पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबत भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त जाहीरनामा

प्रविष्टि तिथि: 09 JUL 2026 10:55AM by PIB Mumbai

नवी दिल्ली,9 जुलै 2026

आम्ही, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, आमच्या घनिष्ट द्विपक्षीय संबंधांमुळे एकत्र आलो आहोत; आमच्या देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या निर्धाराने एकजूट होऊन ; तसेच मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद -प्रशांत क्षेत्राच्या सामायिक महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबतच्या या संयुक्त जाहीरनाम्याप्रति वचनबद्ध आहोत.

2020मध्ये स्थापित आमच्या 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चे महत्त्व आम्ही पुन्हा अधोरेखित करतो. या भागीदारीच्या सुरुवातीपासून , आमच्या धोरणात्मक दृष्टिकोनातील एकरूपता वाढली आहे, आमचे आर्थिक संबंध अधिक दृढ झाले आहेत आणि आमच्या देशांमधील 'जिवंत दुवा' असलेल्या जनतेमधील परस्पर संबंध अधिक बळकट झाले आहेत. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय अशा दोन्ही स्तरांवर आमचा जो निकटचा सहभाग आहे—ज्यामध्ये 'क्वाड' सारख्या प्रादेशिक मंचांद्वारे आणि इतर बहुपक्षीय संस्थांमार्फत इतर भागीदारांसोबत सहभागही समाविष्ट आहे—दोन्ही देशांसाठी लाभदायक आहे आणि आमच्या सामायिक क्षेत्राच्या सुरक्षा व समृद्धीमध्येही योगदान देतो याची आम्ही दखल घेतली आहे. 

'सुरक्षा सहकार्याबाबतच्या 2009 च्या भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त जाहीरनाम्या'मुळे आमच्या भागीदारीत झालेली महत्त्वपूर्ण प्रगती आम्ही अधोरेखित करतो. परराष्ट्र मंत्र्यांचा 'संरचना संवाद' (FMFD), '2+2 ' परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय संवाद आणि संरक्षण मंत्र्यांचा संवाद यांसारख्या विविध द्विपक्षीय यंत्रणांद्वारे या भागीदारीत दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाचे आम्ही स्वागत करतो.

भू-सामरिक अनिश्चितता तसेच प्रादेशिक शांतता व स्थिरतेला असलेला धोका यांबाबत आम्ही चिंता व्यक्त करतो. आम्ही सर्व पक्षांना शांततापूर्ण मार्गाने एकत्रितपणे काम करण्यास प्रोत्साहित करतो आणि बळाचा किंवा दबावाचा वापर न करता, तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वाद मिटविण्याचे आवाहन करतो.

मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्राप्रति आमची अतूट वचनबद्धता आम्ही पुन्हा एकदा व्यक्त करतो. ही वचनबद्धता पुढील बाबींवर आधारित आहे: आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालनावर केंद्रित नियम-आधारित व्यवस्था ; सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर; सागरी कायद्याबाबत 1982 च्या संयुक्त राष्ट्र कराराचे (UNCLOS) पालन करून मुक्त, स्थिर आणि सुरक्षित सागरी क्षेत्र (ज्यामध्ये नौकानयन आणि हवाई उड्डाणाचे स्वातंत्र्य समाविष्ट आहे); तसेच प्रभावी, सर्वसमावेशक आणि पारदर्शक संस्था.

या क्षेत्रांमधील आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रमुख मंच म्हणून 'इंडियन ओशन रिम असोसिएशन' (IORA), 'आसियान' (ASEAN) व आसियान-केंद्रित प्रादेशिक व्यवस्था आणि 'पॅसिफिक आयलंड्स फोरम' (PIF) प्रति आम्ही पुन्हा एकदा आमचा पाठिंबा व्यक्त करतो.

बदलत्या धोरणात्मक परिस्थितीला अनुरूप आमच्या भागीदारीत बदल होणे आवश्यक आहे, हे आम्ही मान्य करतो आणि आमच्या प्रगत, एकात्मिक व उच्चस्तरीय संरक्षण आणि सुरक्षा भागीदारीला गती देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही धोरणात्मक देवाणघेवाण अधिक मजबूत करत राहू आणि आमच्या धोरणात्मक हितांच्या एकत्रीकरणाचे प्रतिबिंब दर्शवणारी नियमित मंत्रीस्तरीय चर्चा आयोजित करू. सामूहिक ताकद वाढवण्यासाठी संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यासाठी एक दीर्घकालीन दृष्टीकोन आवश्यक असल्याचे आम्ही जाणतो. हे सहकार्य दोन्ही देशांच्या सुरक्षेसाठी योगदान देईल तसेच प्रादेशिक शांतता व सुरक्षेसाठी देखील महत्त्वपूर्ण हातभार लावेल.

आम्ही आमचे सर्वसमावेशक संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी, धोरणात्मक संवाद अधिक दृढ करण्यासाठी आणि सहकार्य अधिक तीव्र करण्याचे आश्वासन देतो , ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

अ. सामायिक हितांवर परिणाम करणाऱ्या हिंद-प्रशांत क्षेत्रामधील संरक्षण-संबंधित घडामोडींवर सल्लामसलत करणे

आ. संरक्षण सराव अधिक जटिल बनवणे ज्यात भागीदारांसोबत केले जाणारे सराव समाविष्ट आहेत ;

इ . संरक्षण दलांमधील परस्पर ताळमेळ आणि माहिती सामायिक करण्याची क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांना गती देणे;

ई . एकमेकांच्या भूमीवरून विमानांच्या तैनातीचा विस्तार करणे;

उ. देवाणघेवाण कार्यक्रम, शिक्षण व प्रशिक्षण आणि संपर्क-समन्वय यांसारख्या माध्यमांतून संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांमधील संबंध अधिक दृढ करणे;

ऊ . कुशल संरक्षण मनुष्यबळाच्या भरतीबाबत सहकार्याच्या संधींचा शोध घेणे

आमच्या संरक्षण, सुरक्षा आणि आर्थिक हितासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्व आम्ही जाणतो आणि सागरी सुरक्षा सहकार्याची व्याप्ती, दर्जा व नियमितता यात वाढ करू. 'भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य आराखड्या'द्वारे आम्ही सागरी क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करू.

एकत्रीकरण, उद्योगांचा सहभाग आणि पुरवठा साखळीची लवचिकता वाढवण्याला प्रोत्साहन देऊन परस्परांच्या संरक्षण उद्योगांमधील वाढत्या क्षमतेचा लाभ घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही आमच्या संरक्षण क्षेत्रातील अभिनव उपक्रमांच्या प्रणालींमधील सहकार्य अधिक बळकट करू आणि प्रगत संरक्षण विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी आवश्यक व्यवस्था विकसित करू.

संघर्ष रोखणे, मदत व पुनर्वसनाचे प्रयत्न आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करणे यांमध्ये महिलांचा अर्थपूर्ण सहभाग व नेतृत्व वाढवण्याचे आम्ही प्रयत्न करू. तसेच, शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमांमध्ये महिला-पुरुष समानता राखण्याच्या आणि 'महिला, शांतता आणि सुरक्षा' हा अजेंडा पुढे नेण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.

प्रादेशिक आर्थिक समृद्धी आणि लवचिकतेला पाठिंबा देण्यासाठी द्विपक्षीय तसेच भागीदारांसोबत सहकार्य करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही महत्त्वपूर्ण खनिजे आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासह अधिक वैविध्यपूर्ण आणि लवचिक पुरवठा साखळ्या, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी विकसित करू.

सुरक्षित आणि सक्षम हिंद -प्रशांत क्षेत्रासाठीच्या आमच्या सामायिक दृष्टिकोनाला अनुरूप असे तंत्रज्ञान पूरक वातावरण तयार करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. आम्ही 'ऑस्ट्रेलिया-इंडिया पार्टनरशिप ऑन सायबर, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज अँड सप्लाय चेन्स' (ऑस्ट्रेलिया-इंडिया PACTS) अंतर्गत आमच्या सायबर सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख तंत्रज्ञान सहकार्य आणि माहिती-आदानप्रदान यंत्रणांच्या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी एकत्रितपणे काम करू आणि सामरिक तंत्रज्ञानावरील सहकार्य अधिक दृढ करू.

आम्ही आमच्या प्रदेशातील दहशतवादी धोक्यांविषयी, ज्यात संस्था आणि व्यक्तींचा समावेश आहे, माहिती-आदानप्रदान वाढवण्यास तसेच खालील क्षेत्रांसह हिंसक नक्षलवाद व दहशतवादाचा सामना करण्यासाठी वर्धित सहकार्याच्या संधींची चाचपणी करण्यास वचनबद्ध आहोत:

1. नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

2. दहशतवादाला वित्तपुरवठा;

3. महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि गर्दीची ठिकाणे;

4. सागरी क्षेत्र; आणि

5. ऑनलाइन कट्टरतावाद 

आम्ही 2023 मध्ये स्वाक्षरी केलेल्या 'स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारा'अंतर्गत आमचे सहकार्य सुरू ठेवू; या करारामध्ये अनियमित स्थलांतर, मानवी तस्करी आणि मानवी व्यापारास प्रतिबंध करण्याबाबतच्या सहकार्याच्या उपाययोजना नमूद केल्या आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीही आम्ही आमचे सहकार्य सुरु ठेवू.

आम्हाला आण्विक शस्त्रांपासून मुक्त असे शांततापूर्ण जग हवे आहे आणि त्या दिशेने, आण्विक शस्त्रांचा प्रसार रोखणे तसेच जागतिक, पूर्ण, भेदभाव-रहित आणि पडताळणीयोग्य आण्विक नि:शस्त्रीकरण याप्रती आमची वचनबद्धता आम्ही पुन्हा एकदा अधोरेखित करतो.

आम्ही हिंद-प्रशांत क्षेत्रातील इतर भागीदारांसोबत निरंतर सहकार्यासाठी वचनबद्ध आहोत, ज्यामध्ये त्रिपक्षीय सहकार्य यंत्रणा आणि हिंद-प्रशांत महासागर उपक्रमाद्वारे भागीदारांसोबत अधिक निकटचा सहभाग यांचा समावेश आहे. एका खुल्या, स्थिर, शांततापूर्ण आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आमच्या सकारात्मक दृष्टिकोनाच्या दिशेने क्षमता आणि सहकार्य उभारणीसाठी, आम्ही अमेरिका आणि जपानसोबत आमचे सहकार्य वाढवू.

प्रादेशिक शांतता, सुरक्षा, समृद्धी आणि मजबूतीप्रती आमची सामायिक वचनबद्धता ध्यानात घेऊन जलद, समन्वित आणि शाश्वत आपत्ती प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही खालील बाबींद्वारे सहकार्य अधिक मजबूत करू:

अ. माहितीची देवाणघेवाण आणि तज्ञांचे आदान-प्रदान; आणि

ब. संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव, ज्यामध्ये क्वाड इंडो-पॅसिफिक लॉजिस्टिक्स नेटवर्कचा समावेश आहे, जे मोठ्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी सामान्य नागरिकांना मदत करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करते.

आम्ही आपत्ती आणि संकटांच्या काळात आकस्मिक योजना आखणे , संयुक्त प्रतिसाद आणि समन्वय यांच्या देवाणघेवाणीच्या संधी शोधण्यासाठी वचनबद्ध आहोत, ज्यामध्ये तिसऱ्या देशांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या मोहिमांमध्ये मदत करणे समाविष्ट आहे.

आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या भावनेने, आम्ही शांततापूर्ण आणि स्थिर हिंद-प्रशांत क्षेत्राच्या मदतीसाठी या महत्त्वाकांक्षी अजेंड्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यास वचनबद्ध आहोत.


नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2283086) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam