मिफ्फ 2026 मध्ये 'भारती और बिबो' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर
भारताच्या अग्रगण्य महिला आयकॉन्सना अॅनिमेशनद्वारे मानवंदना
मुंबई, 21 जून 2026
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ 2026) 'भारती और बिबो' या हिंदी अॅनिमेशन मालिकेचा वर्ल्ड प्रीमियर (जागतिक प्रीमियर) आयोजित करण्यात आला. एनएफडीसी आणि पपेटिका मीडिया निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन स्नेहा रविशंकर यांनी केले आहे. या मालिकेची ओळख करून देताना, दिग्दर्शिका स्नेहा रविशंकर यांनी हा एक मोठा टप्पा असल्याचे सांगितले आणि या प्रकल्पातील एनएफडीसीच्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. भारतातील या महान महिलांना मानवंदना म्हणून, त्यांच्या कथा जशाच्या तशा, म्हणजेच कोणत्याही संपादनाशिवाय सादर केल्या जात आहेत, या निवेदनाने, या मालिकेची सुरुवात होते.

भारती, ही तरुण मुलगी आणि तिचा जादुई सोबती 'बिबो', जिचे नाव 'भारत' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे, यांच्या माध्यमातून ही मालिका साकारली आहे. मालिकेच्या प्रत्येक भागाची सुरुवात एका समूहगीताने होते, यात वाहनचालक, शुश्रूषा करणाऱ्या, कथक नृत्यांगना, शेतकरी, जिम्नॅस्ट आणि कलाकार अशा रोजच्या जीवनातील विविध भूमिका साकारणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. या गाण्यात एक सार्वत्रिक संदेश गुंफला आहे: 'नारी में देवी में, मुझसे है सबकुछ, मुझमे है सबकुछ', म्हणजेच, ‘स्त्री मध्ये, देवतेमध्ये, माझ्यामुळेच सर्व काही आहे, माझ्यातच सर्व काही सामावले आहे.’ हे आगळे सादरीकरण, महान स्त्रियांच्या प्रतिमेचे साचेबद्ध चित्रण करायला नकार देते.
ही मालिका भारतातील चार खऱ्याखुऱ्या महिला आयकॉन्स, म्हणजेच महान स्त्रियांचा परिचय करून देते. अहिल्याबाई होळकर यांच्यावरील भाग, इंदूरच्या राजघराण्यातील या मराठा राणीचा उदय, त्यांचं प्रशासकीय शहाणपण आणि मुत्सद्देगिरीचं दर्शन घडवतो. तसंच, त्यांना कणखर नेतृत्वाचे धडे देणाऱ्या त्यांच्या सासूच्या भूमिकेतून, 'महिला या एखाद्या व्यक्तीला घडवणाऱ्या, किंवा ‘मार्गदर्शक’ असतात, हे प्रतिबिंबित होते.

राणी दुर्गावती यांच्यावरील भाग हा गोंडवानाच्या राणीचा कार्यकाळ आणि अकबराच्या अधिपत्याखालच्या मुघल साम्राज्याला त्यांनी दिलेलं आव्हान दर्शवतो. सुरुवातीला मुघल सैनिकांनी, ‘वो तो महज एक औरत है’- म्हणजेच, 'ती तर फक्त एक स्त्री आहे', असं म्हणून त्यांना कमी लेखलं होतं, मात्र राणीच्या दृढनिश्चयामुळे शेवटी त्यांना तिची ताकद मान्य करावी लागली. राणीने शरणागती पत्करण्याऐवजी मृत्यूची निवड केली, या प्रसंगाने या भागाचा शेवट होतो. जबलपूरच्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या माध्यमातून राणीच्या या वारशाचा गौरव करण्यात आला आहे. अॅनिमेटरने सामान्यपणे स्त्रीच्या कोमलतेशी जोडल्या जाणाऱ्या गुलाबी रंगाला पराक्रमाचे प्रतीक म्हणून सादर केले आहे.
'राणी राशमोनी'(रासमणी) ही मालिका कोलकाता इथल्या समाजसुधारक स्त्रीची कथा सादर करते, तिने ईस्ट इंडिया कंपनीला आव्हान दिलं, सार्वजनिक पायाभूत सुविधांची उभारणी केली आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबरोबर एकत्र येऊन बहुपत्नीत्वाला बंदी घालणाऱ्या कायद्यासह विविध सुधारणांसाठी पुढाकार घेतला. एका महिलेने बांधलेलं असल्यामुळे दक्षिणेश्वर मंदिरात पूजा करायला पुजाऱ्यांनी नकार दिला, या घटनेतून ह्या मालिकेत, धार्मिक पितृसत्तेलाही आव्हान दिल्याचेही दाखवण्यात आले आहे.
सालूमारदा थिम्माक्का यांच्यावरील भाग हा राजघराण्यांमधल्या महिलांच्या कथांपेक्षा पूर्णपणे वेगळा असून, तो कर्नाटकातल्या एका पर्यावरणवादी महिलेचा प्रवास चित्रित करतो. औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि लहान वयातच लग्न झालेल्या थिम्माक्का यांनी शेकडो झाडं लावून त्यांचं स्वतःच्या मुलांप्रमाणे संगोपन केलं. पुढे भारत सरकारने त्यांचा 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव केला.

या मालिकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वैधव्य, विवाह आणि या महिलांना मोजावी लागलेली भावनिक किंमत, याचं प्रामाणिक चित्रण गुंफलं आहे. या कथाकथनाचं एक सूक्ष्म वैशिष्ट्य म्हणजे त्यामधलं स्त्रीपुरुष-संतुलन, ही मालिका केवळ मातृसत्ताक चौकटीत न अडकता, एक सर्वसमावेशक स्त्रीवादी दृष्टिकोन स्वीकारते. 'एज्युटेनमेंट' (शिक्षण आणि मनोरंजन) या स्वरूपामुळे इतिहास तरुण पिढीसाठी समजून घ्यायला सुलभ आणि रंजक बनतो.
भारताच्या या पराक्रमी महिलांचा वारसा विस्मृतीत जाण्याचा धोका निर्माण झाला असताना, 'भारती और बिबो', ही मालिका मुलांना त्यांचं योगदान जाणून घेण्याची, त्याचं मूल्य जपण्याची आणि ते पुढे नेण्याची प्रेरणा देते.
* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/राजश्री आगाशे/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2276130
| Visitor Counter:
15