पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  पश्चिम बंगालमधील कोलकाता इथे श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर स्वदेशी रचना आणि स्वदेशी बनावटीच्या तीन जहाजांचे – आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय यांचे जलावतरण


आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक यांचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात  समावेश झाल्याची पंतप्रधानांनी केली घोषणा

आज, 21  जून रोजी 'जागतिक जलविज्ञान दिन' ही असून आजच्याच  दिवशी आपण आयएनएस संशोधक हे भारताचे सर्वात प्रगत हायड्रोग्राफी जहाज  नौदलात समाविष्ट करणे हा खरोखरच एक विलक्षण योगायोग: पंतप्रधान

ज्या देशाचे सागरी सामर्थ्य  भक्कम असते, त्याचा आर्थिक आणि सामरिक प्रभावही तितकाच प्रबळ असतो; आणि भारत हे वास्तव चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्यासाठी स्वतःला सज्ज करत आहे: पंतप्रधान

'आयएनएस विक्रांत'पासून आजपर्यंतचा हा प्रवास हा केवळ नवीन युद्धनौकांचा प्रवास नाही; तर हा भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचा देखील प्रवास आहे. आज 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' या युद्धनौका याच प्रवासाला नवी गती देत आहेत: पंतप्रधान

भारताने जहाजबांधणी क्षेत्रासाठी एका नवीन दृष्टीकोनासह पुढील वाटचाल सुरू केली असून देशांतर्गत बांधणी क्षमता वाढवण्यासाठी विशेष पावले उचलण्यात आली  आहेत: पंतप्रधान

जहाजबांधणी, जहाजांची दुरुस्ती आणि एमआरओ - देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग याकडे आता एका प्रमुख  राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

भारताने नेहमीच महासागराकडे सहकार्याचे माध्यम म्हणून पाहिले आहे, परंतु शांततेचे रक्षण करण्यासाठी सामर्थ्यही तितकेच आवश्यक आहे हे देखील भारताला ठाऊक आहे; समृद्धीच्या रक्षणासाठी सुरक्षा आवश्यक तर भविष्य घडवण्यासाठी आत्मनिर्भरता अनिवार्य : पंतप्रधान

आज 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' ही  याच भावनेचे  प्रतीक म्हणून भारतीय नौदलात सामील झाली  आहेत: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 21 JUN 2026 12:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर, स्वदेशी बनावटीच्या आणि रचनेच्या  तीन नौदल जहाजांचे - 'आयएनएस दुनागिरी' (एक प्रगत 'स्टेल्थ' फ्रिगेट), 'आयएनएस संशोधक' (एक मोठे टेहळणी जहाज) आणि 'आयएनएस अग्रय' (पाणबुडी-विरोधी  उथळ पाण्यातील युद्धनौका )  जलावतरण करण्यात आले. या जहाजांच्या समावेशामुळे देशाच्या नौदल क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल , सागरी क्षेत्राप्रती जागरूकता वाढेल आणि भू-राजकीय धोक्यांपासून आपल्या किनारपट्टीच्या जलक्षेत्राची सुरक्षा अधिक मजबूत होईल. या तिन्ही जहाजांचे संरेखन भारतीय नौदलाच्या 'वॉरशिप डिझाइन ब्युरो'ने  केले असून  त्यांची बांधणी कोलकात्यातील 'गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स' (GRSE) द्वारे करण्यात आली; यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह भारतीय उद्योगांचा मोठा सहभाग होता. 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर असलेली ही जहाजे आत्मनिर्भरतेप्रति भारताच्या वचनबद्धतेचा एक उत्तम दाखला आहेत.

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले, आजचा हा प्रसंगाचा योग संपूर्ण जगभरात साजरा केल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशीच जूळून आला असल्याचे त्यांनी नमूद केले. यानिमित्त, भारताच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय पुनरुत्थानाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या या बंगालच्या ऐतिहासिक भूमीला भेट देण्याची संधी लाभल्याबद्दल आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भूमीने शतकानुशतकांसून सागरी मार्गांच्या माध्यमातून भारताला जगाशी जोडले असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. आज होत असलेला सोहळा म्हणजे आत्मनिर्भर भारत, सुरक्षित भारत आणि विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. 21 जून हा दिवस जगभरात जागतिक जलविज्ञान दिन (World Hydrography Day) म्हणूनही साजरा केला जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आजच्याच दिवशी आयएनएस संशोधक हे भारताचे सर्वात अत्याधुनिक जलारेखन सर्वेक्षण जहाज नौदलात सामील होत आहे, हा एक अद्भुत योगायोग आहे असे ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी भारतीय नौदल, वैज्ञानिक, अभियंते, कार्मचारी आणि देशातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले. हे यश तंत्रज्ञान आणि सागरी क्षेत्रातील भारताच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारे आहे असे ते म्हणाले. भक्कम सागरी क्षमता असल्याशिवाय कोणताही देश महासत्ता बनू शकत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. विकास, सुरक्षा आणि समृद्धी या गोष्टी समुद्राशी अत्यंत दृढतेने जोडलेल्या आहेत. जगभरातील बहुतांश व्यापार हा सागरी मार्गानेच होतो, तर जगभराचे माहितीसाठ्यासंबंधीचे विस्तीर्ण जाळे देखील समुद्राच्या खालूनच कार्यरत असते असे त्यांनी सांगितले. आपल्या संबोधनातून त्यांनी आधुनिक जगातील सागरी सामर्थ्याचे महत्त्वही अधोरेखित केले. आगामी काळात अत्यावश्यक  खनिजे, खोल समुद्रातील साधनसंपत्ती आणि भविष्यातील ऊर्जेचे स्त्रोत हे मोठ्या प्रमाणात सागरी क्षेत्राशीच जोडलेले असतील. त्यामुळेच कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव हा त्या देशाच्या सागरी क्षेत्राशी संबंधित क्षमतेशी थेट जोडलेला असल्याचे ते म्हणाले.

भारताला या वास्तवाची पूर्ण जाण आहे, आणि त्यानुसारच देश स्वतःला सज्ज करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. आज तीन जहाजे प्रत्यक्ष नौदलाच्या ताफ्यात सामाली होण्याची घटना ही देशाच्या वाढत्या क्षमता आणि कौशल्याची प्रचिती देणारी घटना आहे असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्याच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्या घटनेतून सागरी क्षेत्राशी संबंधित देशाच्या वाटचालीतील एका नवीन अध्यायाला प्रारंभ झाला होता आणि देशाच्या वाढत्या नौदल सामर्थ्याची जाणिव जगाला झाली होती असे ते म्हणाले. आयएनएस विक्रांतपासून सुरू झालेला हा प्रवास आज आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक पर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास म्हणजे निव्वळ नवीन युद्धनौकांबाबतची गाथा नाही, तर हा प्रवास देशाच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे द्योतक आहे असे ते म्हणाले. ही तिन्ही जहाजे देशाच्या स्वदेशी डिझाईन, उत्पादन आणि नवोन्मेषाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या जहाजांच्या बांधणीची आखणी, आणि जहाजांची प्रत्यक्ष निर्मिती देशातच केली गेली आहे. या जहाजांमधून देशाच्या उद्योग क्षेत्राची प्रतिभा, अभियंत्यांचे कौशल्य आणि देशातील कामगारांच्या कठोर परिश्रमांचे दर्शन घडते असेही ते म्हणाले. 

संरक्षण क्षेत्रात भारताला केवळ खरेदीदार बनून राहायचे नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले. "देशाच्या सैन्याची ताकद जागतिक बाजारपेठेवरील अवलंबित्वावरून मोजली जात नाही, तर स्वावलंबी होण्याच्या क्षमतेवरून मोजली जाते. भारताला उत्पादक आणि निर्माता बनायचे आहे, कारण जे देश उत्पादन करतात, तेच जागतिक पटलावर निर्णायक भूमिका बजावणारे घटक ठरतात.” ते म्हणाले. अलीकडच्या काळातील कामगिरीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी नमूद केले की गेल्या काही वर्षांत स्वदेशी बनावटीच्या 40 हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट झाल्या आहेत. त्यांनी नमूद केले की, नौदलाला जवळजवळ दर काही आठवड्यांनी एखादी नवीन क्षमता प्राप्त होत आहे, तर सध्या नौदलाच्या 45 प्रमुख प्लॅटफॉर्म्सची उभारणी सुरू आहे. ते म्हणाले की, ही आकडेवारी केवळ सांख्यिकी माहिती नसून, ती भारताची औद्योगिक क्षमता आणि भविष्यातील योग्यता दर्शवते.

सागरी क्षेत्रातील रोजगार निर्मितीच्या प्रचंड क्षमतेवर भर देत मोदी म्हणाले, "सरकार सागरी क्षेत्राकडे केवळ एक स्वतंत्र उद्योग म्हणून नव्हे, तर विकसित भारतासाठी रोजगार आणि आर्थिक विकासाचे एक प्रमुख इंजिन म्हणून पाहते. आधुनिक जहाजासाठी मोठ्या प्रमाणात पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि हजारो सुट्या भागांची आवश्यकता असते, त्यामुळे औद्योगिक पुरवठा साखळ्यांच्या विस्तृत जाळ्यामध्ये अनेक संधी निर्माण होतात.” सेवेत दाखल झालेल्या तीन जहाजांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या बांधणीमध्ये 200 हून अधिक एमएसएमईंनी योगदान दिले असून, यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि आर्थिक घडामोडींना चालना मिळाली.

भारतासाठी सागरी विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करण्याची वेळ आली असून, सरकारने जहाजबांधणी क्षेत्रासाठी नवा दृष्टिकोन  स्वीकारला  आहे  आणि  देशांतर्गत  उत्पादन  क्षमता  वाढवण्यासाठी  अलिकडच्या वर्षांत अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत असे मोदी यांनी नमूद केले. “नौवहन क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेले 70,000 कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज, हा केवळ  एक  आर्थिक  उपाय नसून, भारताचे सागरी क्षेत्रातील भविष्य आणि औद्योगिक विस्तारासाठी केलेली गुंतवणूक आहे. सागरमालासारखे उपक्रम ही सर्वसमावेशक दृष्टी प्रतिबिंबित करतात आणि लॉजिस्टिक खर्च कमी करायला, औद्योगिक विकासाला गती द्यायला आणि किनारपट्टी भागात नवीन संधी निर्माण करायला सहाय्य करत आहेत," पंतप्रधान म्हणाले. संरक्षण क्षेत्रातील भारताच्या परिवर्तनाबाबत बोलताना मोदी यांनी नमूद केले की, एकेकाळी भारताची गणना जगातील सर्वात मोठ्या संरक्षण-साहित्य आयातदार देशांमध्ये केली जात असे, यामुळे धोरणात्मक आणि सुरक्षेविषयक आव्हाने निर्माण झाली होती. मात्र, 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर, मोठ्या धोरणात्मक सुधारणा आणि संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेवर विशेष भर देऊन ही परिस्थिती बदलण्याचे ठोस प्रयत्न करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. "या प्रयत्नांमुळे संरक्षण क्षेत्रात डिझाइन, उत्पादन आणि निर्यातीच्या नव्या संधी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. 

2014 मध्ये भारताचे एकंदर संरक्षण उत्पादनासाठीची तरतूद 40,000 कोटी रुपये इतकी होती, त्यात वाढ होऊन ती 1.8 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही बाब एक बळकट, आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर संरक्षण उद्योगाच्या स्पर्धात्मक उभारणीच्या दिशेने केलेली महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते," असा उल्लेख केला. जेव्हा धोरणे स्पष्ट असतात, दिशाही योग्य असते आणि संबंधित सर्व भागधारक राष्ट्रीय विकासासाठी एकत्र येऊन काम करतात तेव्हा किती मोठे बदल शक्य होऊ शकतात, हे गेल्या बारा वर्षांमधील प्रगतीतून स्पष्ट होते यावर मोदींनी भर दिला.
भारताच्या समृद्ध सागरी वारसाचा संदर्भ देताना, देशाच्या सागरी वारशाची चर्चा होते तेव्हा पश्चिम बंगालचे नाव स्वाभाविकपणे समोर येते असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. जगाशी संपर्क जोडण्यात बंगालने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. हुगळी नदीच्या पाण्याने, इतिहासाचे बदलणारे टप्पे, व्यापारातील वृद्धी आणि विकासाचे नवे प्रवास पाहिले आहेत, असे ते म्हणाले. या बंदराला बंगालचे सुपत्र आणि भारताचे पहिले उद्योग मंत्री डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आल्याने हा प्रसंग अधिक महत्त्वाचा ठरल्याचा उल्लेख त्यांनी केला. "आगामी काळात पश्चिम बंगाल भारताच्या नील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र ठरणार असून, सागरी क्षेत्रातील उत्पादन, दळणवळण आणि किनारपट्टीच्या भागाचा विकास यांचेही प्रमुख केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,"असेही मोदी म्हणाले. महासागरांकडे भारताने नेहमीच सहकार्य आणि दळणवळणाचे माध्यम म्हणून पाहिल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. मात्र, "समृद्धीच्या रक्षणासाठी सुरक्षितता अपरिहार्य आहे, तर भविष्य घडवण्यासाठी आत्मनिर्भरता. आयएनएस अग्रय, आयएनएन दुनागिरी आणि आयएनएस संशोधक ही जहाजे याच मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या क्षमतांबाबत अधिकाधिक जागरुक आहेत, आपल्या ताकदीवर विश्वास ठेवतात आणि एकविसाव्या शतकात नव्याने उर्जा व उद्देशांसह प्रगती करण्यात कटिबद्ध आहेत, अशा राष्ट्रांचे प्रतीक आहेत." असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी या यशात योगदान दिल्याबद्दल नौदलाचे सर्व कर्मचारी, शास्त्रज्ञ, अभियंते, कामगार आणि सर्व नागरिकांचे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच भारताची सागरी आणि संरक्षण क्षेत्रे देशाची सुरक्षा, समृद्धी आणि जागतिक स्थान अधिक बळकट करत राहतील असा विश्वासही व्यक्त केला. 

***

राधिका अघोर/सुषमा काणे/तुषार पवार/राजश्री आगाशे/विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2276245) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Gujarati , Tamil , Malayalam