संरक्षण मंत्रालय
स्वातंत्र्यदिन सोहळा 2026 मध्ये 'वंदे मातरमची दीडशे वर्षपूर्ती’ आणि ‘विकसित भारत 2047 साठी युवा शक्ती’चा करणार गौरव
इतिहासात प्रथमच, ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘वंदे मातरम’चे होणार गायन
पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्राला करतील संबोधित
स्वातंत्र्य दिनाच्या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे पाच हजार विशेष निमंत्रितांना आमंत्रण
Posted On:
10 AUG 2026 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026
संपूर्ण देश 15 ऑगस्ट, 2026 रोजी आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणा-या या या सोहळ्याचे नेतृत्व करतील. या सोहळ्याविषयी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी आज 10 ऑगस्ट, 2026 रोजी नवी दिल्लीत झालेल्या वार्ताहर परिषदेत माहिती दिली. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लाखो भारतीयांना प्रेरणा देणाऱ्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगानाला 2026 म्हणजे यावर्षी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत; या गीताच्या चिरस्थायी वारशाचा सन्मान करण्यासाठी हे राष्ट्रगान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन प्रथमच गायले जाणार आहे.
पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यानंतर वंदे मातरमचे गायन होईल, त्यानंतर ते राष्ट्रध्वज फडकवतील आणि राष्ट्राला उद्देशून पारंपरिक भाषण करतील. विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये युवकांच्या योगदानाला अधोरेखित करण्यासाठी या सोहळ्यात युवा शक्तीचा गौरव केला जाईल, असे संरक्षण सचिवांनी सांगितले.
वंदे मातरमची 150 वर्षे
फुलांची सजावट ‘वंदे मातरम्’या संकल्पनेवर आधारित असेल, एनसीसीची एकूण 2,500 मुले आणि मुल, कॅडेट्स तसेच ‘माय भारत स्वयंसेवक’, लाल किल्ल्याच्या तटबंदीसमोरील ज्ञानपथावर ‘वंदे मातरम्’ही अक्षरे मानवी साखळीच्या माध्यमातून साकारतील. भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर ‘वंदे मातरम’च्या150 वर्षांच्या स्मरणार्थ बॅनर घेऊन उड्डाण करेल आणि लालकिल्ल्यावर उपस्थित नागरिकांवर पुष्पवृष्टी करेल.
लष्कराच्या वाद्यवृंदाचे सादरीकरण
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या आणि एकत्र आणणाऱ्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ 8 ऑगस्ट 2026 पासून देशभरात अनेक संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सेनादल, नौदल, वायू दल, भारतीय तटरक्षक दल, एनसीसी, केंद्रिय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), भारत तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी), केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), एकात्मिक संरक्षण विभाग (आयडीएस), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि आसाम रायफल्सचे वाद्यवृंद देशातील 343 प्रमुख ठिकाणी 15 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यक्रम सादर करणार आहेत. नागरिकांमध्ये देशभक्तीचे वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाला नागरिकांना मुक्त प्रवेश आहे.
युवा शक्ती – विकसित भारत @2047 प्रवासाचे नेतृत्व
2026 च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील यशस्वी युवक, युवतींचा गौरव केला जाईल. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित यामधील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 19 विद्यार्थ्यांचे यश भारताच्या विज्ञान क्षेत्रातील युवा शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. या सर्वांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले असून त्यांना प्रमुख व्यासपीठासमोर स्थान देण्यात आले आहे.
कार्यक्रमस्थळी लावलेल्या फलकांमधून भारताची अणुउूर्जा आणि अंतराळ तंत्रज्ञातील प्रगती दर्शवण्यात येईल आणि मानवंदना विभागात विकसित भारत @ 2047 या दिशेने भारताचा प्रवास दर्शवणारी फुलांची सजावट केली जाणार आहे.
विशेष अतिथी
सुमारे 5000 विशेष अतिथी स्वातंत्र्यदिन सोहोळ्याला उपस्थित राहतील. या सर्वांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असून विकसित भारताच्या प्रवासात देशाला मार्गदर्शन करत आहेत. त्यांना विविध श्रेणींअंतर्गत विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत.
· राष्ट्रीय नवोन्मेष उपक्रमाअंतर्गत युवा नवोन्मेषक
· पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेतील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी विद्यार्थी
· विविध योजनांचे लाभार्थी असलेले सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे स्टार्ट अप्स
· पीएम कौशल विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षित सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे युवक
· स्टार्टअप इंडिया सीड फंड अंतर्गत सहाय्य मिळवलेल्या आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे स्टार्टअप्सचे चालक
· सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे ‘माय भारत’ स्वयंसेवक
· नमस्ते, पीएम अजय, सीड योजनेचे लाभार्थी
· विविध प्रश्नमंजूषा, स्पर्धांमधून निवडलेले दिल्ली सरकारी शाळांमधील विद्यार्थी
विकसित भारत@2047 साठी उद्योजक, नवप्रवर्तक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ, खालील श्रेणींमधून विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आले आहे:
· आंतरराष्ट्रीय योग दिन स्वयंसेवक
· पीएम मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजक
· पीएमएवाय (यू) चे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे लाभार्थी
· विविध क्षेत्रांतील नवप्रवर्तक/शास्त्रज्ञ
· दिल्लीतील भारत टॅक्सीचे सारथी/कॅब चालक/टॅक्सी चालक
· पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचे लाभार्थी
· पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीर
· प्रधानमंत्री योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे लाभार्थी, श्रम योगी मानधन (पीएम-एसवायएम) योजना
· प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजनेअंतर्गत (पीएम-एमकेएसएसवाय) सर्वोत्तम कामगिरी करणारे शेतकरी
विशेष अतिथींमध्ये काही ‘मूक योद्ध्यां’ चाही समावेश आहे. ज्या कार्यकर्त्यांनी इतरांना त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी अहोरात्र कठोर परिश्रम घेतले, त्यांना निमंत्रित केले आहे. याबरोबरच खालील श्रेणीतील विविध पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत येणारे पथविक्रेते
· स्वच्छ भारत अभियानांतर्गत कार्यरत शहरी स्वच्छता कर्मचारी
· उत्कृष्ट कामगिरी करणारे दिल्ली मेट्रोचे कर्मचारी
· कर्तव्य पथ/सेंट्रल विस्टा प्रकल्पातील उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी
· दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमधील परिचारिका आणि इतर कर्मचारी
या भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दिल्लीस्थित 1,500 हून अधिक नागरिकांना पारंपरिक वेशभूषेत आमंत्रित करण्यात आले आहे. लाल किल्ल्यावर ते भारताच्या विविधतेचे आणि संस्कृतीचे एक लघु रुप सादर करतील.
स्पर्धांच्या माध्यमातून मुलांचा सहभाग
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्रालयाने ‘माय.गव्ह.इन’ च्या सहकार्याने विविध प्रश्नमंजूषा आणि स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमधील सुमारे 600 विजेतेही या उत्सवात सहभागी होणार आहेत.
दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील सरकार, इतर मंत्रालये/विभाग आणि दिल्ली पोलीस देखील या राष्ट्रीय उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रश्नमंजुषा आणि उपक्रम आयोजित करित आहेत.
नागरिकांसाठी सुविधा
· स्वच्छतागृहांची सोय: मागच्या प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यांदरम्यान अभ्यागतांनी स्वच्छतागृहे उपलब्ध असल्याबाबत प्रशंसा केली होती. लोकांच्या सोयीसाठी, आगामी सोहळ्यानिमित्त सहा ठिकाणी 25 स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
· हेल्पडेस्कवर स्वयंसेवक: 200 स्वयंसेवक - यात माय भारतचे 100 आणि एन सी सी चे 100 स्वयंसेवक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अभ्यागतांना निर्धारित कक्षांपर्यंत पोहोचण्यास मदत करतील. लाल किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर या स्वयंसेवकांची ओळख पटेल.
