राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते 12 व्या राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्याचे उद्घाटन; संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार 2025 प्रदान


हातमाग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पारंपरिक हस्तकलेला आधुनिक प्रवाह, ब्रँडिंग आणि जागतिक मूल्यसाखळीशी जोडून, तरुण उद्योजक, रचनाकार आणि नवंउद्योग या क्षेत्रात नव्या संधी निर्माण करू शकतात: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2026 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 ऑगस्ट 2026) नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित 12 व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहून 'संत कबीर हातमाग पुरस्कार' आणि 'राष्ट्रीय हातमाग पुरस्कार 2025' प्रदान केले. यावेळी भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरेचा गौरव करणारी चार स्मरणार्थ  टपाल तिकिटेही त्यांनी जारी केली.

उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, हातमाग हा शतकानुशतके भारताच्या नागरी संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे. त्या म्हणाल्या की, हातमाग भारताच्या अथांग वैविध्याचे प्रतिबिंब आहे आणि त्याने देशाच्या प्रादेशिक वैशिष्ट्यांचे जतन केले आहे. हातमाग क्षेत्र रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण, कला-संस्कृतीचे संवर्धन आणि निसर्गप्रेमाची भावना जोपासते. तसेच, हातमाग हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी आणि स्वावलंबनाच्या भावनेशीही अतूटपणे जोडलेला आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, 07 ऑगस्ट 1905 रोजी 'स्वदेशी चळवळी'ची औपचारिक सुरुवात झाली होती. बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरू झालेल्या या चळवळीचा उद्देश स्वदेशी वस्तू, देशांतर्गत उद्योग आणि विशेषतः देशातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देणे हा होता. या ऐतिहासिक घटनेचा सन्मान म्हणून, भारत सरकार 2015 पासून 07 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय हातमाग दिन' म्हणून साजरा करत आहे. त्यांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग क्षेत्राशी निगडीत प्रत्येकाचे अभिनंदनही केले. हा कार्यक्रम आपल्या देशाच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि त्या विविधतेतून प्रकट होणाऱ्या एकतेचा उत्सव आहे, असे त्या म्हणाल्या. भारताच्या हातमाग क्षेत्राला उच्च दर्जाची ओळख मिळवून देण्यासाठी सरकार आणि विणकर समाज यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचा गौरव करण्याचा हा प्रसंग आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताच्या ग्रामीण भागातील 'प्रीमियम' (उच्च-मूल्य) अर्थव्यवस्थेचे प्रमुख आणि मानवकेंद्रित उदाहरण म्हणून पुढे येण्याच्या दृष्टीने आपल्या हातमाग क्षेत्राची क्षमता लक्षणीयरित्या बळकट झाली आहे. हातमाग क्षेत्रातील प्रमुख समूह (क्लस्टर्स) आधुनिक तंत्रज्ञान आणि सद्यकालीन प्रशिक्षण पद्धतींशी जोडले जात आहेत. विणकरांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. हातमाग क्षेत्राचे 'प्रमाणित सांस्कृतिक अर्थव्यवस्थेत' रूपांतर करण्यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे या क्षेत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावत असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाल्याचेही त्या म्हणाल्या.

तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि नाविन्यपूर्ण डिझाइन्सच्या कल्पना असलेले अनेक प्रतिभावान तरुण उद्योजक या क्षेत्रात प्रवेश करत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.  त्यांच्या उत्साहामुळे आणि कौशल्यामुळे या क्षेत्राला दीर्घकालीन आणि बहुआयामी यश मिळावे यासाठी सरकारी योजना आणि संस्थांच्या माध्यमातून तरुणांसाठी सक्रीयपणे मदतीचा हात पुढे केला जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तरुण उद्योजक, डिझाइनर्स आणि स्टार्टअप्स हे पारंपरिक हस्तकलांना आधुनिक प्रवाह, ब्रँड्स आणि जागतिक मूल्य साखळ्यांशी जोडून या क्षेत्रात नवीन संधी निर्माण करू शकतात. तरुणांना या क्षेत्रात सामावून घेण्यासाठी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी' आणि 'विणकर सेवा केंद्रां'च्या कक्षेत कार्यरत असलेली 'डिझाइन रिसोर्स सेंटर्स' लक्षणीय कार्य करत असल्याचा उल्लेख करताना आपल्याला आनंद होत आहे, असे त्या म्हणाल्या.

या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. आधुनिक डिजिटल उपायांद्वारे बाजारपेठेतील उपलब्धता अधिक प्रभावी करता येऊ शकते. शिवाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय हातमाग उत्पादनांची जागतिक बाजारपेठेतील पोहोच लक्षणीयरीत्या वाढवता येईल. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी तसेच आत्मनिर्भरतेसाठी हातमाग क्षेत्र भक्कम आधार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'संत कबीर हातमाग पुरस्कार' हा देशातील हातमाग विणकरांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे; हा पुरस्कार म्हणजे त्यांची असाधारण कारागिरी, आयुष्यभर निष्ठेने केलेले काम आणि भारताच्या विणकाम परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यात त्यांनी सातत्याने दिलेले योगदान याला दिलेली पोचपावती असते. पारंपरिक कौशल्ये जपण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्कृष्ट सर्जनशीलता, गुणवत्ता, नाविन्य आणि नैपुण्य सिद्ध केले आहे अशा हातमाग विणकरांना आणि संबंधित घटकांना 'राष्ट्रीय हातमाग पुरस्काराने' गौरवण्यात येते.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

शैलेश पाटील/आशुतोष सावे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2296417) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Telugu , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Gujarati , Odia , Kannada