संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर भारत: संरक्षण उत्पादन विभागाने (डीडीपी) धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 405 वस्तूंची सहावी सकारात्मक स्वदेशीकरण यादी अधिसूचित केली

प्रविष्टि तिथि: 18 AUG 2026 1:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026

संरक्षण मंत्रालयाच्या 'संरक्षण उत्पादन विभागाने' (डीडीपी) सहावी 'सकारात्मक स्वदेशीकरण यादी' (पीआयएल) अधिसूचित केली आहे. यामध्ये अंदाजे 3,070 कोटी रुपयांची व्यावसायिक क्षमता असलेल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 405 वस्तूंचा समावेश आहे. या यादीमध्ये लाइन रिप्लेसेबल युनिट्स, सब-सिस्टम्स, सब-असेंब्लीज, सुटे भाग, घटक आणि कच्चा माल याचा समावेश आहे. यामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) 16 आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या (डीपीएसयू) 389 वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंमध्ये संरक्षण क्षेत्रातील विविध प्लॅटफॉर्म्स आणि प्रणालींच्या पुढील विस्तृत श्रेणीचा समावेश आहे:

· प्रगत लाइट हेलिकॉप्टर, लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर, एसयू -30 एमकेआय, लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि एएल -31 एफपी इंजिन यासारखे हवाई प्लॅटफॉर्म

· T-72, T-90 आणि BMP-II यासारखे चिलखती प्लॅटफॉर्म

· युद्धनौका

· कोंकुर्स-एम, इनवार आणि एमआरएसएएम यासारख्या क्षेपणास्त्र प्रणाली

· संरक्षण क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स, यात रडार, सोनार, फायर कंट्रोल सिस्टम्स आणि उपग्रह दळणवळण प्रणालींचा समावेश

· रणगाडा विरोधी दारूगोळा आणि इतर महत्त्वाची उच्च स्फोटक क्षमतेची संरक्षण सामग्री

405 वस्तूंची सहावी 'सकारात्मक स्वदेशीकरण यादी

वस्तूंची तपशीलवार यादी सृजन (SRIJAN) पोर्टल वर देखील उपलब्ध आहे (srijandefence.gov.in). प्रत्येक वस्तूमध्ये स्वदेशीकरणासाठी सूचक कालमर्यादा आहे. स्वदेशी विकास यशस्वी झाल्यानंतर या वस्तू भारतीय उद्योगांकडून खरेदी केल्या जातील. डीपीएसयू  आणि आयसीजी उद्योग, विशेषतः एमएसएमईच्या सहभागातून, ‘मेक’ (Make) प्रक्रिया आणि अंतर्गत विकास यासारख्या विविध मार्गांनी स्वदेशीकरणाची अंमलबजावणी करतील.

सहावी पीआयएल हे, आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमधील आणखी एक पाऊल आहे. यामुळे भारतीय उद्योगांसाठी संधींचा आणखी विस्तार होईल, देशांतर्गत संरक्षण उत्पादन परिसंस्था मजबूत होईल, गुंतवणूक आणि नवोन्मेषला चालना मिळेल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे.

डीडीपीने ऑगस्ट 2020 मध्ये ‘सृजन (SRIJAN) डिफेन्स पोर्टल हे एक समर्पित व्यासपीठ सुरू केले. या माध्यमातून डीपीएसयू आणि सेवा मुख्यालये (एसएचक्यू) संरक्षण क्षेत्रातील विविध उत्पादने/वस्तू स्वदेशी विकास आणि उत्पादनासाठी उपलब्ध करून देतात. यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्ट-अप्सचाही समावेश आहे. पोर्टलची सुरुवात झाल्यापासून, या पोर्टलने जून 2026 पर्यंत डीपीएसयू आणि एसएचक्यू द्वारे स्वदेशीकरणासाठी 33,000 हून अधिक संरक्षण वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित केली. यात पहिल्या पाच 'सकारात्मक स्वदेशीकरण याद्यां'अंतर्गत अधिसूचित केलेल्या 5,012 वस्तूंचा समावेश आहे.

15,700 हून अधिक संरक्षण साहित्याचे यशस्वीरीत्या स्वदेशीकरण करण्यात आले असून, यामुळे गेल्या पाच वर्षांत सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या आयातीला पर्याय निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी स्वदेशी उत्पादनासह मार्च 2026 पर्यंत देशांतर्गत विक्रेत्यांना अंदाजे 10,000 कोटी रुपयांच्या खरेदीच्या ऑर्डर दिल्या आहेत.


नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2300795) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam