युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी माय भारतकडून नोंदणीला प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2026 8:29PM by PIB Mumbai
अमली पदार्थांच्या व्यसनाधिनतेविरोधातील लढा जनआंदोलन बनविण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला बळ देत, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मेरा युवा भारत (MY Bharat/माय भारत ) च्या माध्यमातून देशव्यापी 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानाच्या पुढील टप्प्याची सुरुवात केली आहे. या अभियानाअंतर्गत 13 जुलै 2026 पासून जिल्हास्तरीय स्पर्धांना प्रारंभ होणार असून, त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या संकल्पनेला देशव्यापी आणि संरचित स्वरूप देण्यासाठी या स्पर्धा जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर अशा त्रिस्तरीय पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत. 13 जुलै 2026 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर 24 ते 27 जुलै 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात येतील. प्रत्येक गटातील प्रथम 3 उत्कृष्ट प्रवेशिकांची निवड केली जाईल. जिल्हास्तरीय विजेते 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय निवड फेरीत सहभागी होतील. राज्यस्तरीय विजेत्यांना त्यानंतर 12 आणि 13 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा शिखर संमेलनादरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी आमंत्रित करण्यात येईल. या अंतिम फेरीत देशभरातील होतकरू युवा राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या सर्जनशीलतेचे सादरीकरण करतील.
जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 13 जुलै 2026 पासून माय भारत पोर्टलवर (mybharat.gov.in) नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. युवक-युवती या पोर्टलवर नोंदणी करून आपल्या सर्जनशील कलाकृती अपलोड करू शकतील. या प्रवेशिका स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून ग्राह्य धरल्या जातील.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने MY Bharat/माय भारतच्या माध्यमातून देशभरातील युवा शक्तीला या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या सर्जनशीलतेचा उपयोग सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून करत 'नशामुक्त भारत' या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी योगदान द्यावे तसेच अमृत काळातील विकसित भारत या राष्ट्रीय ध्येयाशी आपली ऊर्जा, क्षमता आणि आकांक्षा जोडाव्यात, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
***
सुषमा काणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2283962)
आगंतुक पटल : 14