राष्ट्रपती कार्यालय
लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2026 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2026
लष्करी अभियांत्रिकी सेवा, 2023 आणि 2024 च्या तुकड्यांच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (25 जून,2026) राष्ट्रपती भवनात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रपती म्हणाल्या की, लष्करी अभियांत्रिकी अधिकारी देशाच्या संरक्षण पायाभूत व्यवस्थेचा कणा असतात. सैन्यदलांसाठी लागणारे सामरिक साहित्य विकसित आणि योग्य ठिकाणी स्थापन करून, ते लष्करी दलांचे सामर्थ्य आणि ऑपरेशन कार्यान्वित करण्याची क्षमता वाढवण्यात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यांचे कौशल्य, कार्याप्रती समर्पण आणि लष्करी अभियांत्रिकी अधिकाऱ्यांना करावे लागणारे कठीण परिश्रम, यांच्या भरवशावरच, आपले सैनिक, खलाशी आणि हवाई दलातील लढवय्ये देश संरक्षणाचे त्यांचे कर्तव्य अत्यंत प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडू शकतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

सर्व युवा अधिकाऱ्यांनी आपल्या कामात, सर्वोच्च कर्तव्यनिष्ठा आणि व्यावसायिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानातील उत्कृष्टता आणि समर्पण वृत्ती ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी आपल्या कामात, नवोन्मेषाचा अंगीकार करावा, नवनव्या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या हातात येईल, त्या प्रत्येक प्रकल्पात, उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन राष्ट्रपतींनी केले.
आजच्या संघर्ष आणि भू-राजकीय तणावांनी व्यापलेल्या जगात आत्मनिर्भरता ही राष्ट्रांसाठी केवळ विकासाची संकल्पना नसून एक धोरणात्मक गरज बनली आहे,असे राष्ट्रपती म्हणाल्या. आत्मनिर्भर देश संकटाच्या काळात आपले आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यास आणि विकासात्मक प्राधान्यक्रम प्रभावीपणे राबविण्यास अधिक सक्षम असतो, याचे प्रत्यंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान आले. स्वदेशी संरक्षण क्षमता, प्रगत तंत्रज्ञान आणि मजबूत देशांतर्गत औद्योगिक पाया, कोणत्याही राष्ट्राची कार्यसज्जता आणि धोरणात्मक परिणामकारकता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, याचा धडा आपल्याला या कारवाईच्या वेळी मिळाला, असे त्यांनी सांगितले. लष्करी अभियांत्रिकी सेवेत स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आज जगासमोर हवामान बदल आणि विविध पर्यावरणीय आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत शाश्वत विकास हा आता पर्याय राहिलेला नसून एक अपरिहार्य गरज बनला आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या. अभियंते म्हणून लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या अधिकाऱ्यांवर नियोजन, बांधकाम आणि देखभाल कार्यांमध्ये पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यांच्या कार्यातून केवळ मजबूत आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीलाच हातभार लागला पाहिजे असे नाही, तर स्वच्छ, हरित आणि शाश्वत भारत घडविण्यासही योगदान मिळाले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2278056)
आगंतुक पटल : 8