माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या 'ब्रिक्स वेव्हज बाजार'मध्ये ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधले 500 हून अधिक प्रतिनिधी मुंबईत आले एकत्र
ब्रिक्स वेव्हज बाजार हा जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या भविष्याला आकार देण्यासाठी तयार केलेला एक उच्च-स्तरीय, आणि सुनियोजित संगम: आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री - इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, एआय आणि संस्कृती, महाराष्ट्र शासन
सर्जनशील अर्थव्यवस्थेमध्ये अधिक बळकट संस्थात्मक आणि व्यावसायिक दुवे निर्माण करण्यासाठी भारत आपला अनुभव सामायिक करायला आणि ब्रिक्स भागीदारांबरोबर काम करण्यास तयार आहे: चंचल कुमार, सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनी ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांच्या भागधारकांना इफ्फी 2026 मध्ये सहभागी होण्याचे दिले निमंत्रण, एकत्र येणाऱ्या सर्जनशील मनांची ताकद दाखवून देण्याचे भागधारकांना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2026 2:54PM by PIB Mumbai
मुंबई, 6 ऑगस्ट 2026
सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य व भागीदार देशांतल्या 500 हून अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 'ब्रिक्स वेव्हज बाजार'ला आज मुंबईत सुरुवात झाली. 2 दिवस चालणाऱ्या या ब्रिक्स वेव्हज बाजारचे उद्दिष्ट दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, व्यावसायिक प्रतिबद्धता, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधले सहकार्य मजबूत करणे हे आहे. या बाजारामध्ये सहभागी होणाऱ्या भागधारकांमध्ये सरकारी प्रतिनिधी, उद्योग संस्था, निर्माते, गुंतवणूकदार, ब्रॉडकास्टर्स, ओटीटी मंच, तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, सांस्कृतिक संस्था आणि सर्जनशील उद्योजकांचा समावेश आहे.
उद्घाटन समारंभात मुख्य भाषण करताना, महाराष्ट्र शासनाचे इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, एआय आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी जागतिक सर्जनशील कुटुंबाचे चैतन्यमय मुंबई शहरात स्वागत केले. मुंबईला भारताच्या सर्जनशील परिसंस्थेचे हृदय असे संबोधत शेलार म्हणाले की, कला आणि तंत्रज्ञान यांच्यातल्या सीमा वेगाने पुसट होत आहेत. ब्रिक्स वेव्हज बाजार हे केवळ एक प्रदर्शन नाही, तर हा जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या भविष्याला आकार देण्यासाठी तयार केलेला एक उच्च-स्तरीय, सुनियोजित संगम आहे, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारत 'विश्वगुरू' म्हणून आपले हक्काचे स्थान आणि जगासाठी एक सांस्कृतिक व बौद्धिक मार्गदर्शक प्रकाश म्हणून आपली ओळख पुन्हा खंबीरपणे प्रस्थापित करत आहे, असे शेलार यांनी नमूद केले. या भव्य दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे सांस्कृतिक अर्थव्यवस्था असून, हे जिथे आपला प्राचीन वारसा, अमर्याद सर्जनशीलता आणि आधुनिक वाणिज्य यांचा संगम होतो असे चैतन्यमय क्षेत्र आहे, असेही ते म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देश आणि समुदायांना जोडण्यासाठी संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या शक्तीवर सातत्याने भर दिला आहे आणि चित्रपट क्षेत्रातील ब्रिक्स सहकार्यामध्ये भारताचा सहभाग याच दृष्टिकोनातून वाढला आहे. ते पुढे म्हणाले की, मुंबईतील ब्रिक्स वेव्हज बाजार आणि नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, इफ्फी सोबतच आयोजित केला जाणारा ब्रिक्स चित्रपट महोत्सव हे दोन्ही उपक्रम एकमेकांना पूरक असे व्यासपीठ उपलब्ध करून देतील यामधील एक व्यासपीठ व्यवसाय, भागीदारी आणि बाजारपेठेतील प्रवेशासाठी असेल, तर दुसरे चित्रपट, चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांसाठी असेल.
चंचल कुमार यांनी पुढे सांगितले की, ब्रिक्स देशांकडे संहिता,कथा, प्रतिभा, प्रेक्षक, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांचा प्रचंड साठा उपलब्ध आहे आणि या सामर्थ्याला अधिक पद्धतशीरपणे जोडण्याची संधी येथे आहे. वेव्हज बाजार हे जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी असे एक व्यासपीठ होत आहे जिथे नवीन प्रकल्प शोधले जातील, भागीदारी सुरू केली जाईल, सह-निर्मितीबाबत चर्चा होईल आणि नवीन बाजारपेठा खुल्या होतील. हे व्यासपीठ ब्रिक्स सदस्य आणि 21 देशांमधील भागीदारांना एका सामायिक उद्दिष्टासाठी एकत्र आणते; ते उद्दिष्ट म्हणजे चित्रपट, दूरचित्रवाणी , ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, संगीत, डिजिटल मीडिया आणि उदयोन्मुख आशय प्रकारांमध्ये सहकार्यासाठी अधिक मजबूत मार्ग निर्माण करणे आहे. तसेच, वेव्हज बाजार कालांतराने अशा एका मान्यताप्राप्त व्यासपीठाच्या रूपात विकसित व्हावे, जिथे ब्रिक्समधील सर्जनशील उद्योग एकमेकांना भेटू शकतील, व्यवहार करू शकतील, सहकार्य करू शकतील आणि प्रगती करू शकतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी असेही म्हटले की, ब्रिक्स बाजारपेठांमध्ये ब्रिक्स-निर्मित आशयाचा अर्थात कंटेंट चा प्रसार वाढवण्याची गरज आहे. "आपल्या प्रेक्षकांना एकमेकांचे चित्रपट, मालिका, ॲनिमेशन, संगीत आणि डिजिटल आशय अधिक सहजपणे उपलब्ध व्हायला हवेत. सर्जनशील अर्थव्यवस्थेमध्ये अधिक मजबूत संस्थात्मक आणि व्यावसायिक दुवे निर्माण करण्यासाठी भारत आपला अनुभव सामायिक करण्यास आणि ब्रिक्स भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहे. असेही ते म्हणाले.
चंचल कुमार पुढे म्हणाले की, वेव्हज आणि वेव्हज बाजार , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज, इंडिया सिने हब यांसारख्या व्यासपीठांद्वारे तसेच निर्मात्यांचे कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रमांद्वारे भारत ब्रिक्सच्या या व्यापक सहकार्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहे. या उपक्रमांचा उद्देश भारतीय क्षमतांना आंतरराष्ट्रीय भागीदारांशी जोडणे आणि संयुक्त प्रकल्प, तंत्रज्ञान भागीदारी, कौशल्य विकास व बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करणे हा आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी ब्रिक्स मधील सर्व सदस्य आणि भागीदार देशांना 2027 मध्ये मुंबईत होणाऱ्या वेव्हजच्या पुढील आवृत्तीत सक्रियपणे सहभागी होण्याचे निमंत्रणही दिले.

‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे’ (IFFI) संचालक आणि विख्यात चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी सर्व संबंधितांना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (IFFI) सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. या चित्रपट महोत्सवात 8 निवडक विभागांमध्ये अंदाजे 250 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. चित्रपटाचे सामर्थ्य आणि सर्जक अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना गोवारीकर म्हणाले की, त्या त्या देशांतील चित्रपटाच्या माध्यमातून, त्यातील कथांमधून, त्या देशाला प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी किंवा भेट न देताही, त्या देशाच्या संस्कृतीची आपल्याला ओळख होते आणि सर्व ठिकाणच्या भावभावना वैश्विक अर्थात सारख्याच असल्याचा आपल्याला साक्षात्कार होतो. ब्रिक्स वेव्हज बाजार' सारख्या व्यासपीठांमुळे पटकथांचे चित्रपटांत रूपांतर होण्यास आणि चित्रपट निर्मात्यांना सह-कलाकार किंवा सहयोगी मिळण्यास मदत होते. सर्जनशील अभिव्यक्ति जेव्हा एकत्र येते तेव्हा काय घडू शकते, हे जगाला दाखवून देण्यासाठी ब्रिक्स भागीदार देशांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.
भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या 'ब्रिक्स वेव्ह्स बाजार 2026 ' ची मध्यवर्ती संकल्पना 'लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी' अशी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव (एमईआर-3) राजीव बोडवाडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सृजनशील अर्थव्यवस्था हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक महत्वाचा घटक असून, जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात त्याचे 3 पूर्णांक 1 दशांश टक्के योगदान आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय सेवा निर्यातीतून 1.4 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त महसूल निर्माण करते. आपल्या गतिमान डिजिटल बाजारपेठ आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांची सांगड घालून, या गतीचा उपयोग करून घेण्याची ब्रिक्स देशांना अनोखी संधी असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

भारतीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, की या दोन दिवसीय 'ब्रिक्स वेव्ह्स बाजार 2026’ मध्ये उच्च स्तरीय परिषदा, प्रमुख भाषणे, तज्ञांच्या गटांच्या चर्चा, व्यावसायिक नेटवर्किंग सत्रे आणि निवडक बिझनेस-टू-बिझनेस (B2B) बैठका अशा बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सह-निर्मिती, आशयविषयक वित्तपुरवठा, डिजिटल परिवर्तन, बौद्धिक संपदा, महिला-नेतृत्वाखालील उद्योजकता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, सार्वजनिक धोरण आणि विकसनशील किंवा अविकसित देशांनी आपापसात ज्ञान, तंत्रज्ञान, संसाधने आणि अनुभव यांची केलेली देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्य यासह सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या भवितव्याला आकार देणाऱ्या प्रमुख संकल्पनांवर या चर्चेत भर दिला जाईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव सेंथिल राजन यांनी या उद्घाटनपर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. ब्रिक्स वेव्हज बझार हा सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवोन्मेष, उद्योजकता, रोजगार आणि आर्थिक वाढीची प्रमुख प्रेरक संस्था म्हणून स्थान देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे, असे ते आपल्या भाषणात म्हणाले.
ब्रिक्स वेव्हज बाजार, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून, दीर्घकालीन भागीदारीला प्रेरणा देण्याचा, त्याचबरोबर, ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

पीआयबी मुंबई |सुषमा काणे/निखिलेश चित्रे/राजेश शिरभाते/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295427)
आगंतुक पटल : 28