MIFF banner

मिफ्फ 2026 मध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि भारताचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांतील पुनरुज्जीवित अभिजात माहितीपटांनी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध


गांधीजी, बेगम अख्तर आणि पंडित रविशंकर यांच्यावरील वारसा विषयक माहितीपट मिफ्फमध्ये अधिक तेजाने झळकले

मुंबई, 19 जून 2026

 

सध्या सुरु असलेल्या 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ 2026) मध्ये “एनएफएआय द्वारे प्रस्तुत – पुनरुज्जीवित अभिजात कलाकृती” या विशेष बिगर-स्पर्धात्मक विभागात  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि भारताचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएफएआय) यांच्या संग्रही असलेले पाच पुनरुज्जीवित माहितीपट सादर करण्यात आले. निवडण्यात आलेले हे सर्व चित्रपट, आपल्या देशाचा चित्रपट विषयक  वारसा जतन करून त्याचे पुनरुजीवन करण्याप्रती समर्पित असलेल्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान (एनएफएचएम) या केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत पुनरुज्जीवित करण्यात आले आहेत.

बुधवारी संध्याकाळी प्रदर्शित करण्यात आलेल्या या विशेष संग्रहात पूर्वीच्या फिल्म्स डिव्हिजनने निर्मिलेल्या पाच महत्वपूर्ण माहितीपटांचा समावेश होता. एकत्रितरीत्या हे चित्रपट भारताच्या सांस्कृतिक, कलात्मक आणि सामाजिक वारशाचे दर्शन घडवताना समकालीन प्रेक्षकांना देशाच्या भूतकाळातील महत्त्वाचे क्षण आणि व्यक्तिमत्त्वे यांची पुनर्भेट घडवण्याची संधी प्रदान करतात.

या माहितीपटांपैकी तीन चित्रपट महात्मा गांधी, बेगम अख्तर आणि पंडित रविशंकर या  अद्वितीय व्यक्तिमत्त्वांवर लक्ष केंद्रित करतात. इतर दोन माहितीपट कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) शहराचे आणि भारतातील आदिवासी समुदायांचे चित्रपटीय प्रतिनिधित्व सादर करतात.

महात्मा: गांधींचे जीवन 1869 ते  1948 (भाग I)

विठ्ठलभाई के. झवेरी यांनी दिग्दर्शित केलेला आणि 1968 मध्ये निर्मिलेला हा इंग्रजी भाषेतील माहितीपट, महात्मा गांधी यांचे जीवन आणि कार्य यांचा व्यापक आढावा सादर करण्यासाठी संग्रहातील चित्रीकरण तुकड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करून बनवला आहे. हा माहितीपट महात्मा गांधी यांचे आयुष्य आणि त्यांनी केलेले कार्य याच्या अनमोल ऐतिहासिक नोंदी सादर करतो.

बेगम अख्तर

फिल्म्स डिव्हिजनद्वारे 1971 मध्ये निर्मित आणि एन.के. इस्सार यांच्याद्वारे दिग्दर्शित, हा इंग्रजी भाषेतील माहितीपट, मलिका-ए-गझल म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बेगम अख्तर यांच्या जीवनाचे आणि कलेचे विविध पैलू सादर करतो. त्यांच्या घरातील तसेच कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या जिव्हाळ्याच्या दृश्यांमधून तसेच रंगमंचावरील सादरीकरणाच्या चित्रणातून हा चित्रपट या  ख्यातनाम गझल आणि ठुमरी कलाकाराच्या व्यक्तिमत्वाचा गाभा उलगडतो.

रवी शंकर

प्रमोद पाटील यांच्याद्वारे दिग्दर्शित आणि वर्ष 1970 मध्ये निर्मित हा माहितीपटवजा चरित्रात्मक चित्रपट सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रवीशंकर यांचे जीवन आणि सर्जनशील प्रवासाचा शोध घेतो. मुलाखती आणि जाहीर कार्यक्रमांच्या चित्रणाच्या माध्यमातून हा चित्रपट शास्त्रीय संगीतकार, आणि भारतीय संगीताचे सांस्कृतिक राजदूत असलेल्या या महान व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडवतो.

पोर्ट्रेट ऑफ ए सिटी

चिदानंद दासगुप्ता यांनी 1961 मध्ये दिग्दर्शित केलेला हा माहितीपट कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) शहराचे प्रभावी चित्रपटीय व्यक्तीचित्र उभे करतो. कारखाने, वृत्तपत्रांची कार्यालये, नद्या आणि घोड्यांच्या शर्यतीची मैदाने यांच्या दृश्यांच्या माध्यमातून संगीत, परिसरातील ध्वनी तसेच अनौपचारिक संवाद यांच्या साथीने हा चित्रपट गजबजलेल्या शहरातील जीवनाचा ताल आणि स्वरूप टिपतो.

अवर ओरिजिनल इनहॅबीटंट्स

जगत मुरारी यांनी दिग्दर्शित केलेला आणि 1953 मध्ये निर्माण झालेला हा इंग्रजी भाषेतील माहितीपट प्रेक्षकांना भारताच्या वैविध्यपूर्ण आदिवासी समुदायांची ओळख करून देतो. 12 मिनिटांपेक्षाही कमी कालावधीत हा चित्रपट देशभरात विखुरलेल्या 172 आदिवासी गटांपैकी काही गटांच्या विशिष्ट सांस्कृतिक प्रथा, पोशाख, दागिने, संगीत आणि नृत्य परंपरा अधोरेखित करतो.

या सादरीकरणाच्या अनुषंगाने आयोजित सत्रात बोलताना एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी भविष्यातील पिढ्यांसाठी चित्रपटांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. चित्रपटांचे जतन चित्रपटांचा इतिहास नवीन प्रेक्षकांना तसेच भविष्यातील पिढ्यांना उपलब्ध होणे सुनिश्चित करते असे नमूद करत त्यांनी आजच्या काळात अनेक आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये पुनरुज्जीवित अभिजात चित्रपटांसाठी समर्पित विभाग असतात याकडे लक्ष वेधले.

मिफ्फ 2026 मध्ये या चित्रपटांचा समावेश, माहितीपट आणि नॉन-फिक्शन प्रकारच्या चित्रपटांचा जगातील सर्वात समृद्ध कोषांपैकी एक असलेल्या फिल्म्स डिव्हिजन संग्रहाचे चिरंतन महत्त्व अधोरेखित करतो. समकालीन प्रेक्षकांसाठी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या अत्याधुनिक पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या माध्यमातून, हे चित्रपट पुनर्जीवित करण्यात आले असून यामध्ये त्यांचे मूळ चित्रपटीय स्वरूप देखील जतन करण्यात आले आहे.

मिफ्फ मध्ये झालेले या चित्रपटांचे सादरीकरण भारताच्या दृक- श्राव्य वारशाचे संरक्षण करण्याप्रती आणि तो भविष्यातील पिढ्यांना उपलब्ध करून देण्याप्रती एनएफडीसी-एनएफएआयच्या कटिबद्धतेची पुष्टी करते. मिफ्फ 2026 मध्ये झालेले या चित्रपटांचे सादरीकरण, समकालीन माहितीपट निर्मिती आणि भारताच्या समृद्ध चित्रपटीय वारशाचे जतन अशा दोन्हींचा उत्सव साजरा करणारा मंच म्हणून या महोत्सवाच्या भूमिकेला बळ देतो.

मिफ्फ मध्ये दररोज होणाऱ्या कार्यक्रमांची प्रसिद्धी पत्रके तसेच उच्च-दर्जाची छायाचित्रे मिळवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275400   |   Visitor Counter: 11