ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात विकसित ग्राम - विकसित भारत यासाठीचा पथदर्शी आराखडा सादर


29 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री प्रथमच एका व्यासपीठाखाली आले एकत्र

विकसित भारताचा मार्ग विकसित गावांमधून जातो - शिवराज सिंह चौहान

विकसित भारत जी राम जी योजना येत्या 1 जुलै पासून संपूर्ण देशभरात होणार लागू: शिवराज सिंह चौहान

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2026 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जून 2026

 

नवी दिल्लीतील पुसा परिसरात आयोजित ‘ग्रामोदय से राष्ट्रोदय’ या दोन दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 29 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या ग्रामीण विकास मंत्र्यांशी विस्तृत चर्चा केली. गावखेडी समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित झाल्यानंतरच  समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल, ग्रामीण भारताच्या प्रगतीशिवाय राष्ट्राची प्रगती अशक्य आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यानिमित्ताने पहिल्यांदाच, 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ग्रामविकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि धोरणकर्ते केवळ ग्रामीण विकासाच्या भविष्यावर विचारविनिमय करण्यासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

'विकसित भारत – जी राम जी'  योजना येत्या एक जुलै पासून संपूर्ण देशभरात लागू होणार असून ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) ची जागा घेईल, अशी घोषणा सिंह यांनी केली. या नवीन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी याआधीच 95,682 कोटी रुपयांची अंतरिम मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सर्व राज्य सरकारांनी जराही वेळ वाया न घालवता कार्यवाहीशी निगडित सर्व औपचारिकता पूर्ण कराव्यात असे सांगून ते म्हणाले की नियमांची वेळेवर पूर्तता झाल्याने या योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे पार पडेल आणि देशभरातील ग्रामीण कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभांचे अखंडित वितरण होऊ शकेल. 

या संमेलनात लखपती दीदी डॅशबोर्डचे अनावरण करण्यात आले तसेच विशेषतः स्वयं-सहायता गटांमधील महिलांसाठी शी लीप्स प्लॅटफॉर्म: (स्वयं-सहायता उद्योजक - समृद्धी आणि शाश्वततेसाठी उपजीविका आणि उद्योग अनुप्रयोग) या  डिजिटल प्लॅटफॉर्मचे देखील अनावरण करण्यात आले. 

महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसह इतर राज्यांनी हाती घेतलेल्या बहु-मार्गी विपणन मॉडेल, समुदाय-आधारित उपक्रम आणि घरगुती उपजीविका पत योजना अशा यशस्वी उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. या सर्वोत्तम पद्धतींचे  दस्तऐवजीकरण करून त्या सर्व राज्यांसोबत सामायिक केल्यास देशभरात अशाप्रकारच्या नवकल्पना अमलात आणता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावर्षी सामान्य पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस पडण्याच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त करुन शिवराज सिंह  चौहान यांनी 14 राज्यांना आधीच दक्ष राहून कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. 

व्हीबी-जी राम जी  उपक्रमांतर्गत आयोजित लोगो डिझाइन, प्रश्नमंजुषा आणि डिजिटल कंटेंट स्पर्धांच्या विजेत्यांचा सत्कार करून संमेलनाची सांगता झाली.

 

* * *

निलिमा चितळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279232) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam