वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि रवांडा यांच्यात द्विपक्षीय व्यापार व गुंतवणूक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी पहिल्या संयुक्त व्यापार समितीची बैठक


द्विपक्षीय व्यापार वाढवण्यास तसेच उद्योग-ते-उद्योग (B2B) सहभाग अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांची वचनबद्धता

उभय देशांकडून महत्त्वपूर्ण खनिजे, आरोग्यसेवा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी प्राधान्य क्षेत्रांची ओळख निश्चिती  

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2026 12:19PM by PIB Mumbai


भारत –रवांडा संयुक्त व्यापार समितीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन 30 आणि 31 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. या बैठकीत वाणिज्य विभागाचे संयुक्त सचिव अमित कुमार यांनी भारतीय प्रतिनिधीमंडळाचे, तर रवांडाच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालयाचे आशिया, प्रशांत व मध्य पूर्व व्यवहार विभागाचे महासंचालक व्हर्जिल रवान्यागातारे यांनी रवांडाच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले.


वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव यशवीर सिंह यांनी उद्घाटनपर भाषण केले. हे पहिलेच सत्र दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराचा आढावा घेण्यासाठी, व्यापार क्षेत्रांमध्ये विविधता आणण्यासाठी, दोन्ही बाजूंनी होणाऱ्या गुंतवणुकीचा विस्तार करण्यासाठी तसेच वाहतूक व लॉजिस्टिक्समधील अडचणी दूर करण्यासाठी एक कायमस्वरूपी, सुटसुटीत आणि नियमित शिखर यंत्रणा स्थापन करते, असे ते या भाषणात म्हणाले.

दोन्ही देशांनी वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापाराच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. भारताकडून रवांडाला प्रामुख्याने औषधी उत्पादने व बायोलॉजिकल्स, दुचाकी आणि तीन-चाकी वाहने, औद्योगिक व इलेक्ट्रिकल यंत्रसामग्री, पेंड (ऑइल मील्स), आणि लोखंड व पोलादाची उत्पादने निर्यात केली जातात. दुसरीकडे, रवांडाकडून भारतात शिशा (लेड), मसाले, सुगंधी तेल, तांबे, मौल्यवान व निम-मौल्यवान खडे, प्रक्रिया केलेले शेतीमाल आणि खनिज पदार्थांची आयात केली जाते. द्विपक्षीय व्यापाराचा दायरा वाढवण्यासाठी, दोन्ही देशांतील उद्योगांमधील थेट संपर्क वाढवण्यासाठी आणि बाजारपेठेतील प्रवेशाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर उभय देशांचे एकमत झाले.

भारताने अवजड अभियांत्रिकी वस्तू, औषधे व वैद्यकीय उपकरणे, शुद्ध केलेले पेट्रोलियम पदार्थ, वस्त्रोद्योग, सागरी उत्पादने, प्लास्टिक, क्रीडा साहित्य व खेळणी, हिरे-माणके व दागिने, आणि वैज्ञानिक उपकरणांची निर्यात वाढवण्याच्या क्षमतेवर भर दिला. रवांडाच्या एकूण औषध आयातीपैकी सुमारे 24.5 टक्के हिस्सा एकट्या भारताचा असून, भारत हा रवांडासाठी औषध आयातीचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले.
रवांडाने मिरची, मॅकाडामिया (एक प्रकारचे बदाम), फ्रेंच बीन्स, एवोकॅडो, सुगंधी तेल, चहा, कॉफी, इतर फलोत्पादन उत्पादने, खनिजे आणि मौल्यवान खडे या वस्तूंची भारताला प्राधान्याने निर्यात करण्याची इच्छा व्यक्त केली. याशिवाय, 'भारतीय मानक ब्यूरो' (BIS) आणि 'रवांडा मानके बोर्ड' (RSB) यांच्यातील क्षमता बांधणीसह मानकांचे एकसूत्रीकरण करण्यावरही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली.

2025 पर्यंत भारत हा आपला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा परकीय गुंतवणूकदार असल्याचे रवांडाने गुंतवणुकीच्या संदर्भात नमूद. तसेच खाणकाम, कृषी-प्रक्रिया उद्योग, परवडणारी घरे, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान, उत्पादन, आरोग्यसेवा, पर्यटन आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांच्या शिष्टमंडळाने अधोरेखित केले. संयुक्त व्यापार समितीच्या चौकटीअंतर्गत दोन्ही देशांनी इन्व्हेस्ट इंडिया आणि रवांडा डेव्हलपमेंट बोर्ड यांची गुंतवणुकीसाठी प्रमुख संपर्क संस्था म्हणून नियुक्ती केली. तसेच व्यापार मेळावे, व्यावसायिक मंच आणि खरेदीदार-विक्रेता भेटी यांच्या दिनदर्शिकांची परस्पर देवाणघेवाण करण्यावरही सहमती दर्शवली. याशिवाय, पूर्व आफ्रिकी समुदाय, पूर्व व दक्षिण आफ्रिकेची समान बाजारपेठ आणि आफ्रिकन खंडीय मुक्त व्यापार क्षेत्र  यांसाठी प्रवेशद्वार म्हणून असलेल्या आपल्या धोरणात्मक भौगोलिक स्थानावर रवांडाने विशेष भर दिला. त्यामुळे भारतीय उद्योगांना अधिक व्यापक प्रादेशिक बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होत असल्याचेही रवांडाने स्पष्ट केले.

उभय पक्षांनी क्षेत्रीय सहकार्यासाठी अनेक प्राधान्य क्षेत्रे निश्चित केली. दुर्मिळ व महत्त्वाच्या खनिजांच्या बाबतीत, भारताने रवांडाच्या टिन, टंगस्टन आणि टँटलमच्या संसाधनांवर सहकार्य अधिक मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि 'रवांडा माईन्स, पेट्रोलियम अँड गॅस बोर्ड' यांच्यातील संस्थात्मक सहकार्याचाही समावेश आहे. औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवा क्षेत्रात, दोन्ही देशांच्या आरोग्य प्राधिकरणांमधील सामंजस्य करार स्वाक्षरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, भारताने भारतीय फार्माकोपिआला (Indian Pharmacopoeia) मान्यता देण्याचा आणि पारंपारिक औषध पद्धतींमधील सहकार्य वाढवण्याचा प्रस्ताव मांडला.

या चर्चेमध्ये कृषी आणि कृषी-प्रक्रिया क्षेत्रातील सहकार्याचाही समावेश होता, ज्यामध्ये अ‍ॅव्होकॅडोसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, वस्त्रोद्योग आणि चर्मोद्योग, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, फिनटेक आणि सायबर सुरक्षा तसेच नवीकरणीय ऊर्जा या विषयांवर चर्चा झाली. भारताने 'भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य' कार्यक्रम, 'स्टडी इन इंडिया' उपक्रम आणि 'स्किल इंडिया मिशन'च्या माध्यमातून क्षमता बांधणीसाठी सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले; ज्यामध्ये रवांडाच्या तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण व्यवस्थेला बळकट करण्यासाठीच्या सहकार्याचा समावेश आहे.

ही चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण आणि रचनात्मक वातावरणात पार पडली. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी द्विपक्षीय व्यावसायिक भागीदारीला पुढे नेल्याबद्दल दोन्ही शिष्टमंडळांचे अभिनंदन केले आणि संमती दिलेल्या इतिवृत्तामध्ये नोंदवलेल्या निष्पन्नांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या तसेच त्यांची वेळेत अंमलबजावणी करण्याच्या गरजेवर भर दिला. संमती दिलेल्या या इतिवृत्तावर 31 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांनी एका वर्षानंतर, परस्परांना सोयीस्कर ठरेल अशा तारखेला, 'भारत–रवांडा संयुक्त व्यापार समिती'ची दुसरी बैठक रवांडामध्ये घेण्याचे मान्य केले.

 

***

यश राणे / वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292968) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam