युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 कार्यक्रमाचा विकसित भारत प्रश्नमंजूषेने प्रारंभ
पंतप्रधानांना भेटण्याची आणि 'विकसित भारता'साठी आपल्या कल्पना मांडण्याची युवकांना मिळणार संधी
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2026 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2026
विकसित भारत प्रश्नमंजूषेच्या कार्यक्रमाने विकसित भारत युवा नेतृत्व संवाद (व्हीबीवायएलडी) 2027 ची सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातील तरुणांना नेतृत्व, नवोन्मेश आणि राष्ट्रनिर्मितीच्या एका सुनियोजित आणि गुणवत्तेवर आधारित प्रवासात सहभागी होण्याची देशव्यापी संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमाची सांगता नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवादाने होईल. यावेळी निवडक तरुणांना त्यांच्या कल्पना पंतप्रधानांसमोर मांडण्याची संधी मिळेल.
‘व्हीबीआयएलडी’ 2027 हा उपक्रम कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख युवा नेत्यांना घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून तयार केला आहे. याद्वारे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या परंतु गुणवान भारतीय तरुणांना सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्याची, आपल्या विचारांचे योगदान देण्याची आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

हा उपक्रम विकसित भारत @2047 मध्ये योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुणांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. पारदर्शक, गुणवत्तेवर आधारित आणि बहु-स्तरीय प्रक्रियेद्वारे, स्पर्धक डिजिटल प्रश्नमंजूषेपासून ते निबंध स्पर्धा, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश-स्तरीय व्हीबीवायएलडी अशाटप्प्यांतून पुढे जात राष्ट्रीय स्तरावरील व्हीबीवायएलडी पर्यंत पोहोचतील.
विकसित भारत प्रश्नमंजूषा
'विकसित भारत चॅलेंज ट्रॅक' या प्रमुख उपक्रमाचा पहिला टप्पा असलेली 'विकसित भारत प्रश्नमंजूषा' 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत 'माय भारत' (MY Bharat) पोर्टलवर आयोजित केली जात आहे.
15-29 वयोगटातील तरुण भारतीयांसाठी खुली असलेली ही प्रश्नमंजुषा डिजिटल पद्धतीने आणि अनेक भाषांमध्ये आयोजित केली जाईल, यामुळे देशभरातील तरुणांना यात भाग घेता येईल.
प्रश्नमंजुषेत सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी अव्वल 10 टक्के आणि जास्तीत जास्त चार लाख स्पर्धक, पुढील टप्प्यासाठी म्हणजेच 'विकसित भारत निबंध स्पर्धे'साठी पात्र ठरतील. निवड झालेल्या स्पर्धकांनी निर्धारित ‘विकसित भारत’ विषयावर ५०० शब्दांचा निबंध 'माय भारत' पोर्टलद्वारे सादर करणे अपेक्षित आहे.
प्रश्नमंजुषेपासून जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत
'विकसित भारत आव्हानाची' पाच टप्प्यांची प्रक्रिया या मार्गाने पुढे जाईल:
विकसित भारत प्रश्नमंजुषा → निबंध स्पर्धा → जिल्हास्तरीय स्पर्धा → राज्य/केंद्रशासित प्रदेश व्हीबीवायएलडी → राष्ट्रीय व्हीबीवायएलडी
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये, प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम 50 निबंध प्रत्यक्ष सादरीकरण फेरीसाठी निवडले जातील. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम दोन सादरीकरणकर्ते राज्यस्तरीय व्हीबीवायएलडी साठी पात्र ठरतील. जिल्हास्तरीय स्पर्धा 10 ते 16 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित केल्या जातील.
17 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2026 दरम्यान होणारी राज्य/केंद्रशासित प्रदेश व्हीबीवायएलडी, राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील विविध व्हीबीवायएलडी प्रकारांना एकत्र आणेल. जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांकडून परिषद मंडळासमोर त्यांच्या कल्पना सादर केल्या जातील. त्यांच्या कामगिरीच्या आधारावर राष्ट्रीय फेरीसाठी राज्य संघाची निवड केली जाईल.
युवा प्रतिभा, नेतृत्व आणि नवोन्मेषाला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे सहा विभाग
व्हीबीवायएलडी 2027 अंतर्गत भारतीय तरुणांसाठी सहा प्रमुख विभागांद्वारे विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत :
विकसित भारत आव्हान: हा प्रमुख मंच असून प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा आणि सादरीकरण-आधारित निवड प्रक्रियेद्वारे तरुणांना 'विकसित भारत @2047' साठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाय मांडण्याची संधी तरुणांना मिळेल.
