राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप्स आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे वितरण
कलाकार, भारतीय परंपरेचे वाहक, आपल्या सामूहिक स्मृतीचे संरक्षक आणि भविष्यासाठीची दूरदृष्टी विकसित करणारे सर्जक : राष्ट्रपतींचे गौरवोद्गार
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2026 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप्स आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे आज (13 ऑगस्ट 2026) रोजी नवी दिल्लीत वितरण करण्यात आले.

आज ज्या कलाकारांचा इथे सन्मान करण्यात आला, ते सर्व मिळून, भारताचा एक सांस्कृतिक पटच आपल्यासमोर सादर करतात- असा पट ज्यावर इथल्या भूमीचा गंध असलेल्या कथा आणि गीते यांच्या धाग्यांनी विणलेला आहे; असा पट, जो या विविधांगी वसुंधरेवरची नृत्ये आणि उत्सव यांनी नटलेला आहे, असा एक पट, ज्यात भाषा आणि बोलीभाषांचा सुगंध आहे, ज्याला कित्येक शतकांच्या संस्कृतीने आकार दिला आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले.

भारत विविध प्रकारच्या सांगीतिक, नृत्य, शैली आणि असंख्य लोकनाट्य कलांच्या परंपरेने समृद्ध असलेला देश आहे. आपल्या भूमीत आपल्या संस्कृतीची पाळेमुळे घट्ट रूजली आहेत. आपल्या या विविध पाककला परंपरा, वेशभूषा, नृत्यप्रकार आणि संगीत या सर्वांना निसर्गातून प्रेरणा मिळते. पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळणारे धबधबे, झाडे आणि हिरवीगार वनराई, आकाशातील ढग तसेच नद्या यांच्यापासून कलाकार प्रेरणा घेतात आणि आपल्या नृत्य व संगीताच्या माध्यमातून ती साकारतात, असे सांगत, विविधता आणि एकता यांच्यातील हा बंध आपल्या कलाक्षेत्राची सर्वांत मोठी ताकद आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

भारतातील विविध कलाप्रकारांचे जतन आणि संवर्धन करण्यात गुरु-शिष्य परंपरेने महत्वाची भूमिका बजावली आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
आपल्या कलांसाठी गुरू हा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात आपल्या अनेक लोककलांवर नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा कलाप्रकारांचे केवळ दस्तऐवजीकरण करणेच नव्हे, तर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणेही आवश्यक आहे. संगीत नाटक अकादमी याच उद्देशाने 'कला-दीक्षा' कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, हे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. पुढच्या पिढीला घडवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी ज्येष्ठ कलाकारांना केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की कलेच्या मूल्यांमधून आणि संवेदनशीलतेतून जीवन समृद्ध करण्यासाठी निसर्ग हा सर्वात नैसर्गिक प्रशिक्षण मंच मानला जाते. लोककला आणि आदिवासी कला या जीवनाबद्दलचा नैसर्गिक उत्साह आणि निसर्गाशी असलेला सखोल संवाद दर्शवतात. या कला प्रकारांमध्ये समाजाच्या स्मृती आणि सामूहिक चेतनेला उत्स्फूर्त अभिव्यक्ती मिळते. नेमके याच कारणामुळे लोककला हा भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वपूर्ण पाया आहे.
राष्ट्रपतींनी संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. भारतीय परंपरेचे वाहक म्हणून ते आपल्या सामूहिक स्मृतीचे संरक्षक आणि भविष्यासाठीच्या दूरदृष्टीचे सर्जक आहेत, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, संगीत नाटक अकादमी हे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येत्या काळातही ही अकादमी भारताच्या सांस्कृतिक उर्जेने संपूर्ण जगाला समृद्ध करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
सोनाली काकडे/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2298954)
आगंतुक पटल : 32