पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमारे 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे होणार वितरण
पहिल्यांदाच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम मिळणार
शाश्वत रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यामागे दर महिन्याला 3,000 रुपयांचे अनुदान मिळण्यास नियोक्ते पात्र ठरणार
रोजगार निर्मिती, रोजगारांचे औपचारिकीकरण तसेच सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार सुलभतेने होण्यासाठी पीएम-व्हीबीआरवाय ही योजना आखण्यात आली
या प्रोत्साहन योजनेमुळे देशभरातील 15 लाख लाभार्थ्यांसाठी रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली
प्रविष्टि तिथि:
17 JUN 2026 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2026
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात दिनांक 19 जून 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत (पीएम-व्हीबीआरवाय)2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण होणार आहे.
या वितरणामुळे, विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीला गती , रोजगाराच्या औपचारिकीकरणाला प्रोत्साहन, रोजगारक्षमतेत सुधारणा तसेच सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या हेतूने केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम-व्हीबीआरवाय या रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल. या योजनेद्वारे देशभरात 15 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत .
औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी कामगार आणि नियोक्ते अशा दोघांनाही प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने पीएम-व्हीबीआरवायची आखणी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, कार्यबळामध्ये प्रथमच सहभागी होणारे कामगार 15,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन मिळण्यास पात्र ठरतील आणि त्यातून त्यांना महत्त्वाची मदत मिळेल. अतिरिक्त रोजगार निर्माण करणारे नियोक्ते प्रत्येक अतिरिक्त कामगारामागे दर महिन्याला 3,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन मिळण्यास पात्र ठरतील आणि त्यायोगे शाश्वत रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल. आर्थिक विकासामध्ये निर्मिती क्षेत्राचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेत, निर्मिती क्षेत्रातील नियोक्त्यांना चार वर्षांच्या कालावधीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल तर उर्वरित सर्व क्षेत्रांतील नियोक्त्यांना दोन वर्षे प्रोत्साहन लाभ मिळेल.
ही योजना रोजगार- आधारित विकासासाठी अनुकूल वातावरणाला चालना देण्याप्रती सरकारच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवते आणि देशाच्या आर्थिक प्रगतीचे लाभ देशातील युवकांसाठीच्या दर्जेदार औपचारिक रोजगार संधींमध्ये परिवर्तीत होतील याची सुनिश्चिती करते.
दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी पीएम-व्हीबीआरवायची सुरुवात झाली. दोन वर्षांच्या कालावधीत 3.5 कोटी नोकऱ्यांच्या निर्मितीला मदत करणे हे या एकंदर 99,446 कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे उद्दिष्ट आहे. यापैकी सुमारे 1.92 कोटी लाभार्थी हे कार्यबळात प्रथमच सहभागी होणारे असतील. कामगार आणि नियोक्ते अशा दोघांनाही मदत करून , ही योजना औपचारिक रोजगाराचा विस्तार , सामाजिक सुरक्षेचे कवच मजबूत करणे आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्याच्या कार्यात प्रगती करून अत्यंत परिवर्तनशील भूमिका बजावत आहे.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2274077)
आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam