शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स 2026 या उपक्रमाचे केले उद्घाटन, भारत आणि फ्रान्समधील अत्यूच्च तंत्रज्ञानाशी संबंधित (डीप टेक) भागीदारी होणार अधिक मजबूत
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2026 7:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधील निस इथल्या पॅलेस दे एक्स्पोझिशन्स इथे आयोजित भारत इनोव्हेट्स 2026 या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोठ्या प्रमाणावर परिणामकारक ठरणारा उपक्रम असून, देशातील अत्यूच्च तंत्रज्ञानाशी संबंधित (डीप टेक) नवोन्मेषक आणि जागतिक भागधारकांमधील नवोन्मेषाधारीत भागीदारीला पुढची दिशा देणारा एक प्रमुख मंच म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारत मोठ्या व्याप्तीने आणि अतिशय वेगाने नवोन्मेषी उपक्रम राबवत आहे. आपल्या संबोधनातून त्यांनी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचे विस्तारते नेतृत्व अधोरेखित केले. भारत शाश्वत भविष्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी नवोन्मेषी उपक्रम राबवत आहे, नवोन्मेष हा भारताच्या जनुकांतच आहे असे ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स हे भारतासोबत जागतिक नवोन्मेषाचा पुढचा अध्याय एकत्रितपणे रचण्यासाठी जगाला दिलेले एक आमंत्रण आहे, असे त्यांनी सांगितले.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही उपस्थितांना संबोधित केले. आज भारताबाहेर पहिल्यांदाच आयोजित केल्या जात असलेल्या भारत इनोव्हेट्स 2026 च्या पहिल्या आवृत्तीचे यजमानपद निस शहर भूषवत आहे, ही घटना भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांना जोडणाऱ्या दृढ संबंधांची साक्ष आहे, आणि यावर आपला दृढ विश्वास आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. दोन्ही देशांमधले संबंधांची मुळे ही तंत्रज्ञान, वैज्ञानिक आणि औद्योगिक विषयक दीर्घकालीन भागीदारीशी जोडलेली आहेत. अलिकडच्या काळात या संबंधात आमुलाग्र बदल घडून आला आहे ही बाबही त्यांनी नमूद केली. दोन्ही देश परस्परांच्या वैज्ञानिक, उद्योजकीय आणि औद्योगिक ताकदीच्या बळावर अजूनही एकत्रितपणे बरेच काही घडवू शकतात याची प्रचितीही या आयोजनातून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दोन्ही नेत्यांनी भारत इनोव्हेट्स इनोव्हेशन पॅव्हेलियन या प्रदर्शन दालनाला भेट देऊन पाहणी केली. या दालनात कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स, जैवतंत्रज्ञान, आरोग्य सेवा, ऊर्जा, प्रगत उत्पादन, गतिशीलता आणि अंतराळ तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांतील भारतीय नवोन्मेषक आणि प्रमुख भारतीय उच्च शिक्षण संस्थांनी विकसित केलेल्या 120 अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आणि महत्वाच्या नवोन्मेषी उपक्रम प्रदर्शित करण्यात आले आहेत.


अत्यूच्च तंत्रज्ञानाशी संबंधित भारतीय नवोन्मेष जगासमोर मांडणे आणि त्याचा प्रचार प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदार, उद्योग जगत, संस्था आणि नवोन्मेषकांसोबत भागीदारीच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून नवोन्मेषाशी संबंधित जागतिक व्यवस्थेसोबतचे भारताचे एकात्मिकरण घडून येईल, त्यासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि उद्योजकता या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे.
भारत इनोव्हेट्सच्या या पहिल्या आवृत्तीच्या आयोजनातून, परस्पर सहकार्य, प्रतिभा आणि परिवर्तनात्मक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यासाठी सज्ज अशा स्वरुपाच्या नवोन्मेषी परिसंस्थेची जडणघडण करण्याप्रति भारत आणि फ्रान्सची सामायिक वचनबद्धता अधोरेखित झाली.
या उपक्रमाबद्दल आणि यात सहभागी स्टार्टअप्सबद्दल अधिक माहितीसाठी www.bharatinnovates.in या संकेतस्थळाला भेट द्या.
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2272782)
आगंतुक पटल : 14