सांस्कृतिक विभाग: लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, वक्तृत्व आणि काव्यलेखन या विविध स्पर्धांद्वारे तरुणांना भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे दर्शन घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.
डिझाइन फॉर भारत: वास्तविक विकासात्मक आव्हानांसाठी वापरकर्ता-केंद्रित उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणारी ही एक राष्ट्रीय डिझाइन स्पर्धा आहे.
हॅक फॉर सोशल कॉज: हा तंत्रज्ञान आधारित नवोन्मेषाचा उपक्रम असून यात सामाजिक आणि विकासाशी संबंधित आव्हानांवर मोठ्या प्रमाणावर विस्तारता येतील असे डिजिटल उपाय विकसित करण्यासाठी तरुणांना आमंत्रित केले जाईल.
युवा उद्योजक आव्हान: व्हीबीवायएलडी 2027 साठी एक नवीन विभाग; यामध्ये युवा उद्योजकांना राष्ट्रीय विकासाच्या प्राधान्यक्रमांशी सुसंगत असलेली त्यांच्या नवोद्योगांची सादरीकरणे आणि व्यवसाय आराखडे सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
युवा संसद: व्हीबीवायएलडी 2027 मध्ये एकात्मिकरण; राष्ट्रीय स्तरावर अंतिम फेरीत पोहोचलेले स्पर्धक राष्ट्रीय व्हीबीवायएलडीमध्ये सहभागी होतील.
भारताच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांसाठी 10-क्षेत्रीय आराखडा
विकसित भारत आव्हानासाठी 10- क्षेत्रीय आराखडा स्वीकारण्यात येईल. यामध्ये विकासात्मक प्राधान्यक्रम आणि विकसित भारत @2047 कडे भारताचा प्रवास यांच्याशी संबंधित प्रदेशनिहाय संकल्पना असतील.
संकल्पनांमध्ये भविष्यातील प्रशासन, हवामानविषयक सुरक्षा, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, शाश्वत औद्योगिकीकरण, संपर्क व्यवस्था, उत्पादन क्षेत्र, आदिवासी नेतृत्व, नवोन्मेष, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नील अर्थव्यवस्था यांसारख्या क्षेत्रांचा समावेश असेल.
या आराखड्यामुळे देशाच्या विविध भागांतील युवा वर्गाला प्रदेश-निहाय आव्हाने ओळखता येतील, नाविन्यपूर्ण उपाय विकसित करता येतील आणि भारताच्या विकासाच्या प्रवासाला दिशा देणाऱ्या कल्पना मांडता येतील.
पंतप्रधानांसमोर कल्पना सादरीकरणाची संधी देणारा राष्ट्रीय संवाद
या कार्यक्रमाचा समारोप 10 ते 12 जानेवारी 2027 या काळात नवी दिल्ली इथे आयोजित राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवादाने होईल.
सर्व सहा विभागांतर्गत निवड झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संघांचा राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग असेल. विकसित भारत आव्हानाअंतर्गत, प्रादेशिक संघ विषय तज्ज्ञ, सचिव आणि केंद्रीय मंत्र्यांसमोर आपापल्या कल्पना मांडतील. तसेच, प्रादेशिक अंतिम फेरीतील संघांना पंतप्रधानांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल.
व्हीबीवायएलडी 2027 अशा प्रकारे तळागाळापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत युवा नेतृत्वासाठी एक मार्ग निर्माण करेल - याची सुरुवात विकसित भारत प्रश्नमंजुषेपासून होईल, त्यानंतर निबंध स्पर्धा, जिल्हास्तरीय आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय स्पर्धा होतील आणि शेवटी राष्ट्रीय व्यासपीठावर निवड झालेल्या युवा नेत्यांना धोरणकर्त्यांशी संवाद साधता येईल आणि भारताच्या भविष्यासाठी आपल्या कल्पना मांडता येतील.
महत्त्वाच्या तारखा
- विकसित भारत प्रश्नमंजुषा - 17 ऑगस्ट – 30 सप्टेंबर, 2026
- विकसित भारत निबंध स्पर्धा - 5 – 19 ऑक्टोबर, 2026
- जिल्हास्तरीय स्पर्धा - 10 – 16 नोव्हेंबर, 2026
- राज्य/केंद्रशासित प्रदेश विकसित भारत युवा नेतृत्व संवाद - 17 नोव्हेंबर – 7 डिसेंबर, 2026
- राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद, नवी दिल्ली - 10 – 12 जानेवारी, 2027
* * *
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301332)
आगंतुक पटल : 10