्य देशांच्या क्रीडा आणि युवा मंत्र्यांच्या या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवणार

ब्रिक्स क्रीडा मंत्रिस्तरीय बैठकांमध्ये क्रीडा क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबतचे सहकार्य आणि क्रीडा उत्पादन क्षेत्रांवर भर दिला जाणार

युवा वर्गाचा विकास आणि सक्षमीकरणातील सहकार्य बळकट करण्यावरही ब्रिक्स युवा मंत्रिस्तरीय बैठकीत भर दिला जाणार

प्रविष्टि तिथि: 21 AUG 2026 1:03PM by PIB Mumbai

 

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ब्रिक्स युवा मंत्रिस्तरीय बैठक आणि ब्रिक्स क्रीडा मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी सर्व 11 ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख या बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.

लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती (Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability) ही भारताच्या ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षपदासाठीची संकल्पना असून, यातून नागरिक केंद्रित आणि मानवतेला प्रथम स्थान देणारा दृष्टिकोन अधोरेखित होतो.

येत्या 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या बैठका भारतातील ब्रिक्स अध्यक्षतेदरम्यान झालेल्या चर्चा आणि बैठकांच्या पार्श्वभूमीवर होत आहेत. या बैठकांमधून ब्रिक्स सदस्य देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. यासोबतच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या देखील बैठकांच्या कामकाजात सहभागी होणार आहेत.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकांशी जोडले जाणार आहेत. यात युवा व्यवहार सचिव सुनील पालीवाल आणि क्रीडा सचिव हरी रंजन राव यांचा समावेश असेल.

या बैठकांच्या अधिकृत कार्यक्रमानुसार, डॉ. मांडविया भारताची भूमिका मांडणारे निवेदन सादर करतील, तर रक्षा खडसे समारोपाचे भाषण करतील.

22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ब्रिक्स युवा मंत्रिस्तरीय बैठकीत युवा वर्गाचा विकास आणि सक्षमीकरणातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या बैठकी दरम्यान शिक्षण, कौशल्य, उद्योजकता, कल्याण आणि शाश्वत विकास या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीत ब्रिक्स युवा परिषद आणि ब्रिक्स युवा शिखर परिषदेतून आलेल्या प्रमुख शिफारशींवर विचारविनीमय केले जाणार आहे. यासोबतच आगामी ब्रिक्स अध्यक्षतेखालील सहकार्याची भविष्यातील क्षेत्र देखील या बैठकीत निश्चित केली जाणार आहेत.

या बैठकीच्या समारोपाला ब्रिक्स युवा मंत्री संयुक्त घोषणापत्र आणि ब्रिक्स युवा सहकार्य आराखड्याचा स्वीकार केला जाण्याची शक्यता आहे.

23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ब्रिक्स क्रीडा मंत्रिस्तरीय बैठकीत क्रीडा क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासंबंधीची सामायिक वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी 11 ब्रिक्स सदस्य देशांचे क्रीडा मंत्री आणि प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख एकाच ठिकाणी येणार आहेत.

ब्रिक्सच्या भारताच्या अध्यक्षतेअंतर्गत क्रीडा क्षेत्राशी संबंधित विभागाने पारंपरिक आणि स्थानिक क्रीडा प्रकार, क्रीडा क्षेत्रातील तंत्रज्ञान, क्रीडा उत्पादन क्षेत्र आणि संयुक्त घोषणापत्राला अंतिम रूप देण्यासारख्या घटकांवर भर दिला आहे.

या बैठकीच्या समारोपाला ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्र स्वीकार केला जाणार आहे.

या बैठकांच्या निमित्ताने ब्रिक्स मैत्री सायकलिंग स्पर्धा, सर्व 11 ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रतिनिधींची निवेदने, द्विपक्षीय बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे.

क्रीडा मंत्र्यांच्या या बैठकीत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख आपापली निवेदने सादर करणार आहेत. त्यानंतर संयुक्त घोषणापत्र स्वीकारले जाणार आहे.

या दोन्ही मंत्रिस्तरीय बैठकांच्या माध्यमातून, ब्रिक्स देशांना परस्परांमधील संस्थात्मक सहकार्य दृढ करण्यासाठी, अनुभव तसेच उत्कृष्ट कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच, भारताच्या ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षतेअंतर्गत युवा विकास आणि क्रीडा क्षेत्रातील सामायिक प्राधान्यक्रमांना पुढची दिशा देण्यासाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

***

नितीन फुल्लुके/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2301955) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Gujarati , Assamese , Bengali , Bengali-TR , English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam