युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील भारोत्तोलन क्रीडा प्रकारातील पदकविजेत्यांचा रोख पुरस्कारांनी केला गौरव, या खेळाडूंनी शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन भावी पिढ्यांना प्रेरणा द्यावी असे खेळाडूंना केले आवाहन
Posted On:
03 AUG 2026 4:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026
ग्लासगो इथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 (CWG - Commonwealth Games) मधील भारोत्तोलन या क्रीडा प्रकारातील भारताच्या पदकविजेत्यांचा केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते सोमवारी सत्कार केला गेला. यावेळी मांडविया यांनी या खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. या स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी विविध 11 वजनी गटांमध्ये सहभाग घेतला होता, त्यात भारतीय खेळाडूंनी 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य अशा एकूण 8 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तसेच राष्ट्रकुल देशांमधील अनेक नवीन विक्रम नोंदवले, तर काही खेळाडूंनी आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सुवर्णपदक विजेत्यांना 30 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना 20 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्यांना 10 लाख रुपयांचे रोख पुरस्कारही प्रदान केले. या स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी देशासाठी आतापर्यंतची अत्यंत उत्तम कामगिरी नोंदवली.

यावेळी डॉ.मनसुख मांडविया यांनी या भारोत्तोलकांचे अभिनंदन केले. संपूर्ण देशाने या खेळाडूंनी मिळवलेले यश साजरे केल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. ज्या ज्या वेळी खेळाडूंनी पदके जिंकली, त्या त्या वेळी संसदेतही त्याबाबतची घोषणा केली गेली अशी माहिती त्यांनी दिली. त्या क्षणांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटल्याचेही त्यांनी सांगितले.
या सत्कार समारंभाला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय शर्मा हे देखील उपस्थित होते. दरम्यान डॉ. मनसुख मांडविया यांनी विजय शर्मा यांच्यासह सर्व प्रशिक्षकांचाही गौरव केला. विजेते खेळाडू घडवण्यात या प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती ही बाब त्यांनी अधोरेखित केली. खेळाडूंच्या वाटचालीत गुरूची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. यासोबतच विजेते खेळाडू घडवण्यात प्रशिक्षकाच्या योगदानापेक्षा काहीही मोठे नसते असेही ते म्हणाले.
P4AE.jpeg)
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू हिने सलग तीन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय भारोत्तोलक खेळाडू ठरली. ऋषिकान्त सिंह आणि वल्लुरी अजय बाबू यांनी स्नॅच प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतले नवे विक्रम नोंदवले. ज्ञानेश्वरी यादव आणि हरजिंदर कौर यांच्यासह अनेक भारोत्तोलकांनीही आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या 11 भारोत्तोलकांपैकी 6 खेळाडू हे खेलो इंडिया उपक्रमातील खेळाडू आहेत. पदकविजेत्यांपैकी ज्ञानेश्वरी ही खेलो इंडिया उपक्रमातील खेळाडू आहे, तर बिंद्याराणी देवी, हरजिंदर आणि इतर खेळाडू पतियाळा इथल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. हे केंद्र भारतातील तळागाळातील आणि प्रतिभावान क्रीडापटूंच्या जडणघडणीच्या परिसंस्थेने मिळावलेल्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे.
1BJU.jpeg)
या खेळाडूंनी भारोत्तोलन क्रीडा प्रकाराचे दूत बनावे असे आवाहन मांडविया यांनी यावेळी केले. युवा पिढीचा क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठीचा रस वाढावा यादृष्टीने त्यांना प्रेरणा देण्याकरता या खेळाडूंनी शाळा आणि महाविद्यालयांना भेटी द्याव्यात असे आवाहनही त्यांनी या भारोत्तोलक खेळाडूंना केले. या पदकविजेत्या खेळाडूंच्या यशोगाथा हजारो मुलांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात, तसेच आपण सर्व जण मिळून भारताला खऱ्या अर्थाने क्रीडाप्रधान देश बनवण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलत आहोत असे ते म्हणाले.
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2293832)
अभ्यागत कक्ष : 53
Read this releasein:
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil