पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेस कंपनीला दिल्या शुभेच्छा


खाजगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या  विक्रम-1 या पहिल्या रॉकेटच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्याचे नागरिकांना केले आवाहन

Posted On: 18 JUL 2026 9:54AM by PIB Mumbai

भारतात खाजगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम-1  या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाच्या पहिल्या ऐतिहासिक प्रक्षेपणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्कायरूट एरोस्पेस या कंपनीला शुभेच्छा दिल्या आहेत. हा देशाच्या अंतराळ क्षेत्रातील वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. विक्रम-1 च्या प्रक्षेपणामुळे देशाच्या अंतराळ क्षेत्रासंबंधीच्या महत्त्वाकांक्षेसाठी एक नवे दार उघडले जाणार आहे, या प्रक्षेपणातून देशाची नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकता क्षेत्रातील वाढती क्षमता दिसून येते, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

देशाच्या नागरिकांनी, विशेषतः देशातील युवा वर्गाने या ऐतिहासिक मोहिमेचे साक्षीदार व्हावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.
या संदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वाटचालीचा एक नवा ऐतिहासिक टप्पा !
आज सकाळी 11:30 वाजता, स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी भारतात खाजगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम-1  या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचे प्रक्षेपण करेल.
चार टप्प्यांअंतर्गत मार्गाक्रमण करणारे हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशाने डिझाइन केले गेले आहे. या मोहीमेच्या माध्यमातून  आपल्या युवा वर्गाचे कौशल्य, दृढनिश्चय आणि उद्योजकतेची भावना अधोरेखित होते. यासोबतच अंतराळ क्षेत्रातील आपण घडवून आणलेल्या सुधारणांमुळे नवोन्मेष आणि उद्योजकतेसंबंधीच्या नवीन संधी कशा रितीने निर्माण होऊ लागल्या आहेत हे सुद्धा या प्रक्षेपणातून दिसून येते.
हे प्रक्षेपण यशस्वी व्हावे, यासाठी  स्कायरूट एरोस्पेसच्या संपूर्ण पथकाला माझ्या शुभेच्छा. हे विक्रम-1 रॉकेट उत्तुंग भरारी घेवो, इतिहास रचो आणि नवोन्मेषकांच्या पिढ्यांना प्रेरित करो ही सदिच्छा.
मी सर्व भारतीयांना, विशेषतः माझ्या युवा मित्रवर्गाला ना या ऐतिहासिक मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहण्याचे तसेच #IndiaWithVikram1 या हॅशटॅगचा वापर करून स्कायरूटच्या पथकाला यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतो.

 

***

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/परशुराम कोर
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2286020) अभ्यागत कक्ष : 59