· व्हीलचेअरची सुविधा: ज्या अभ्यागतांना गरज असेल त्यांच्यासाठी मेट्रो स्टेशन आणि पार्किंगच्या ठिकाणी एन सी सी कॅडेट्स व्हीलचेअरसह उपस्थित असतील.
· मेट्रो सेवा: कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजल्यापासून मेट्रो सेवा सुरू राहील. सर्व निमंत्रित व्यक्तींना मेट्रो सेवा मोफत दिली जाईल. ई-निमंत्रण पत्रिकेसोबत मेट्रोचे क्यूआर कोड दिले जातील.
· संचालन मैदानावर वाहनतळ सुविधा: वाहने उभी करण्यासाठी वैध पास/लेबल्स असलेल्या अभ्यागतांसाठी वाहनतळ सुविधा उपलब्ध असेल.
· पादचाऱ्यांसाठी रॅम्पची सुविधा: अपर सुभाष मार्गावरून लोअर सुभाष मार्गाकडे पादचाऱ्यांची ये-जा सुलभ व्हावी यासाठी रॅम्प आणि पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
· गुगल आणि मॅपल्स नकाशांचा वापर: मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी, वाहतुकीवर घातलेले निर्बंध लोकांना Google आणि Mappls नकाशांवर पाहता येतील.
· रेनकोट : हवामानाची अनिश्चितता लक्षात घेता, किल्ल्यावर उपस्थित मान्यवरांव्यतिरिक्त , माधवदास पार्क आणि 15 ऑगस्ट पार्क मधील सर्व निमंत्रितांनाही रेनकोट (poncho) देण्यात येतील.
निमंत्रण पत्रिका : समाज सेवा आणि कर्तव्यनिष्ठा
'सेवा तीर्थ' हे कर्तव्य, करुणा आणि 'राष्ट्र प्रथम' या तत्त्वाप्रती असलेल्या निष्ठेचे एक तेजस्वी आणि सामर्थ्यशाली प्रतीक आहे, आणि ही वास्तु पुढील पिढ्यांना नि:स्वार्थ सेवा आणि सर्वांच्या कल्याणासाठी अथक समर्पणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देईल असे, पंतप्रधान 'सेवा तीर्थ' राष्ट्राला समर्पित करताना म्हणाले होते. हीच भावना लक्षात घेऊन, या वर्षीच्या मुख्य कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांवर 'सेवा तीर्थ' दाखवण्यात आले आहे, जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी समर्पित भावनेने पुढे जाण्यास लोकांना प्रोत्साहन मिळेल. निमंत्रण पत्रिकेवर असलेले 'धर्मचक्र' हे नैतिक कर्तव्याची निरंतर गतिशीलता आणि सातत्यपूर्ण निष्काम कर्माचे प्रतीक आहे.
स्वच्छता अभियान :
कर्तव्याप्रती असलेली निष्ठा जोपासत, यावर्षी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी चे छात्र आणि ‘माय भारत’ या संस्थेच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने कार्यक्रमानंतर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
आसन कक्षांची नावे :
‘अति विशिष्ट व्यक्ति’ अर्थात व्हीआयपी संस्कृति संपुष्टात आणणे आणि जलसंधारणाचे महत्व अधोरेखित करण्याच्या हेतूने, 2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात, आसन व्यवस्थेला नद्यांची नावे देण्यात आली होती. त्याच धर्तीवर या वर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहोळयात, आसन कक्षांना भारतातील प्रमुख तलावांची नावे देण्यात आली आहेत.
दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील सरकार, इतर मंत्रालये/विभाग आणि दिल्ली पोलीस देखील या राष्ट्रीय उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रश्नमंजुषा आणि उपक्रम आयोजित करित आहेत.
सुवर्णा बेडेकर/निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/सुरेखा जोशी/राजेश शिरभाते/सविता म्हसकर/संदेश नाईक/प्रिती मालंडकर
(Release ID: 2297404)
अभ्यागत कक्ष : 279
Read this releasein:
Punjabi
,
Telugu
,
Manipuri
,
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam